गितेंचा दराडेंना धोबीपछाड

 
Nashik Legislative Council Election
 
नाशिकमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय नाट्यावर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्या विजयाने अखेर पडदा पडला असून गिते यांच्या विजयाने भाजपची विधान परिषदेत एका जागेने ताकद वाढल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल लागेपर्यंत ही निवडणूक फक्त गिते बंधूंच्या आजूबाजूला फिरल्याचे दिसून आले. अगदी प्रचार सोडून दराडे बंधूंनी गोकुळ गिते यांची मनधरणी करण्यात वेळ खर्ची घातला. इतका गोकुळ गितेंचा त्यांनी धसका घेतला होता. गितेंची मनधरणी करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांना नाशिकमध्ये ठाण मांडून नाकदुर्‍या काढाव्या लागल्या. त्यात भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश आल्याने गोकुळ गिते यांनी पत्रकार परिषद घेत प्रचार थांबविण्याची घोषणा करत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र तो केवळ दिशाभूल करण्यासाठी असल्याचे आता निवडणूक निकालावरुन स्पष्ट झाले.
 
त्यात गोकुळ गिते यांची स्वच्छ प्रतिमा आणि कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाण्याच्या गुणामुळे शेवटच्या काही दिवसांत कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेत गितेंची नौका पैलतिरी लावली. त्यामुळे हॉटेल पॉलिटीक्स करुनही नरेंद्र दराडे यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. शिवसेना शिंदे पक्षाकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्वकियांबरोबरच मित्र पक्षांनीही त्यांच्या उमेदवारीला नाक मुरडले होते. पण पक्षनेतृत्वाने बळजबरी उमेदवार थोपवण्याचे काम केले. त्याचे पर्यावसन शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवात झाले. तरीही विधान परिषद निवडणुकीचा सारासार विचार केला तर हा पराभव ना महायुतीचा आहे, ना शिवसेना शिंदे पक्षाचा. हा पराभव सर्वस्वी नरेंद्र दराडे आणि त्यांच्या एकूण कार्यपध्दतीचा असल्याचे आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे यांचा एककल्ली स्वभाव, कार्यकर्त्यांचा वानवा आणि गेल्या आठ वर्षांत निवडून दिलेल्या मतदारांकडे फिरवलेली पाठ यामुळेच दराडे पराभवाचे धनी झाले. आता या पराभवातून बोध घेऊन इतरांवर आगपाखड करण्यापेक्षा दराडे बंधूंनी आत्मपरिक्षण करावे.
 
स्वभावाने केला घात
 
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांचा निकाल लागल्यापासून राज्यभर फक्त नाशिकच्या निवडणुकीचीच चर्चा सुरु आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी करुनही महायुतीच्या उमेदवाराचा झालेला पराभव झालाच कसा? असा प्रश्न शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना पडला असेल. पण, या प्रश्नातच काहीसे उत्तर दडलेले आहे. नरेंद्र दराडे यांच्यासाठी पहिल्या दिवसापासून परिस्थिती काही आलबेल नव्हती. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाशिकमधील हेवीवेट नेते अन्न, औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत अनेक वेळा दराडे बंधूंनी उघड पंगा घेतला. त्यामुळे संपूर्ण निवडणुकीदरम्यान मंत्री भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते कोठेही दिसून आले नाहीत. त्यात उबाठा गटातून शिवसेना शिंदे पक्षात उमेदवारीसाठी गेलेल्या नरेंद्र दराडे यांना महाविकास आघाडीनेही झटका देत मतदानाचे भरभरुन दान गोकुळ गिते यांच्या झोळीत टाकले.
 
त्यात नांदगावचे आमदार सुहास कांदे पत्नी अंजुम कांदे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे चांगलीच फिल्डींग लावली होती. पण, त्यात आमदार कांदे यांना अपयश आल्याने त्यांनीही म्हणावे तसे लक्ष घातले नाही. त्यात नरेंद्र दराडे आणि आमदार किशोर दराडे यांच्या हेकेखोर स्वभावामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले गेले. आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा आणि आम्हाला निवडूण आणण्याची जबाबदारी महायुतीच्या नेत्यांची असल्याच्या अविर्भावात राहिल्यानेच त्यांचा घात झाला. अगदी मतदानाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दराडेंना मतदान करण्यासाठी मतदारांना गळ घालत पदरमोड करावी लागली. तरीही अनेक नगरसेवक दराडेंना मतदान करण्यास इच्छुक नव्हते. म्हणूनच पराभवाची माळ गळ्यात पडल्यानंतर आपल्या मूळ स्वभावावर जात आमदार किशोर दराडे यांनी गोकुळ गिते यांना माध्यमांसमोर अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. तर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनीही भाजपवर आगपाखड करण्याचेच काम केले. आता पुढील सहा वर्षे मूळ स्वभावाला मुरड घालून दराडेंनी लोकांमध्ये मिसळावे, एवढीच अपेक्षा.




विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.
संबंधित मजकूर