ज्योतिषशास्त्र, सामुद्रिकशास्त्र आणि ढोंगी पुरोगामी


प्राध्यापिका ॲलिसन बॅशफोर्ड या ऑस्ट्रेलियाच्या ‌‘न्यू साऊथ वेल्स‌’ विद्यापीठात शिकवतात. साधारणपणे ऑस्ट्रेलिया म्हटले की, कांगारू आणि डॉन ब्रॅडमन एवढेच आपल्याला माहीत असते. पण, बॅशफोर्ड बाईंसारखे विविध विषयांवर संशोधन आणि साक्षेपी लेखन करणारे लोकही तिथे आहेत. ‌‘डीकोडिंग द हँड‌’ या आपल्या ताज्या पुस्तकात बॅशफोर्ड बाईंनी चक्क ‌‘हस्तसामुद्रिकशास्त्र‌’ या विषयाचा विज्ञान, इतिहास, सामाजिक घडामोडी अशा विविध अंगांनी वेध घेतलेला आहे.

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक कै. मोरोपंत पिंगळे यांना सर्वसाधारण समाज ओळखतो, तो ‌‘अयोध्या आंदोलनाचे सेनानी‌’ म्हणून. मोरोपंतांचे भाषण म्हणजे लहानमोठ्या किश्श्यांची, चुटक्यांची मेजवानी असे. एकदा मोरोपंत म्हणाले, “मला एक हात पाहणारा ज्योतिषी भेटला. बराच वेळ माझा हात पाहून त्याने एक उसासा सोडला आणि म्हणाला, “वयाच्या 40व्या वर्षापर्यंत तुमचं आयुष्य फार खडतर आहे.” त्यावर मी त्याला मोठ्या आशेने विचारलं, “म्हणजे मग नंतरचं आयुष्य चांगलं जाईल का?” त्यावर ज्योतिषी म्हणाला, “तसं नव्हे! नंतर सवय होऊन जाईल खडतर आयुष्याची!”‌’

मोरोपंतांचा हा किस्सा ऐकून समोरच्या स्वयंसेवक श्रोत्यांमध्ये हास्यकल्लोळ होत असे. संघकार्यकर्त्यांला आयुष्यभर खडतर मार्गानेच वाटचाल करायची आहे, हे स्पष्ट शब्दांत न सांगता समजून जात असे.

ज्योतिषशास्त्र म्हणजे आकाशातल्या ज्योतिपुंज किंवा ग्रह-तारे यांच्या चलनवलनाचे निरीक्षणशास्त्र. पुढे याचे दोन भाग झाले. ग्रहगोलांचे भ्रमण अभ्यासणारे ते ‌‘खगोलशास्त्र‌’ किंवा ‌‘ॲस्ट्रोनॉमी‌’ आणि ग्रहगोलांच्या भ्रमणाचा पृथ्वीवरील मानवी जीवनावर काय परिणाम होतो किंवा होईल, याचे भाकीत वर्तवणारे ते ‌‘फलज्योतिषशास्त्र‌’ किंवा ‌‘ॲस्ट्रोलॉजी‌’.

निकोलस कोपर्निकस या महान खगोलशास्त्रज्ञाने आधुनिक खगोलविज्ञानाचा पाया घातला, असे मानले जाते. तो 15व्या शतकात होऊन गेला. त्याच्यानंतर गॅलिलिओ गॅलिली, जोहान्स कॅपलर आणि टायको ब्राही या खगोलतज्ज्ञांनी लावलेल्या विविध शोधांच्या आधारे आजचे खगोलशास्त्र अवघ्या ब्रह्मांडाचा वेध घेऊ पाहत आहे.

याउलट, फलज्योतिषशास्त्राचे सिद्धांत प्रत्येक वेळी खरे ठरताना आढळत नाहीत. आधुनिक विज्ञान म्हणते की, एखादा सिद्धांत सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व लोकांना डोळ्यांनी पाहून, कानांनी ऐकून आणि बुद्धीने समजून घेऊन पडताळून पहाता येत असेल, तरच तो वैज्ञानिक म्हणता येईल. फलज्योतिषाच्या बाबतीत असा अनुभव येतो की, काही ज्योतिषांचीच भाकिते खरी ठरतात. सर्वांची ठरत नाहीत. असे का? याला उत्तर नाही. त्यामुळेच आधुनिक निकषांवर ते विज्ञान ठरत नाही.

