नव्या पिढीतील वाचक घडवण्यासाठी चर्चगेटवर देशातील पहिले मोफत ‘लायब्ररी जंक्शन’

    09-Jun-2026   
Public Library
 
मुंबई : (Public Library) 'आजची मुलं-मुली फक्त मोबाईलमध्येच रममाण असतात. हल्ली वाचनसंस्कृतीला उतरती कळा लागली आहे' अशी वाक्यं आपल्या कानावर नेहमीच पडत असतात. अर्थात यावर उपाय म्हणून काम करणारी माणसं आणि संस्था अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच असतात.
 
मात्र आता नव्या पिढीतील वाचकांना घडवण्यासाठी, प्रौढांच्या हातामध्ये पुन्हा एकदा पुस्तक देण्यासाठी देशातील पहिले मोफत लायब्ररी जंक्शन चर्चगेट येथे काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार एबी डी व्हिलियर्स यांच्या हस्ते या लायब्ररी जंक्शनचे उद्धाटन पार पडले. या प्रसंगी पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागीय रेल्वे प्रबंधक पंकज सिंह आणि प्रोजेक्ट मुंबईचे सीईओ व संस्थापक शिशिर जोशी उपस्थित होते.
 
 
लायब्ररी जंक्शन हा प्रोजेक्ट मुंबईच्या रीड मुंबई उपक्रमाचा भाग असून सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे पुस्तके उपलब्ध करुन देणे आणि वाचन संस्कृतीला चालना देणे हा त्यामागील उद्देश आहे. मुंबईतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या चर्चगेट येथे दैनंदिन प्रवासादरम्यान पुस्तकांच्या सहवासाचा आनंद घेता येणार आहे.
 
सदर ग्रंथालयात इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असली तरी इतर भाषांमधील पुस्तकं वाचक इथे दान करु शकतात. या ग्रंथालयाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याची उभारणी प्रोजेक्ट मुंबईच्या ‘प्लास्टिक रिसायक्लाथॉन’ मोहिमेदरम्यान संकलित करण्यात आलेल्या पुनर्वापरित प्लास्टिकपासून करण्यात आली आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.(Public Library)
 
लायब्ररी जंक्शनची वैशिष्ठ्ये
 
देशातील पहिले मोफत सार्वजनिक रेल्वे स्थानक ग्रंथालय
सुमारे १,२०० पुस्तकांचा संग्रह.पुस्तके दोन आठवड्यांसाठी घरी नेण्याची सुविधा
सोमवारी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत ग्रंथालय सर्वांसाठी खुलं
नागरिकांकडून पुस्तकं स्विकारली जातील
पुनर्वापरित प्लास्टिकपासून ग्रंथालयाच निर्मिती.(Public Library)
 
 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर