कीर स्टार्मरची ‘एक्झिट’ आणि मजूर पक्षाची धूळधाण

    26-Jun-2026   

Keir Starmer Resignation
 
ब्रिटनमधील सत्ताधारी मजूर पक्षाच्या नेतृत्वाला लागलेल्या गळतीच्या परिणामस्वरुप नुकताच पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. बृहत मँचेस्टर शहराचे महापौर अ‍ॅण्डी बर्नहॅम यांनी मेकरफील्ड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत घवघवीत विजय संपादित केल्याने, तेच आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीलाही सामोरे जातील. त्यानिमित्ताने ब्रिटनमधील एकूणच राजकारणाची दशा आणि दिशा यांचे विश्लेषण करणारा हा लेख...
 
अवघ्या दोन वर्षांत ब्रिटनमध्ये दोन तृतीयांश बहुमताने निवडून आलेले सर कीर स्टार्मर यांचे सरकार कोसळले आहे. दि. २२ जून २०२६ रोजी स्टार्मर यांनी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले. त्यांचा निर्णय होण्यापूर्वी २४ तास आधी जेव्हा त्यांचे समर्थक स्टार्मर राजीनामा देणार नाहीत, असे सांगत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टार्मर राजीनामा देणार असल्याचे घोषित करून त्यांच्या जखमांवर मीठ चोळले. त्यांच्या राजीनाम्याचे तत्कालिक कारण म्हणजे, बृहत मँचेस्टर शहराचे महापौर अ‍ॅण्डी बर्नहॅम यांनी मेकरफील्ड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ‘रिफॉर्म यूके’ पक्षाच्या रॉब केनयॉन यांच्यावर नऊ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. त्यांना ५५ टक्क्यांहून अधिक मते मिळाली. सर कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली. ब्रिटनमध्ये पंतप्रधान हा सत्ताधारी पक्षाचा नेता असतो. पक्षांतर्गत नेतृत्वाला म्हणजेच, सत्ताधारी पक्षाच्या बाबतीत पंतप्रधानांना आव्हान देणे शक्य असते. बर्नहॅम आणि स्टार्मर यांच्यात लढत झाली असती, तर स्टार्मर यांचा पराभव निश्चित असल्यामुळे त्यापूर्वीच कीर स्टार्मर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
 
दि. १७ जुलै २०२६ रोजी मजूर पक्षांतर्गत नेता निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. सध्याच्या परिस्थितीत केवळ अ‍ॅण्डी बर्नहॅम अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहतील असे दिसते. त्यांची निवडणूक बिनविरोध होईल, असे चित्र आहे. यापूर्वीच, स्टार्मर यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी राजीनामे दिले होते. त्यांच्या सरकारमध्ये आरोग्य सचिव असलेले वेस स्ट्रीटिंग त्यांना आव्हान देतील, अशी अपेक्षा होती. पण, अ‍ॅण्डी बर्नहॅम यांच्या विजयामुळे त्यांनी बर्नहॅम यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. बर्नहॅम यांच्या सरकारमध्ये स्ट्रीटिंग अर्थ सचिव म्हणून काम करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
स्टार्मर वयाच्या पन्नाशीनंतर राजकारणात आले. त्यापूर्वी एक नावाजलेले वकील म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष टोकाच्या डाव्या, तसेच इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारांच्या प्रभावातून बाहेर आला. पक्षाला डाव्या-मध्यम मार्गावर आणून हुजूर किंवा कॉन्झर्वेटिव्ह पक्षासमोर आव्हान उभे केले.
 
‘ब्रेझिट’च्या निर्णयानंतर ब्रिटनमधील राजकीय स्थैर्यावर परिणाम झाला असून, २०१६ ते २०२४ याकाळात हुजूर पक्षाचे पाच नेते पंतप्रधान झाले. २०२४ सालच्या निवडणुकीत हुजूर पक्षाच्या अंतर्गत लाथाळ्यांना कंटाळून त्यांच्या अनेक मतदारांनी आणखी उजव्या विचारसरणीच्या ‘रिफॉर्म यूके’ या पक्षाला मतदान केले. ‘रिफॉर्म यूके’ला १४.३ टक्के मते पडली असली, तरी अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले. मजूर पक्षाला अवघी ३३.७ टक्के मते मिळाली असली, तरी त्यांना ६५० पैकी ४१२ जागांवर विजय मिळवला. या विजयाचे श्रेय सर कीर स्टार्मर यांना मिळाले. पण, हे चित्र फसवे होते. आपल्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे, या समजातून त्यांनी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेली आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याचा भाग म्हणून करवाढ करण्यात आली. विविध सवलतींना कात्री लावण्यात आली. त्यामुळे त्यांच्या अनेक मतदारांच्या मनामध्ये रोष निर्माण झाला. स्टार्मर यांच्या कारकिर्दीत बेकायदेशीर घुसखोरांचे लोंढे काही प्रमाणात कमी झाले असले, तरी आत घुसलेल्या लोकांबाबत उपाययोजना करण्यात त्यांच्या सरकारला अपयश आले.
 