इथे एक वैयक्तिक घटना नोंदवतो. माझे स्वत:चे आजोबा उत्तम ज्योतिषी होते. मात्र, ते व्यवसाय म्हणून कधीच ज्योतिष सांगत नसत. आमच्या सगळ्या आत्ते-चुलत भावंडांमधला एक भाऊ अगदी पहिलीपासून अत्यंत हुशार होता. साहजिकच, त्याला मेडिकलला जायचे होते. आजोबांनी कुंडली पाहून त्याला सल्ला दिला की, “मेडिकल हा तुझा मार्ग नाही. तू रिसर्चला जा.” तो जिद्दीला पेटला. भविष्य खोटे करूनच दाखवेन, या ईर्ष्येने त्याने रात्रंदिवस अभ्यास केला. पण, प्रत्यक्षात घटना अशा काही घडत गेल्या की, त्याला मेडिकलऐवजी रिसर्चलाच जावे लागले. तिथे त्याने एकऐवजी दोन ‌‘डॉक्टरेट‌’ मिळवल्या. पुढे कित्येक वर्षांनी मी माझ्या एका काकांना, ‌‘असे का झाले असावे?‌’ असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या जो काही खुलासा केला, तो माझ्या पूर्णपणे डोक्यावरून गेला. त्यांचे विवेचन मला ‌‘बंपर‌’ जात आहे, हे अर्थातच त्यांना लगेचच कळले. त्याक्षणी ते थांबले आणि म्हणाले, “ज्योतिषशास्त्रात ग्रहांची भ्रमणे, स्थाने, राशी, नक्षत्रे, युती, ग्रहांची एकमेकांवर शुभ किंवा अशुभ दृष्टी हा सगळा अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास आणि गणिती आकडेमोड तर महत्त्वाची आहेच; पण खरा उत्तम ज्योतिषी कोण? तर ज्याच्या मेंदूमधली ‌‘ज्योतिष्मती‌’ नामक प्रज्ञा जागृत झालेली असते तो. बुद्धी, मेधा, प्रज्ञा, धृति, धी या सगळ्या शब्दांचा अर्थ सामान्यतः एकच म्हणजे बुद्धी, हुशारी असा मानला जातो. पण, तसा तो नाही. ज्याची ‌‘ज्योतिष्मती‌’ नामक प्रज्ञा जागृत होते, त्याने एखाद्याची जन्मकुंडली हातात घेतली की, त्या कुंडलीतले ग्रह जणू त्याच्याशी संवाद करतात. यामुळे त्याने वर्तवलेले भाकीत कधीच चुकत नाही.” आता हे ऐकल्यावर साहजिकच मी प्रश्न विचारला की, “ही ज्योतिष्मती प्रज्ञा कशी जागृत होऊ शकते?” यावर ते एवढेच म्हणाले की, “हा सगळा अतींद्रिय विज्ञानाचा प्रांत आहे. आजचे पाश्चिमात्य वैज्ञानिक या शास्त्राला विज्ञान मानतच नाहीत आणि एकापरीने त्यांचे बरोबरच आहे. कारण, यातल्या घटना, नियम, सिद्धांत कोणत्याही प्रयोगशाळेत तपासता येत नाहीत.”

