राजकीय पक्षात कार्यकर्त्यांकडून निष्ठावान होण्याची किमान अपेक्षा बाळगण्यापूर्वी सर्वप्रथम पक्षनेतृत्वानेही आपण आपल्या विचारसरणीप्रती किती एकनिष्ठ राहिलो? सत्तेच्या लालसेपोटी आपण एकत्र निवडणुका लढलेल्याला मित्रापक्षाबरोबर दगाफटका केला का? यांसारख्या प्रश्नांतून खरे तर आत्मचिंतन करण्याची आज नितांत गरज आहे. विचारांशी नाळ तुटल्यावर अल्पकालीन लाभ पदरात पडत असले, तरी दीर्घकालीन त्याचे दुष्परिणामच भोगावे लागतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे! त्यामुळे परवाच्या खासदारफुटीनंतर उद्धव ठाकरेंचे डोळे उघडले तर ठीक, अन्यथा असेच धक्के त्यांना वरेचवर सहन करावे लागतील.
उद्धव सेनेतून खासदार फुटले, याचे दुःख उद्धव ठाकरे यांना जेवढे झाले नाही; तेवढे उद्धवसमर्थक पत्रकारांना झाले आणि ते पत्रकार असल्यामुळे आपल्या दुःखाचे कारण ते सांगू लागले, ते असे- राजकारणात आता निष्ठा राहिल्या नाहीत, पक्षाचे आमदार-खासदार जर अशा प्रकारे पक्ष सोडून जाऊ लागले; तर लोकशाहीचे काय होणार? आयाराम-गयारामची राजनीती उत्तर प्रदेश आणि हरियाणात सुरू झाली. तिची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होत आहे, हे दुर्दैव आहे. या सर्व आलापाचा समाचार पुढे घेऊया. प्रथम शिवसेना कशी आणि केव्हा अस्तित्वात आली ते पाहूया...
शिवसेनेचा जन्म 1966 साली झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ साप्ताहिकातून मराठी माणसाच्या व्यथा मांडल्या. मुंबई-ठाणे परिसरातील मराठी तरुणांच्या हृदयाला त्या स्पर्श करून गेल्या आणि तो जागा झाला. आपल्या अधिकारांसाठी आणि अस्तित्वासाठी तो बाळासाहेबांच्या पाठी उभा राहिला. महानगरपालिकेची शिवसेनेची पहिली निवडणूक मला आठवते. तेव्हा मी गुंदवली नावाच्या छोट्या गावठाणात राहात होतो. वस्ती सर्व गरिबांची होती. हे गरीब तरुण स्वतःचा पैसा खर्च करून ब्रश आणि डबा घेऊन ‘शिवसेनेला मतदान करा’ या घोषणा लिहायला जात असत. सभांना स्वतःचा पैसा खर्च करून स्वतःच्या घरचे अन्न खाऊन, नाहीतर उसळपाव खाऊन जात असत. तेव्हा मी ‘इंटर’मध्ये होतो. त्या वयात जेवढी राजकीय समज असायला हवी, तेवढी होती. कारण, जनआंदोलनाच्या वातावरणात मी वाढलो.
बाळासाहेबांनी निष्ठावान शिवसैनिक उभे केले. बाळासाहेबांचा कोणताही शब्द ते पडू देत नसत. कारण, बाळासाहेबांचे नेतृत्व तसे होते. ते अत्यंत निर्भय होते, प्रामाणिक होते, सत्तेसाठी लाचावलेले नव्हते, सत्तेच्या पदाची त्यांना ओढ नव्हती. मुंबईत मराठी माणूस जगला पाहिजे, एवढी एकच आकांक्षा होती. अनुयायांत निष्ठा उत्पन्न करण्यासाठी निष्ठेला समर्पित नेता असावा लागतो. विश्वासघात करून मुख्यमंत्र्याच्या खुचवर बसणारा नेता, केवळ अधिकार लालसेची निष्ठा निर्माण करू शकतो, पक्षाची आणि विचारांची निष्ठा निर्माण करू शकत नाही.
बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानले. महाराजांनी निष्ठावंत अनुयायांची फौज निर्माण केली. समोर साक्षात मृत्यू दिसत असताना खिंड लढवणारे बाजीप्रभू देशपांडे, पुरंदराचा किल्ला लढवणारे मोरारबाजी देशपांडे, आग्य्राच्या कैदेत पाय चेपणारा मदारी मेहतर अशी किती नावे सांगावी? महाराज ही निष्ठा निर्माण करू शकले. कारण, महाराजांनी सर्वांच्या मनावर हे बिंबविले की, आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे आहे. स्वराज्याचे ‘सुराज्य’ निर्माण करायचे आहे. प्रत्येकजण या ध्येयासाठी लढू लागला आणि प्रसंगी प्राणही देऊ लागला. निष्ठा दोन हात बाजूला करून, टोमणे मारून, विश्वासघात करून, वर नाक करून निर्माण होत नसते. त्यासाठी प्रखर ध्येयवाद लागतो. एक भव्य स्वप्न स्वतः बघावे लागते. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतीचा आराखडा ठेवावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केले आणि बाळासाहेबांनीही मोठ्या प्रमाणात हेच केले. पण, आता सगळे संपले आहे.
