वैयक्तिक आघात होऊनही मनाशी ठाम निर्धार करून घेतलेले व्रत पूर्ण करत, आपल्या अंगी अढळ श्रद्धेची ज्योत तेवत ठेवणार्या प्रल्हाद अण्णा भांड यांच्याविषयी...
नाशिक ते श्रीक्षेत्र शेगाव अशी सुमारे २५ वर्षांपासून ‘सायकलवारी’ घडवून आणणारे, तसेच आठवेळा ‘नर्मदा परिक्रमा’ व्रतस्थपणे अनवाणी पायाने पूर्ण करणारे ज्येष्ठ वारकरी प्रल्हाद भांड यांनी आपली आठवी नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केली असून, लाभलेल्या आयुष्यातला बराच कालावधी भांड यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यात घालवला आहे. प्रल्हाद भांड यांनी आजवरच्या आयुष्यामध्ये आठवेळा नर्मदा परिक्रमा अनवाणी पायाने पूर्ण केली आहे. यादरम्यान त्यांनी हजारो छायाचित्रेही कॅमेराबद्ध केली. ‘नर्मदा परिक्रमा’ या विषयावर निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन व प्रवचन, व्याख्यानाद्वारे ते लवकरच नाशिककरांशी संवाद साधणार आहेत.
आज भांड यांचे वय जवळपास ७० वर्षे. पर्यटनाची आवड म्हणून काही लोक प्रवास करतात, तर काही लोक आपल्याला मिळालेला मानवी देह सार्थकी लावण्यासाठी घेतलेले व्रत पूर्ण करत असतात. नर्मदा परिक्रमा हा त्यातीलच एक भाग असल्याचे भांड यांचे मत. भांड यांनी आजवरच्या नर्मदा परिक्रमेमध्ये हजारो मैल अंतर पार केले. यामध्ये त्यांना अनेक माणसे भेटली. ठिकठिकाणी अगदी वेगवेगळ्या स्वभावाची, वृत्तीची, प्रवृत्तीची माणसे भेटली. त्यांचे अनेक अनुभव परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर भांड जाहीरपणे सांगतात. नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात याबाबतचे प्रकट मनोगत भांड यांनी सविस्तरपणे कथन केले आहे. परिक्रमा मार्गातील बराचसा प्रवास हा घनदाट अरण्य, डोंगर-दर्या, जलाशयांचा परिसर, काट्याकुट्यांचा रस्ता, आदिवासी पाडे, ओबडधोबड कच्चा रस्ता. अगदी हिंस्र श्वापदांचाही धोका असतो. पण, भांड म्हणतात तसे, या सगळ्या आव्हानांचा सामना केल्यानंतरच परिक्रमेचे पुण्य पदरात पडते. अखंड भारतवर्षातील हजारो साधू, महंत, तपस्वी यांची नर्मदेच्या परिक्रमेदरम्यान भेट झाली. या प्रवासामध्ये त्यांना नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या ठिकठिकाणच्या आश्रमातील सेवाभावी लोकांनी सहकार्यही केले. सकाळी उठल्यानंतर नर्मदा नदीतच स्नान करून मौनव्रत स्वीकारून आपण परिक्रमा सुरू करत असल्याचे भांड सांगतात. दिवसभर ऊन, वारा, पाऊस यांची कुठलीही तमा न बाळगता, अखंडपणे चालत राहणे आणि येणार्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत राहणे, अशा पद्धतीने सुमारे चार महिन्यांत ही प्रदक्षिणा त्यांनी पूर्ण केली. पर्यावरणावर आणि वैयक्तिक श्रद्धास्थानांवर त्यांच्या असणार्या निष्ठेचेच हे फळ! यातून व्रतस्थ होऊन नर्मदा परिक्रमा ते करतात. जशी ते नर्मदा परिक्रमा करतात, त्याचप्रमाणे ते संत गजानन महाराजांचे उपासकही आहेत. या श्रद्धेपोटी त्यांनी मागील २५ वर्षांपासून नाशिकच्या अंबड परिसरातून ‘सायकलवारी’ला प्रारंभ केला.
सुरुवातीची ही ‘सायकलवारी’ भांड एकटेच करायचे. मात्र, आता या सायकलवारीमध्ये माणसे जोडत गेली आणि एका माणसावर सुरू केलेल्या या ‘सायकलवारी’मध्ये आता १०० माणसे जोडली गेली असून, दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. ‘सायकलवारी’मुळे महाराष्ट्रभरातून नाशिक जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळाली. नाशिक जिल्ह्यातून शेगावला प्रथम जाणारी ‘सायकलवारी’ म्हणून शेगाव संस्थाननेही भांड यांच्या सायकलवारीची २०१६ मध्ये ‘विशेष वारी’ म्हणून नोंद घेतली आहे.
कुठल्याही वैयक्तिक हेतूने प्रेरित होऊन प्रल्हाद भांड यांनी कोणत्याच गोष्टी केल्या नाहीत. त्यांची नर्मदा परिक्रमा सुरू असतानाच, त्यांच्या पत्नी चंद्रकला यांचे आकस्मिक निधन झाले. संपूर्ण कुटुंबावरच शोककळा पसरली. परिक्रमेत असणार्या प्रल्हाद यांना घरी कसे बोलवावे आणि पत्नीच्या निधनाची बातमी त्यांना कशी द्यायची, हा पेच सर्वांसमोरच पडला होता. तरीही, भांड कुटुंबीयांनी नर्मदा परिक्रमेत असलेल्या प्रल्हाद यांना तो निरोप दिला. निरोप ऐकून ते काहीसे व्यथित झाले. मात्र, आपले नर्मदा परिक्रमेचे व्रत सुरूच ठेवले. मोबाईलवरून आपल्या पत्नीचे अंत्यदर्शन घेत ‘आता मी काही येत नाही, तुम्ही अंत्यविधी उरकून घ्या,’ असा निरोप त्यांनी घरच्यांना देत दुसर्याच क्षणाला परिक्रमेला सुरुवात केली.
साधारणपणे एक महिन्यानंतर नर्मदा परिक्रमा करून प्रल्हाद भांड घरी परतले. आपल्या पत्नीच्या वियोगाचे दुःख त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होते. मात्र, या घटनेचा कोणताही परिणाम त्यांच्या जीवनावर आणि श्रद्धा संकल्पनांवर कधीच झाला नाही.
सध्या ते ओझरजवळील जानोरी येथील ‘नर्मदामाता माधवबाबा गोशाळे’त गोसेवा करत आहेत. नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एक ‘सेवाव्रती’ म्हणून त्यांची ओळख. आपल्या जीवनामध्ये कोणतेही प्रापंचिक प्रयोजन ठेवून मार्गक्रमण न करणार्या प्रल्हाद यांचा हा प्रवास खर्या अर्थाने प्रेरणादायी असाच. आध्यात्मिक जीवन व्यतित करत असताना संत जनार्दन स्वामी, ‘सरला बेटा’चे महंत नारायणगिरी महाराज, नेवासा येथील ‘देवगड संस्थान’चे किसनगिरी महाराज, नर्मदासेवक सियाराम बाबा या संतांचा त्यांना सहवास लाभला. अशा या श्रद्धावान कर्मयोग्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा!