मुंबई : (Eknath Shinde) सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, जलसंधारण, पुनर्विकास आणि नागरिकाभिमुख विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना केले. (Eknath Shinde)
मुंबईतील मेगा काँक्रीट रस्ते प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ५७५ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील ९३ टक्के रस्ते काँक्रीटचे असतील, असे त्यांनी सांगितले. 'मिसिंग लिंक', अटल सेतू आणि मेट्रो प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम झाली असून मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी १३ हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण प्रकल्प केंद्राकडे सादर करण्यात आला असून त्याला तत्त्वतः मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde)
यंदा जूनअखेरपर्यंत राज्यात दुष्काळ व पाणीटंचाईची स्थिती होती. मात्र जुलैपासून मान्सून सक्रिय झाल्यानंतर काही भागांत अतिवृष्टी झाली. या पार्श्वभूमीवर सातारा, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील ३,३१८ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. आळंदी येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (Eknath Shinde)
राज्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असून महिला सुरक्षा, सायबर गुन्हे आणि अंमली पदार्था विरोधात शासनाने 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारल्याचे शिंदे म्हणाले. तसेच आयटी, डेटा सेंटर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि औद्योगिक गुंतवणुकीला चालना देतानाच 'लाडकी बहीण'सह विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट प्रणाली लागू करण्यात येणार असून जिओ-टॅगिंग, जीआयएस मॅपिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे. (Eknath Shinde)
मुंबईतील मोतीलाल नगर, बीडीडी चाळ, जीटीबी नगर, कामाठीपुरा, अभ्युदय नगर आदी पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात आली असून राज्यभर मढ-वर्सोवा पूल, ठाणे-बोरिवली बोगदा, पुणे रिंगरोड, विरार-अलिबाग मार्गिका, कोकण कोस्टल रोड, धरमतर-कारंजा पूल, सूरजागड मायनिंग कॉरिडॉर आणि पालघर येथील तिसऱ्या ऑफशोअर विमानतळासारखे महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (Eknath Shinde)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.