शेअर बाजारातील ‘फ्रॉड रिस्क’

    26-Jun-2026   

Stock Market Fraud Risks
 
गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदार वाढले आहेत. डिजिटल बदलामुळे गुंतवणूक करणे सोपे झाले आहे. याचा फायदा घेत फसवणूक करणारेही वेगवेगळ्या लृप्त्या शोधून काढत आहेत. सोशल मीडियातील टिप्स, बनावट अ‍ॅप, खोटे सल्लागार आणि ‘पंप-अ‍ॅण्ड-डम्प’सारख्या योजनांमुळे अनेकांची कष्टाची कमाईही धोक्यात येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी फक्त ‘मार्केट रिस्क’ नव्हे, तर ‘फ्रॉड रिस्क’बाबतही दक्ष राहावयास हवे. त्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
शेअर बाजारातील व्यवहार वाढल्याचे आपल्याला ‘डी-मॅट’ खात्यांच्या वाढत्या संख्येवरून लक्षात येते. डिजिटल क्रांतीमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणे सोपे झाले असले, तरी याचा फायदा घेऊन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणारे फसवणूक करणार्‍यांचे लक्ष्य असतात. अनेकदा गुंतवणूकदार अर्धवट माहितीच्या आधारे किंवा सोशल मीडियावरील ‘इन्फ्लुएन्सर्स’मुळे स्कॅमरच्या जाळ्यात अडकतात. रिटेल गुंतवणूकदारांना लक्ष्य करण्यासाठी नवनवीन युत्या लढविल्या जातात. कधी व्हॉट्सअ‍ॅपवर ‘फ्री टिप्स’ दिल्या जातात, तर कधी खोट्या अ‍ॅपचा आधार घेतला जातो. अशा फसवणुकींपासून वाचण्यासाठी शेअर बाजारात व्यवहार करणे सुरू करण्यापूर्वी ‘मार्केट रिस्क’सोबतच ‘फ्रॉड रिस्क’ समजून घ्यायला हवे.
 
कृत्रिम तेजीचा सापळा
 
‘पंप-अ‍ॅण्ड-डम्प’ हा शेअर बाजारातील जुना, पण आजही प्रभावी असलेला ‘स्कॅम’ आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मायक्रो कॅप’ किंवा अत्यल्प उलाढाल असलेल्या शेअरची निवड केली जाते. ‘स्कॅमर्स’ आधी कमी भावात हे शेअर खरेदी करतात. त्यानंतर सोशल मीडिया, टेलिग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून त्या शेअरबद्दल खोट्या सकारात्मक अफवा पसरविल्या जातात. जेव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात, तेव्हा शेअरचा भाव कृत्रिमरीत्या वाढतो. एकदा भाव शिखरावर पोहोचला की, ‘स्कॅमर’ आपले शेअर विकून बाहेर पडतात. त्यानंतर शेअरचा भाव कोसळतो आणि छोटे गुंतवणूकदार अडकतात. ‘फ्री स्टॉक टिप्स’च्या मागे कधीही धावू नका. ‘मायक्रो कॅप शेअर’मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः अभ्यास करा. गुंतवणुकीसाठी नेहमी ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. अनेक व्यक्ती स्वतः ‘मार्केट एस्पर्ट’ म्हणून मिरवितात; पण त्यांच्याकडे ‘सेबी’चा परवाना नसतो. असे महिन्याला निश्चित परतावा, दुप्पट पैसे अशी आश्वासने देतात. प्रत्यक्षात, ते गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून गायब होतात. याचे उदाहरण - एका गुंतवणूकदाराने फेसबुकवर एका ‘इन्व्हेंस्टमेंट फर्म’ची जाहिरात पाहिली. महिन्याला दहा टक्के परताव्याचे आश्वासन दिले जात होते. या गुंतवणूकदाराने दिलेल्या नंबरवर फोन केला. समोरच्या व्यक्तीने सांगितले की, ‘आम्ही तुमची रक्कम शेअर बाजारात गुंतवतो. तुम्हाला काहीही करायची गरज नाही. फक्त आम्हाला पैसे पाठवा.’ या गुंतवणूकदाराने सुरुवातीला ५० हजार रुपये दिले. पुढच्या महिन्यात त्याला पाच हजार रुपये परतावा मिळाला. त्यामुळे त्याचा विश्वास बसला. त्याने ‘पीएफ’मधून पाच लाख रुपये काढून ते गुंतवले. काही दिवसांनी त्या फर्मचे फोन बंद झाले. कार्यालयाचा पत्ता खोटा निघाला आणि तो सल्लागार कधीच सापडला नाही.
 