असो. तर फलज्योतिष पाहण्यासाठी कुंडली लागते. त्यासाठी आकडेमोड आली. गणित आले. साधारणपणे गणिताची सर्वांचीच बोंब असते. पण, ‌‘सामुद्रिकशास्त्र‌’ त्या तुलनेत सोपे आहे. सामुद्रिक म्हणजे मूलत: चेहरा, अवयव, अंगावरील जन्मखुणा यांवरून भविष्य वर्तवण्याचे शास्त्र. पुन्हा त्यातला बारकाव्याचा भाग म्हणजे माणसाचा हात. हातावरच्या रेषा, हाताची ठेवण, बोटांचा आकार यांवरून त्या माणसाची स्वभाव वैशिष्ट्ये आणि त्याचे भविष्य वर्तवता येते. त्यालाच म्हणतात ‌‘हस्तसामुद्रिकशास्त्र.‌’

सध्याचे वैज्ञानिक हस्तसामुद्रिकशास्त्रालाही विज्ञान मानत नाहीत. पण, भारतातल्या तर सोडाच, झाडून सगळ्या पाश्चिमात्य लोकांचा हस्तसामुद्रिकशास्त्रावर प्रचंड विश्वास असतो. प्रत्येक व्यक्तीजवळ त्याचा हात असतोच. तो फक्त दाखवायचा असतो. कुंडली मांडणे, गणित करणे वगैरे भानगड नाही. त्यामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये ‌‘पामिस्ट्री‌’ किंवा ‌‘कीरोमॅन्सी‌’ या नावाने हे शास्त्र भलतेच लोकप्रिय आहे. पश्चिमेत सगळ्या प्राचीन विद्यांचा उगम ग्रीसमध्ये झाला, असे मानण्यात येते. प्राचीन ग्रीक विद्वान म्हणतात की, हात बघून भविष्य वर्तवण्याची ही कला आम्हाला भारताकडून मिळाली. ‌‘कीरो‌’ किंवा ‌‘कायरो‌’ हा प्राचीन ग्रीक शब्द ‌‘कर‌’ म्हणजे ‌‘हात‌’ या शब्दाच्या खूपच जवळचा आहे.

आता आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर ‌‘जोशी‌’ या नावाचा एक संपूर्ण ज्ञातिसमाज खेडोपाडी भटकत असायचा. यांना कुडमुड्या जोशी, पिंगळा जोशी किंवा ‌‘पिंगुळ‌’ असेही म्हटले जात असे. एक प्रकारे हे लोक भिक्षाच मागायचे. पण, याआधी ते चेहऱ्यावरून किंवा हात पाहून भविष्य सांगायचे. आधुनिक नागरीकरणाच्या प्रचंड रेट्यात आज हा समाज अस्तित्वात तरी आहे की नाही? असलाच तर तो काय करतो? कसा जगतो? हे सगळेच खरेतर संशोधनाचे विषय आहेत.

आता यासंदर्भात आपण एका अजब वल्लीबद्दल जाणून घेऊया. काउंट लुई ल वॉर्नर डि हामोन उर्फ विल्यम जॉन वॉर्नर हा आयर्लंडमध्ये जन्मला. वयाच्या 19-20व्या वष तो भारतात आला. त्याच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार, एक दिवस मुंबईला अपोलो बंदरावर निरुद्देश भटकत असताना त्याला एक जोशी भेटला. या जोशाने याचा हात पाहिला आणि तो त्याला स्वतः बरोबर कोकणातल्या कुठल्याशा गावी घेऊन गेला. तिथे त्याने याला हस्तसामुद्रिकशास्त्र आणि अंकशास्त्र यांचे संपूर्ण ज्ञान दिले. विल्यम वॉर्नर लंडनला परतला आणि हस्तसामुद्रिक म्हणजे ‌‘कीरोमॅन्सी‌’ या नावावरून त्याने स्वतःला ‌‘कीरो‌’ हे गूढ टोपणनाव घेतले. त्याने हात पाहून भविष्य वर्तवण्याचा व्यवसायच सुरू केला आणि बघता-बघता प्रथम इंग्लंडच्या आणि मग अमेरिकेतल्या वरिष्ठ राजकीय-सामाजिक वर्तुळात कीरो एकदम हीरो बनला. इंग्लंडमध्ये खुद्द राणी व्हिक्टोरिया, पंतप्रधान ग्लॅडस्टन, त्यावेळी एक उभरता राजकारणी असलेला विन्स्टन चर्चिल, जनरल रॉबर्ट किचनेट, साहित्यिक ऑस्कर वाईल्ड हे कीरोच्या अचूक भविष्यकथनाने भारावून गेले. अमेरिकेत प्रख्यात विनोदी लेखक मार्क ट्वेन आणि प्रख्यान संशोधक थॉमस आल्वा एडिसन कीरोचे चाहते बनले.

