मुंबई : (Devendra Fadnavis Final Week Reply) विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भूमिका मांडत विरोधकांच्या आरोपांना आकडेवारीच्या आधारे प्रत्युत्तर दिले. कायदा-सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्हे, ड्रग्ज माफिया, पोलिस दलाचे आधुनिकीकरण, स्मार्ट मीटर, वीजपुरवठा, शेतकरी कर्जमाफी आणि कापूस-सोयाबीन खरेदीपर्यंत विविध विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी अनेक मोठ्या घोषणाही केल्या.
'भाडे के टट्टू'ऐवजी 'भाटक गदर्भ'
भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागील भाषणातील "भाडे के टट्टू" या शब्दप्रयोगाचा उल्लेख करत तो मागे घेत असल्याचे सांगितले. त्याऐवजी "भाटक गदर्भ" आणि " सुपारीबाज" म्हणत फेक नॅरेटिव्ह पसरविणाऱ्यांची फिरकी घेतली. तसेच "मी टोपी फेकली होती, ती अनेकांना का लागली हे मला समजले नाही," असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.
महाराष्ट्र गुन्हेगारीत पहिल्या क्रमांकावर नाही
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, गुन्हेगारीची तुलना करताना एकूण गुन्ह्यांऐवजी प्रति एक लाख लोकसंख्येवरील गुन्हे पाहिले जातात. त्या निकषानुसार महाराष्ट्र देशात सातव्या क्रमांकावर असून महिलांवरील गुन्ह्यांमध्ये नवव्या, तर बलात्काराच्या घटनांमध्ये सतराव्या क्रमांकावर आहे. "महाराष्ट्राला विनाकारण गुन्हेगारीत पहिला असल्याचे चित्र रंगवणे चुकीचे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले
मे २०२५ ते मे २०२६ या कालावधीत विनयभंग, जबरी चोरी, घरफोडी, चोरी आणि दुखापतीचे गुन्हे कमी झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांपर्यंत वाढल्याचा दावा केला. तसेच दोषसिद्धीचा दर ४४.२ टक्क्यांवरून ५२.६ टक्क्यांपर्यंत वाढल्याचेही त्यांनी सांगितले. नव्या फौजदारी कायद्यांमुळे तपास आणि न्यायप्रक्रियेला अधिक वेग मिळाल्याचा दावा त्यांनी केला.(Devendra Fadnavis Final Week Reply)
एआयवर आधारित 'तपास सारथी'
राज्य पोलिसांनी देशातील पहिले पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'तपास सारथी' हे तपास साधन विकसित केल्याची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, एफआयआरपासून आरोपपत्रापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आता डिजिटल होणार आहे. स्पीच-टू-टेक्स्ट, स्वयंचलित पंचनामे, ब्लॉकचेनद्वारे पुरावे जतन करणे अशा सुविधा या प्रणालीत असतील.(Devendra Fadnavis Final Week Reply)
सायबर गुन्ह्यांवर मोठी कारवाई
सायबर फसवणुकीतील ४३९ कोटी रुपये गोठवण्यात आले असून ६.७६ लाख मोबाईल क्रमांक ब्लॉक, तीन लाखांहून अधिक मोबाईल ट्रेस आणि दीड लाखांहून अधिक हँडसेट जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र सायबरच्या मदतीने सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे आत्महत्येपासून २३७ जणांचे प्राण वाचविण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला. डिजिटल अरेस्ट घोटाळ्यात पाच राज्यांमधून ३३ आरोपींना अटक केल्याचे त्यांनी सांगितले.(Devendra Fadnavis Final Week Reply)
ड्रग्ज माफियांवर मोठा प्रहार
मे २०२६ अखेर ४११ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय एमडी सिंडिकेटचा सूत्रधार सलीम डोला याला परदेशातून अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबईत चार, ठाण्यात एक आणि नागपुरात विशेष एनडीपीएस न्यायालय सुरू करण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत ४० हजार पोलिस घरे
मुंबईतील ७४ मोक्याच्या सरकारी भूखंडांवर ४० हजार पोलिस निवासस्थाने उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. याचबरोबर मुंबईत ९३ अत्याधुनिक पोलिस ठाण्यांची उभारणीही प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राने ७३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली.(Devendra Fadnavis Final Week Reply)
स्मार्ट मीटरवर सरकारची भूमिका
स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याचा आरोप फेटाळताना फडणवीस म्हणाले की, राज्यात १.२३ कोटी स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून केवळ ०.०१७ टक्के तक्रारीच सत्य आढळल्या. यंदाच्या प्रदीर्घ उष्णतेच्या लाटेमुळे वीज वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिले वाढल्याचा दावा त्यांनी केला.
कर्जमाफीवर विरोधकांना उत्तर
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी योजना असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांनी ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. यापूर्वीच्या कर्जमाफीतील लाभार्थ्यांवरील अटी शिथिल करण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.(Devendra Fadnavis Final Week Reply)
कापूस, सोयाबीन आणि कांदा खरेदी
सरकारने ७,७१० रुपये प्रतिक्विंटल दराने १३६ लाख क्विंटल कापूस खरेदी करून १०,८८३ कोटी रुपयांचे देयक अदा केले आहे. सहा लाख टन सोयाबीन खरेदीसाठी ३,१९८ कोटी रुपये दिले असून कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केल्याची माहितीही त्यांनी दिली.
कायदा-सुव्यवस्था आणखी मजबूत करण्याचा निर्धार
भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, फॉरेन्सिक तपास, विशेष न्यायालये आणि पोलिस दलाचे आधुनिकीकरण या माध्यमातून व्यापक बदल केले जात आहेत. "राज्याच्या सुरक्षेशी तडजोड होणार नाही," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Devendra Fadnavis Final Week Reply)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.