यासाठीचे उपाय काय?
 
सल्लागाराचा ‘सेबी’ नोंदणी क्रमांक तपासा. गुंतवणूक नेहमी स्वतःच्या पॅनकार्डवर आधारित खात्यातूनच करा. तुमच्या गुंतवणुकीची माहिती घेण्यासाठी ‘सीडीएसएल’ किंवा ‘कॅम्स’कडून येणारे ‘कन्सोलिडेटेड अकाऊंट स्टेटमेंट’ (सीएएस) नियमित तपासा. ‘यूपीआय’द्वारे पैसे भरताना यूआर कोडवर'Green Thumbs up' किंवा 'SEBI Registered Intermediary' चिन्ह तपासा. ‘गॅरेंटेड रिटर्न’पासून किंवा असे सांगणार्‍यांपासून सावध राहा.
 
आज अनेक बनावट ट्रेडिंग अ‍ॅप्स ‘प्ले-स्टोअर’वर उपलब्ध आहेत. हे अ‍ॅप्स नामांकित ब्रोकरच्या अ‍ॅपसारखेच दिसतील. गुंतवणूकदार पैसे भरतात. अ‍ॅपमध्ये नफा दिसतो. पण, प्रत्यक्षात पैसे बाजारात गुंतवलेलेच नसतात. याचे उदाहरण, रेल्वेतून निवृत्त झालेल्या एका व्यक्तीने एका टेलिग्राम समूहाच्या सांगण्यावरून असेच एक अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यांनी पाच लाख रुपये गुंतवले. काही दिवसांनी अ‍ॅपमध्ये सात लाख रुपये रक्कम झाल्याचे दिसले. पैसे काढण्याच्या प्रयत्न करताना त्यांना ‘२० टक्के दराने टॅस भरा,’ असे सांगण्यात आले. त्यांनी आणखी एक लाख रुपये भरले; पण पैसे मिळाले नाहीत. शेवटी त्यांना अ‍ॅप बनावट असल्याचे समजले. यावर उपाय - फक्त ‘सेबी’ नोंदणीकृत ब्रोकरकडेच ‘डी-मॅट’ खाते उघडा. अनोळखी अ‍ॅप डाऊनलोड करू नका. नामांकित ब्रोकरलाच प्राधान्य द्या.
 
‘डी मॅट’ खाते हॅकिंग
 
तुमच्या ‘डी-मॅट’ खात्याची सुरक्षा तुमच्या हातात आहे. हॅकर्स अनेकदा ‘केवायसी अपडेट’च्या नावाखाली फोन करून ‘ओटीपी’ मिळवितात. ‘ओटीपी’ मिळाल्यानंतर ते खात्यातील शेअर विकू शकतात किंवा तुमच्या खात्यातून व्यवहार करू शकतात. याचे उदाहरण, एका व्यक्तीने नुकतेच एका नामांकित ब्रोकरकडे खाते उघडले होते. त्याला एका अज्ञात नंबरवरून फोन आला की, तुमचे ‘केवायसी अपडेट’ नाही. खाते बंद होईल. घाबरून त्याने फोनवर आलेल्या लिंकवर लिक करून ‘ओटीपी’ शेअर केला. काही मिनिटांत त्याच्या खात्यातील सर्व शेअर विकल्याचा मेसेज आला. पैसे दुसर्‍याच्या खात्यात वळते झाले होते. यावर उपाय - ‘ओटीपी’, पिन किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. कोणताही अधिकृत ब्रोकर फोनवर ‘ओटीपी’ मागत नाही. ‘टू-फॅटर ऑथेंटिकेशन’ (२एफए) सुरू ठेवा. संशयास्पद लिंकवर लिक करू नका. तांत्रिक मदतीसाठी अधिकृत सल्लागाराशी संपर्क करा.