गंमत म्हणजे, इंग्लंडला हस्तसामुद्रिकशास्त्राचा परिचय यापूर्वीच 16व्या शतकात ‌‘जिप्सी‌’ या भटक्या जमातीमार्फत झाला होता. जिप्सी ही भटकी जमात मूळची उत्तर भारतातली समजली जाते. हे लोक इजिप्तमधून इंग्लंडमध्ये गेले म्हणून त्यांना प्रथम इजिप्सी आणि मग जिप्सी म्हणू लागले. जिप्सी महिला हात बघून भविष्य सांगण्यात फार पटाईत होत्या.

पण, त्यामुळे इंग्लंडचा प्रसिद्ध राजा आठवा हेन्री याला फार राग आला आणि त्याने या भविष्यकथनावर चक्क बंदी घातली. मुळात आठव्या हेन्रीचे आणि कॅथलिक पंथाचा प्रमुख जो पोप त्यांचे पार बिनसले होते. त्यामुळे हेन्रीने इंग्लंडमधून कॅथलिक चर्चची साफ हकालपट्टी करून इंग्लंडचे स्वतंत्र अँग्लिकन चर्च स्थापन केले. कॅथलिसिझमबरोबरच हात पाहून भविष्य वर्तवण्यावर पण बंदी आली. पण गंमत म्हणजे इंग्लंडचा प्रख्यात संशोधक आणि वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन हा हस्तसामुद्रिकशास्त्राचा चाहता होता. तो त्या विषयावरची पुस्तके आवडीने वाचत असे. आपल्याकडचे कथित पुरोगामी नेहमीच ज्योतिष वगैरे विषयांची टिंगल करत असतात आणि न्यूटन वगैरेंचे नाव काढले की, वैज्ञानिक श्रद्धेने गहिवरत असतात.

आपले आवडते पंडित चाचा नेहरू हे असेच पुरोगामी होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची गोष्ट. पंडित नेहरू हे पंतप्रधान होते आणि त्यांचे एक निष्ठावंत अनुयायी डॉ. संपूर्णानंद हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. डॉ. संपूर्णानंद हे अत्यंत विद्वान होते. ते स्वतः उत्तम ज्योतिषी होते. शिवाय, ते नेहरूंचे अनुयायी असले, तरी शेपूट हलवणारे अनुयायी नव्हते.

तर घडले असे की, काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात पंडित नेहरूंनी ज्योतिषशास्त्र या विषयाची टिंगल केली. डॉ. संपूर्णानंद तिथून जे निघाले, ते थेट बनारस हिंदू विद्यापीठाचे ज्योतिष विभागप्रमुख प्रा. राम व्यास यांच्याकडे जाऊन थडकले. काही काळापूव पंडित नेहरूंनी डॉ. संपूर्णानंदांना लिहिलेले एक पत्र त्यांनी राम व्यासांकडे दिले होते, ते त्यांनी परत घेतले.

आणि त्या संध्याकाळी डॉ. संपूर्णानंद, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश यांनी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा निषेध करणारे जाहीर पत्रक काढले. पंडित नेहरूंनी त्या पत्राद्वारे त्यांचे नातू राजीव आणि संजय यांच्या जन्मकुंडल्या बनवण्याचे काम आपल्याला दिले होते, हे सांगून डॉ. संपूर्णानंदांनी पत्रकात पुढे म्हटले होते की, पंडित नेहरू देशाला, समाजाला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवा, असा सल्ला देतात हे योग्यच आहे. पण, ज्योतिषाची टिंगल करण्यापूव ते विज्ञानाच्या कसोटीवर उतरते का, हे पडताळण्यासाठी प्रयोग मात्र करत नाहीत. करायला परवानगीही देत नाहीत. ही विज्ञाननिष्ठा आहे का?





मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.   

संबंधित मजकूर