मुंबई (अक्षय मांडवकर) - कोल्हापूर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या 'अखिल भारतीय व्याघ्र गणने'च्या सर्वेक्षणाअं
ती चंदगड आणि आजरा या दोन तालुक्यांमध्ये व्याघ्र अधिवास आढळून आला आहे (kolhapur tiger). या सर्वेक्षणात वाघांची एकूण १३ छायाचित्र टिपण्यात आली असून कोल्हापूर वन विभागाच्या मते त्यामध्ये तीन ते चार वाघांचा समावेश असू शकतो (kolhapur tiger). महत्त्वाचे म्हणजे यामध्ये राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सर्वेक्षण कालावधी सोडल्यास इतर वेळी टिपल्या गेलेल्या वाघांचा समावेश नाही (kolhapur tiger). त्यामुळे राधानगरी आणि प्रादेशिक वनक्षेत्रातील वाघ धरल्यास कोल्हापूर जिल्ह्यात साधारण सात ते आठ वाघ असण्याची शक्यता आहे. (kolhapur tiger)
कोल्हापूर वन विभागाने अखिल भारतीय व्याघ्र गणेनेअंतर्गत जिल्ह्यात नुकतीच व्याघ्र गणना पूर्ण केली. अखिल भारतीय वाघ गणना हा जगातील सर्वात मोठा वन्यजीव सर्वेक्षण कार्यक्रम मानला जातो. भारतातील वाघांची संख्या, त्यांचे वितरण, अधिवासाची स्थिती आणि संवर्धनाची परिणामकारकता जाणून घेण्यासाठी दर चार वर्षांनी ही गणना केली जाते. यामध्ये कॅमेरा ट्रॅपिंग, चिन्ह सर्वेक्षण, अधिवास मूल्यांकन आणि सांख्यिकीय विश्लेषण या प्रकियेद्वारे ही गणना पार पडते. या सर्वेक्षणामध्ये वन विभागाने एकूण २३ वन्यजीव प्रजातींची नोंद केल्याची माहिती कोल्हापूरचे (प्रादेशिक) उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. यामध्ये वाघांची एकूण १३ छायाचित्र टिपल्याचे त्यांनी सांगितले. ही छायाचित्र प्रामुख्याने चंदगडमधील पाटणे आणि आजरा तालुक्यात टिपल्याचे त्यांनी नमूद केले. जरी १३ छायाचित्र टिपली गेली असली तरी पट्टेरी रचनेवरुन ही छायाचित्रे तीन ते चार वाघांची असल्याची शक्यता त्यांनी नमूद केली.
टिपल्या गेलेल्या तीन ते चार वाघांमध्ये राधानगरी वन्यजीव अभयारण्यातील वाघांचे समावेश नाही. राधानगरीत सध्या तीन नर वाघांचा अधिवास असून त्यांची गणना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून पार पडलेल्या व्याघ्र गणनेत झाली आहे. याखेरीच कोल्हापूर वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर, २०२५ मध्ये जलद कृती बचाव दलाच्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये एका वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले होते. अशा सर्व वाघांची संख्या पाहता कोल्हापूर जिल्ह्यात वाघांची संख्या ही सात ते आठच्या संख्येत असण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय व्याघ्र गणनेत टिपण्यात आलेली वाघांची ही १३ छायाचित्र पुढील तपासणीकरिता
'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'कडे (एनटीसीए) तपासणीकरिता पाठविण्यात आली आहेत.
कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय वाघ गणनेकरिता एकूण १५० वनकर्मचाऱ्यांनी काम केले. यामध्ये वाघासोबतच खवले मांजर, पिसोरी हरीण, रानकुत्र्यांसारख्या संकटग्रस्त प्राण्यांची नोंद झाली आहे. टिपण्यात आलेले वाघ हे ट्रान्सिट स्वरुपात कोल्हापूर जिह्ल्यात वावरत आहेत. - धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, कोल्हापूर (प्रादेशिक)