शेअर बाजार शिक्षण फ्रॉड
 
अनेक ‘फिन्फ्लुएन्सर्स’ शिक्षणाच्या नावाखाली महागडे शिक्षण अभ्यासक्रम विकतात. मात्र, प्रत्यक्षात ते विशिष्ट शेअरची खरेदी-विक्री सुचवितात. याचे उदाहरण, एकाने २५ हजार रुपये भरून एका ‘इन्फ्लुएन्सर’चा ‘मास्टर लास’ जॉईन केला. तांत्रिक विश्लेषण शिकविण्याऐवजी विशिष्ट शेअर खरेदी करण्यास सांगितले गेले. परिणामी, लाससाठी शुल्क भरलेल्याचे मोठे नुकसान झाले. यावर उपाय - सल्ला आणि शिक्षण यांतील फरक ओळखा. जो तुम्हाला ‘काय खरेदी करा’ म्हणून सांगतो, तो सल्लागार आणि जो तुम्हाला ‘कसे निवडायचे’ हे शिकवितो, तो शिक्षक! शिक्षणासाठी अधिकृत पुस्तके किंवा शिक्षणक्रमाचा आधार घ्या. फक्त ‘सेबी’ नोंदणीकृत रिसर्च अ‍ॅनलिस्टचीच मदत घ्या.
 
अनलिस्टेड शेअर फ्रॉड
 
‘अनलिस्टेड शेअर’ म्हणजे शेअर बाजारात नोंदणी न झालेले शेअर. ‘स्कॅमर’ ‘आयपीओ’पूर्वी स्वस्तात शेअर देण्याचे आमिष दाखवितात. याचे उदाहरण, एका इसमाला फोन करून सांगण्यात आले की, एका प्रसिद्ध टेक कंपनीचा ‘आयपीओ’ येणार आहे आणि सध्या २०० रुपयांत शेअर मिळतील. त्या इसमाने एक लाख रुपये पाठवले. शेअर कधीच ‘डी-मॅट’ खात्यात आले नाहीत आणि ब्रोकर गायब झाला. यावर उपाय - फक्त विश्वासार्ह वेल्थ मॅनेजमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीद्वारेच व्यवहार करा. कंपनीच्या ‘आयपीओ’विषयी अधिकृत माहिती तपासा. व्यवहारापूर्वी ‘सेबी’ नोंदणी पडताळा.
 
शेअर बाजारासंबंधी गुंतवणुकीचा सल्ला देणार्‍यांची संख्या सध्या प्रचंड वाढली आहे. मात्र, ऐकीव माहितीवर अजिबात गुंतवणूक करू नका. ते धोकादायक ठरू शकते. शेअर बाजार हा नशिबाचा खेळ नसून, त्यासाठी अभ्यास, संयम आणि योग्य धोरण हवे. आर्थिक वा गुंतवणुकीच्या नियोजनासाठी केवळ ‘सेबी’ नोंदणीकृत तज्ज्ञांवरच विश्वास ठेवला पाहिजे. तसेच गुंतवणूकदारांची जागृकताही तिततकीच महत्त्वाची आहे.

‘सेबी’चा नवा नियम
 
‘सेबी’ने अलीकडेच शेअर बाजार शैक्षणिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, कोणी व्यक्ती किंवा संस्था शेअर बाजाराचे शिक्षण देत असेल, तर त्यांना ‘लाईव्ह मार्केट’मध्ये कोणतेही सल्ले किंवा विश्लेषण देता येणार नाही. शैक्षणिक उद्देशासाठी वापरला जाणारा डेटा हा किमान तीन महिने जुना असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचा मुख्य उद्देश असा आहे की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना फक्त संकल्पना शिकवावी आणि चालू बाजारात शेअर खरेदी-विक्री करायला लावून त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकता कामा नये. एखादा शिक्षक ‘लाईव्ह मार्केट’मध्ये चार्ट दाखवून ‘आता खरेदी करा,’ असे सांगत असेल, तर ते बेकायदा मानले जाईल.
 
‘सेबी’ नोंदणी सल्लागार कसा ओळखावा?
 
१. ‘सेबी’च्या अधिकृत साईटवर जा. www.sebi.gov.in.. २. सेशन Enforcement मधील Intermediaries/Registered हा पर्याय निवडा. ३. तुम्ही शोधत असलेला प्रकार Advisor किंवा Research Analyst निवडा. ४. त्या व्यक्तीचे नाव किंवा नोंदणी क्रमांक (Registration Number) feed करून शोधा. ५. यादीत नाव नसेल तर तो, अनधिकृत समजा 
 
फसवणूक झाल्यास काय करावे?
 
१. सायबर हेल्पलाईन १९३० वर कॉल करा. २. सायबर पोर्टल www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. ३. ‘सेबी’च्या स्कोर्स (SCORES) पोर्टलवर तक्रार करा. ४. व्यवहार बँकेतून झाला असेल, तर संबंधित खाते त्वरित ‘ब्लॉक’ करा. सर्व व्यवहारांचे स्क्रीनशॉट आणि पुरावे जतन करा.
Stock Market Fraud Risks




शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.
संबंधित मजकूर