१९९७ ते २०१० याकाळात ब्रिटनमध्ये डाव्या विचारांच्या मजूर पक्षाचे सरकार असताना, तेथे पाकिस्तानमधून स्थायिक झालेल्या लोकांनी हजारो श्वेतवर्णीय शाळकरी मुलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले. एका अहवालानुसार, सुमारे अडीच लाख मुली या शोषणाला बळी पडल्याचे समोर आले. या मुलींनी तक्रार केल्यास पोलिसांकडून ती नोंदवली न जाणे, तसेच पाकिस्तानी तरुणांकडे अंगुलीनिर्देश केल्यास तक्रार करणार्‍यांना वर्णद्वेषी किंवा इस्लामचे द्वेष्टे ठरवण्यात आले. हे प्रकार चालू असताना पंतप्रधान कीर स्टार्मर ब्रिटनच्या ‘महाभियोगा’चे संचालक होते. ही गोष्ट ते पंतप्रधान झाल्यानंतर समोर आल्यामुळे त्यांच्याविरुद्ध असलेल्या रोषामध्ये वाढ झाली. स्टार्मर यांनी अमेरिकेच्या राजदूतपदी निवडलेले पीटर मँडलसन यांची जेफ्री एपस्टीनशी घनिष्ठ मैत्री असल्याचे समोर आले. इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धात स्टार्मर यांनी ब्रिटनच्या सहभागास नकार दिला असला, तरी अमेरिकेच्या विमानांनी ब्रिटनच्या तळांवरून उड्डाण केल्याचे स्पष्ट झाले. स्टार्मर सरकारने ‘पॅलेस्टिनियन अ‍ॅशन’ या गटावर इस्रायली लोकांविरुद्ध चिथावणीखोर भाषा वापरल्यामुळे बंदी घातली. त्यामुळे मजूर पक्षाचे मतदार असलेले डाव्या विचारांचे आणि मुस्लीम समाजाचे अनेक लोक नाराज झाले.
 
मे २०२६ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मजूर पक्षाचा दारुण पराभव झाला. देशभरातील एकूण पाच हजार, ३६ जागांपैकी मजूर पक्षाला अवघ्या एक हजार, ६८ जागा मिळाल्या. त्यांना गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये एक हजार, ४९६ जागा कमी मिळाल्या. पक्षाचे अभेद्य गड समजल्या जाणार्‍या लंडन, मध्य आणि उत्तर इंग्लंड आणि वेल्स या भागांत अनेक ठिकाणी पक्षाला पराभव पत्करावा लागला. गेल्या निवडणुकीत दोन जागा मिळवणार्‍या ‘रिफॉर्म यूके’ या पक्षाला तब्बल एक हजार, ४५३ जागा मिळाल्या. एरव्ही, मुख्य प्रवाहातील राजकारणात फारसे यश न मिळणार्‍या अतिडाव्या आणि पर्यावरणवादी ‘ग्रीन्स’ पक्षाला ५८७ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या ४४१ जागा वाढल्या. तेव्हापासून स्टार्मर यांच्या राजीनाम्यासाठी असलेला दबाव अधिक तीव्र झाला. सरकारकडून अपेक्षित असलेला कणखरपणा दाखवण्यात स्टार्मर कमी पडले. ब्रिटनमधील राजकारण कूस बदलत असून, पारंपरिकदृष्ट्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे ‘मजूर’ आणि ‘हुजूर’ हे दोन्ही पक्ष कमकुवत होत असून, त्यांची जागा ‘ग्रीन्स’ आणि ‘रिफॉर्म यूके’ असे नवीन पक्ष घेत आहेत. असेच जर सुरू राहिले, तर २०२८ साली होणार्‍या संसदीय निवडणुकीत मजूर पक्षाची धूळधाण उडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
ब्रिटनचे पंतप्रधान होऊ पाहणारे अ‍ॅण्डी बर्नहॅम २००१ ते २०१७ संसद सदस्य होते. ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची सत्ता असताना त्यांनी आरोग्यमंत्री, तसेच सांस्कृतिकमंत्री म्हणून काम पाहिले होते. २०१७ साली त्यांनी बृहत मँचेस्टर शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकांत विजय मिळवला. ‘कोविड-१९’ काळात ब्रिटन सरकारकडून आखल्या गेलेल्या नियमांविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना ‘उत्तर इंग्लंडचे राजे’ म्हटले जाते. मँचेस्टर हे शहर तेथील कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. पण, १९७०च्या दशकात तेथील अनेक गिरण्या बंद पडल्यामुळे शहराला अवकळा आली. १९९०च्या दशकात मँचेस्टर शहराला नवीन ओळख मिळू लागली. तरी, शहराची ओळख ‘श्रमजीवींचे शहर’ अशी होती. बर्नहॅम यांनी प्रशासनाचे विकेंद्रीकरण, सार्वजनिक गृहनिर्माण, तसेच वाहतुकीमध्ये गुंतवणूक, खासगीकरण केलेल्या बस वाहतुकीचे सरकारीकरण, कौशल्यविकास आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांना चालना अशा अनेक गोष्टी केल्या.
 
ब्रिटनमध्ये ‘ब्रेझिट’ला बहुमताचा पाठिंबा मिळाला. कारण, देशाची लंडन महानगर क्षेत्र आणि उर्वरित भाग अशी विभागणी झाली आहे. लंडनच्या बाहेरील सामान्य लोकांना आपण देशाचा भाग नाही, लंडनमध्ये घर घेणे, उच्चशिक्षण घेणे किंवा रोजगार मिळवणे आपल्या आवायाबाहेर आहे, असे वाटू लागले. मजूर पक्षासाठीही पारंपरिक श्रमिक वर्गापेक्षा लंडन आणि अन्य महानगरात आलेले स्थलांतरित लोक जास्त महत्त्वाचे ठरले. अ‍ॅण्डी बर्नहॅमच्या निवडीने मजूर पक्षाला ब्रिटनच्या राजकारणात स्वतःचे स्थान टिकवण्याची शेवटची संधी मिळाली आहे. ते या संधीचे सोने करतात का, हे पाहावे लागेल.




अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.

संबंधित मजकूर