महाराजांनी निर्माण केलेल्या निष्ठेचा प्रवाह किती प्रबळ होता, याचे एक उदाहरण इतिहासकार न. र. फाटक यांनी एका भाषणात दिले. भोरजवळील एका किल्ल्यात सहलीसाठी तरुण गेले होते. किल्लेदार तटावरून खाली अक्षता टाकत होता. हा काय करतो, याचे नवल वाटून एका तरुणाने प्रश्न केला, “तुम्ही तटावरून अक्षता का टाकता?” त्यावर किल्लेदार म्हणाला, “खाली गावात माझ्या नातवाचे लग्न चालू आहे, त्याच्या अक्षता मी टाकतो आहे.” त्या तरुणाने किल्लेदाराला विचारले, “लग्नासाठी तुम्ही गावात का नाही गेलात?” त्यावर किल्लेदार म्हणाला, “मी कसा जाणार? महाराजांचा हुकूम आहे की, त्यांच्या परवानगीशिवाय किल्लेदाराने किल्ला सोडता कामा नये.” आज महाराज हयात नाहीत, तर परवानगी कुणाकडे मागायची?” हा प्रसंग एखादी दंतकथाही असू शकते. परंतु, त्यात एक तथ्य दडलेले आहे. हे तथ्य एकांतिक निष्ठेचे आहे.
या साऱ्या निष्ठा आता राहिल्या नाहीत. ‘आता महाराष्ट्राचे काय होणार?’ असले रडगाणे जे गात बसले आहेत, त्यांना ते गाऊ द्यावे. तेवढाच त्यांचा दुःखभार हलका होईल. उद्धवसेनेतून जे शिंदेसेनेत गेले आहेत, त्यांनी शिवसेना सोडलेली नाही, बाळासाहेबांचा विचारही सोडलेला नाही आणि बाळासाहेबांप्रति असलेली निष्ठाही सोडलेली नाही. ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सोडून गेले आहेत. या दोघांच्या राजकीय कर्तृत्वाविषयी न लिहिलेले बरे! जे सर्वजण जाणतात, ते लिहिण्यात काही अर्थ नसतो.
आता लोकशाहीकडे येऊया. लोकशाहीत जनता मतदान करते. या मतदारांचे दोन प्रेरक असतात. 1) उमेदवार आणि त्यांची प्रतिमा, 2) राजकीय पक्ष आणि त्याचे कर्तृत्व. या दोन गोष्टी बघून नागरिक मतदान करतात. शिवसेनेला मतदान करणारा मतदार मराठी अस्मिता, हिंदुत्व, मुस्लीम तुष्टीकरणविरोध, पाकिस्तानसमर्थक दहशतवादविरोध, जीवनाची सुरक्षा, रोजगाराची सुरक्षा, या मुद्द्यांना धरून मतदान करतो. पक्षनेतृत्व जेव्हा हे सगळे मुद्दे गुंडाळून ठेवून ‘असंगाशी संग’ करते, त्यांचे निर्लज्ज समर्थन करते, तेव्हा जनतेची भावना अशी होते की, आपला विश्वासघात झालेला आहे. अल्पकाळाच्या स्वार्थासाठी विचारांना तिलांजली देण्यात आली आहे. आमदार-खासदार जनतेचे प्रतिनिधित्व करतात, त्यांना जनतेच्या इच्छा-आकांक्षांचा सन्मान करावाच लागता. म्हणून, ते शिवसेनेच्या अस्सल प्रवाहात सामील झाले आहेत. ‘ते फुटले, पळाले, विकले गेले, गद्दार आहेत’ इत्यादी वाक्ये आपण या कानाने ऐकायची आणि त्या कानाने सोडून द्यायची. बोलण्याचे विषय संपले की, शिव्या सुरू होतात. ते ऐकण्याचे आणि वाचण्याचे बंधन आपल्यावर नाही.
लोकशाही राजवट नीट चालण्यासाठी विचार आणि कार्यक्रमाला समर्पित राजकीय पक्ष लागतात. त्यातील एखादा राजकीय पक्ष सत्तेवर येतो, दुसऱ्या राजकीय पक्षाला विरोधाची भूमिका घ्यावी लागते. आज सत्तेत असलेला भाजप कैक दशके सत्तेपासून दूरच होता. परंतु, भाजपच्या नेत्यांनी सत्तेच्या लालसेने कधी वैचारिक तडजोड केली नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते कुठल्या प्रलोभनाला बळी पडले नाहीत. ‘आम्ही एक विचार रुजविण्यासाठी राजकारणात आहोत’ ही वैचारिक निष्ठा त्यांनी कधी सोडली नाही. ही त्यांची राजकीय तपश्चर्या होती. या तपश्चर्येने जनतारूपी जनार्दन प्रसन्न झाला आणि या जनार्दनाने भाजपला सत्तेवर बसविले. लोकशाही सुदृढ करण्याचा अन्य दुसरा मार्ग नाही. जोपर्यंत आज महाराष्ट्रात सत्तेवर असलेले राजकीय पक्ष आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहतील, तोपर्यंत महाराष्ट्रात लोकशाहीचे संवर्धनच हाईल. उद्धवसेनेने त्यांच्यापुढे एकनिष्ठ राहण्याचे फळ काय मिळते, हे नकारात्मकदृष्ट्या का होईना, दाखवून दिले आहे.
9869206101