विदर्भात वाघ, बिबटे आणि माणसांमधील संघर्ष कमी करण्यासाठी झटणार्या राकेश रमेश आहुजा याच्याविषयी...
वाघ आणि माणूस यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी आयुष्य झोकून देणार्या या तरुणाची वाटचाल प्रेरणादायी आहे. चंद्रपूरच्या एका सामान्य युवकापासून मानव-वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनातील विश्वासार्ह तज्ज्ञ बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास जिद्द, धैर्य आणि समर्पणाची कहाणी सांगतो. वन्यजीव संवर्धनासोबतच स्थानिक समुदायाचा विश्वास जिंकत सहअस्तित्वाचा मार्ग शोधणारा हा खरा ‘मानव-वन्यजीव संघर्षातील योद्धा’ आहे, राकेश रमेश आहुजा.
राकेशचा जन्म चंद्रपूरमध्ये दि. १० ऑगस्ट १९९५ साली झाला. वन्यजीवांचा काही गंध नसलेल्या लहानग्या राकेशला जंगलाची मात्र ओढ होती. कारण, घरापासून सात-आठ किलोमीटर अंतरापासूनच जंगल सुरू होई. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान, २०१४ मध्ये देशभर ’अश्रश्र खपवळर ढळसशी एीींळारींळेप’ ही महत्त्वपूर्ण व्याघ्रगणना मोहीम सुरू होती. त्याकाळात ‘वाईल्डलाईफ कॅान्झर्वेशन ट्रस्ट’ (डब्ल्यूसीटी) आणि ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ (डब्ल्यूआयआय) यांनी संयुक्तपणे काही व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात व्याघ्रगणनेचे काम केले. या कामासाठी ‘डब्ल्यूसीटी’ने राकेश याची चारचाकी भाडेतत्त्वावर घेतली होती. या गाडीवर सुरुवातीचे काही दिवस त्याचा भाऊ चालक म्हणून जाई. मात्र, जंगलात राहणे जड जाऊ लागल्यावर त्याने राकेशला या कामात जुंपले. वन, वन्यजीव आणि त्यांच्यासाठी काम करणार्या लोकांविषयी कुतूहल असल्याने ‘डब्ल्यूसीटी’च्या संशोधकांसोबत राकेशही जंगलात जाऊ लागला आणि खर्या अर्थाने त्याला जंगलाची पायधुळी लागली.
‘डब्ल्यूसीटी’सोबत काम करत असताना राकेशने प्रथमच जंगलातील संशोधन, कॅमेरा ट्रॅपिंग, निरीक्षण आणि वन व्यवस्थापन यांचे प्रत्यक्ष काम जवळून अनुभवले. तेथूनच त्याच्या वन्यजीव क्षेत्रातील प्रवासाला खरी दिशा मिळाली. यानंतर तो कॅमेरा ट्रॅपिंग प्रकल्पामध्ये सहभागी झाला. महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील विविध जंगलांमध्ये, व्याघ्र प्रकल्पांमध्ये, अभयारण्यात, तसेच संरक्षित क्षेत्राबाहेरील जंगलांमध्ये कॅमेरा ट्रॅपिंगचे त्याने काम केले. त्याच्या टीमने व्याघ्र व बिबट्यांची संख्या निश्चित करण्यासाठी निरीक्षण करून त्यासंबंधित अहवाल तयार केले. याकाळात त्याला जंगल, वन्यजीवांचे वर्तन, निरीक्षणाच्या पद्धती आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याबाबत शिकायला मिळाले. २०१७ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागामध्ये मानव-व्याघ्र संघर्षाची अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ‘डब्ल्यूसीटी’ने या कामाची जबाबदारी राकेशला दिली. सर्व साधनांसह राकेश ब्रह्मपुरीला पोहोचला आणि अथक प्रयत्नांनंतर संघर्षासाठी कारणीभूत असणार्या वाघिणीला सुरक्षितरीत्या पकडण्यात यश आले. या काळात राकेशला बाहेरील जंगलांसाठी काम करण्यापेक्षा आपल्या परिसरातील जंगल आणि संघर्ष समजून घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे जाणवले. त्यानंतर त्याने ब्रह्मपुरी वनविभागातील मानव-वन्यजीव संघर्ष, व्याघ्रांची हालचाल आणि निरीक्षण यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
२०१८ मध्ये त्याने ‘डब्ल्यूसीटी’मधील काम थांबवले. ब्रह्मपुरी वनविभागाशी संपर्क साधला. तत्कालीन उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी त्याला ब्रह्मपुरी वनविभागासाठी ‘बायोलॉजिस्ट’ शोधण्यास सांगितले. परंतु, ब्रह्मपुरीमध्ये काम करण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. शेवटी सिंह यांनी राकेशलाच या पदावर काम करण्याची संधी दिली. आवश्यक शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे राकेश सुरुवातीस संकोचला होता. परंतु, सिंह यांनी त्याला पाठिंबा दिला आणि नव्या कामास सुरुवात झाली. दि. ३१ ऑटोबर २०१८ पासून राकेश ब्रह्मपुरी वनविभागासोबत काम करत आहे. संघर्षग्रस्त भागात काम करताना त्याने ९८हून अधिक मानवहानीच्या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. याशिवाय, २०पेक्षा अधिक संघर्षग्रस्त परिस्थितीला कारणीभूत असणार्या वाघांच्या पकड मोहिमांमध्ये सहभाग घेतला असून, अनेक बिबटे आणि इतर वन्यप्राण्यांच्या बचावकार्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचे काम केवळ प्रत्यक्ष मोहिमांपुरते मर्यादित नाही, तर महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील वन कर्मचारी आणि ‘रॅपिड रिस्पॉन्स’ संघांना प्रशिक्षण देणे आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष हा केवळ वनविभागाचा विषय नसून, तो ग्रामीण समाजाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असतो. त्यामुळे राकेशने गावागावांत जाऊन लोकांच्या समस्या समजून घेण्यावर भर दिला आहे. नुकसानभरपाईची प्रक्रिया सुलभ करणे, सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे आणि संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना राबविणे, या कामांत त्याने विशेष लक्ष घातले आहे. त्याच्या मते, संवर्धन यशस्वी व्हायचे असेल; तर स्थानिक समुदायाला त्याचा भागीदार बनविणे आवश्यक आहे. जंगल आणि गावांच्या सीमावर्ती भागात ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बसवून वाघ आणि मानवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे कामही तो करत आहे. यामुळे संभाव्य धोयाची माहिती तत्काळ वन कर्मचार्यांपर्यंत पोहोचवून गावकर्यांना वेळेवर सतर्क करता येते. सध्या तो बंगळुरूस्थित ‘एनसीबीएस’ संस्थेसोबत ब्रह्मपुरी परिसरातील वाघांच्या आहाराचा अभ्यास करत आहेत. "वन्यजीव आणि मानव या दोघांच्याही सुरक्षित सहअस्तित्वासाठी काम करणे, हेच माझे ध्येय आहे आणि मी हे कार्य भविष्यातही पूर्ण समर्पणाने करत राहीन,” असा विश्वास तो व्यक्त करतो. त्याला पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!