ठाकरेंच्या काळात सिद्धिविनायक मंदिर दानपेटीत घोटाळा; दै.मुंबई तरुण भारतने केलेल्या वार्तांकनाचा हवाला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा विधानपरिषदेत ठाकरेंवर हल्लाबोल

Siddhivinayak Donation Box Scam
 
मुंबई : (Siddhivinayak Donation Box Scam) मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्या पत्रकार परिषदेनंतर 'सिद्धिविनायकाला धोके, ‘मातोश्री’वर खोके?' या मथळ्याखाली दैनिक मुंबई तरुण भारतने केलेल्या सखोल वृत्तांकनाची विधानपरिषदेत दखल घेण्यात आली. डिसेंबर, 2022 मधील या वृत्ताचा हवाला देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कथित राम मंदिर दानपेटी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून महायुती वर आरोप करणाऱ्या उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत जोरदार प्रत्युत्तर देत आरसा दाखविला.
 
दरम्यान, डिसेंबर २०२२ मध्ये मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषद घेऊन सिद्धिविनायक मंदिरातील कथित अनागोंदी कारभाराचा आरोप करत, 'सिद्धिविनायकाला धोके, मातोश्रीवर खोके' अशी टीका केली होती. या प्रकरणाचे पडसाद नागपूर येथे झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले होते. उपस्थित लक्षवेधीवर उत्तर देताना राज्य सरकारने सिद्धिविनायक मंदिर न्यास हा धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित येत असल्याचे स्पष्ट करत, चौकशी अहवालानुसार आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते.(Siddhivinayak Donation Box Scam)
 
'सिद्धिविनायकला धोके, मातोश्रीवर खोके' असे यशवंत किल्लेदार यांनी म्हटले होते. त्याचाच दाखला मी दिला. श्री सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी चोरीचा आरोप झाला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्याच्या चौकशीचे आदेश का दिले नाही? जे लोक आज राममंदिराविषयी बोलतात, रामरक्षा पठण करतात ते आधी राम मंदिराची चेष्टा करायचे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदीर बनवले. राम मंदिर हा तमाम भक्तांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे जे झाले त्याचा तपास सुरु असून यात कोणालाही सोडले जाणार नाही. ना मैं खाऊंगा और ना खाने दुंगा ही मोदीजींची भूमिका आहे. त्यामुळे मोदीजी आणि योगीजी हे चुकीचे काम करणाऱ्यांना तुरुंगात पाठवतील.(Siddhivinayak Donation Box Scam)
 
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
 
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत सिद्धिविनायक मंदिर न्यासातील कथित आर्थिक अनियमिततांबाबत मोठा खुलासा केला आहे. मंदिराच्या निधी, देणग्या आणि खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला असून, हे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. ज्याप्रमाणे राम मंदिर दानपेटी घोटाळ्यातील आरोपींवर अटकेची कारवाई होते आहे. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक दानपेटी घोटाळ्याची चौकशी करून अटकेची कारवाई करावी.
 
- कृष्णा हेगडे, शिवसेना प्रवक्ते
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर