असंख्य अमूल्य भेटवस्तूंचा खजिना देश-विदेशातील ग्राहकांना उपलब्ध करून देणाऱ्या, रोहिणी अभिजित चांदे यांच्याविषयी...
भारतीय संस्कृतीत भेटवस्तू ही भावना, आदर, स्नेह आणि नातेसंबंध दृढ करणारे प्रतीक मानली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांचे स्वरूप नाते अधिक दृढ करणारे आहे. आपल्या परंपरेत कोणत्याही शुभकार्याला, सण-उत्सवाला, विवाहसमारंभाला किंवा मानवी आयुष्यातील कोणत्याही प्रसंगी रिकाम्या हाताने जाण्याची प्रथा नाही. ‘आहेर’ ही संकल्पना निव्वळ सामाजिक औपचारिकता नसून, परस्परांविषयीचा जिव्हाळा व्यक्त करण्याचा संस्कारही आहे.
काळानुसार भेटवस्तूंचे स्वरूप बदलले आणि त्यांना आधुनिकतेची जोड मिळाली. पण, त्यामागील भावनिक मूल्य आजही तितकेच कायम आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच वेगळी, अर्थपूर्ण आणि कायम स्मरणात राहणारी भेट द्यायची इच्छा असते. त्यामुळे पारंपरिक वस्तूंपासून ते वैयक्तिक आवडीनुसार तयार करण्यात येणाऱ्या दुमळ आणि वैशिष्ट्यपूर्ण भेटवस्तूंची मागणी आज झपाट्याने वाढत आहे. या मागणीला खऱ्या अर्थाने प्रतिसाद दिला, तो ‘श्री स्वामिनी गिफ्ट ॲण्ड इनोव्हेटिव्हज’च्या संचालिका रोहिणी चांदे यांनी.
बाजारात उपलब्ध त्याच-त्याच भेटवस्तू देण्यापेक्षा, ग्राहकांना काहीतरी वेगळे आणि किफायतशीर पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने रोहिणी यांनी ‘श्री स्वामिनी गिफ्ट ॲण्ड इनोव्हेटिव्हज’ची सुरुवात केली. ‘गिफ्टिंग’ व्यवसायाचा त्यांचा हा प्रवास थोड्याच उत्पादनांच्या माध्यमातून सुरु झाला. सुरुवातीला 2018 साली त्यांनी याची सुरुवात घरातूनच केली. सुरुवातीला या व्यवसायाचे स्वरूप अगदीच छोटेखानी होते. गिफ्ट निवडणे ग्राहकांना सोपे जाण्यासाठी, त्याची मांडणी, सजावट याचे विशेष काळजी घ्यावी लागते. या बाबी व्यवसायवाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्याच असतात. रोहिणी यांनी याची पुरेपुर काळजी घेतली.
पुढे जसजसा व्यवसाय वाढत गेला, तशी त्यांच्याकडील उत्पादनांची संख्यादेखील रोहिणी यांनी वाढवली. ग्राहकांना व्यवस्थित सेवा देता यावी, यासाठी एका प्रशस्त गिफ्ट गॅलरीचे स्वप्न रोहिणी यांनी उराशी बाळगले होते. रोहिणी यांचे हे स्वप्नही दि. 1 मे 2026 रोजी साकार झाले. नाशिकमधील इंदिरानगर या प्रसिद्ध वसाहतीमधील कलानगर सिग्नलजवळ संताजीनगर येथे, रोहिणी यांच्या एका प्रशस्त अशा गिफ्ट गॅलरीचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते दि. 1 मे रोजी संपन्न झाले.
मेटल, वूड, ग्लास, सिल्व्हर कोटिंग, स्टोन, गोमय, सोलर यांपासून तयार केलेल्या असंख्य भेटवस्तू, तसेच कॉटन टर्किश नॅपकिनचे कल्पकतेने सजवलेले बुके रोहिणी यांच्या गॅलरीमध्ये ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असातात. याशिवाय, आध्यात्मिक, तसेच वास्तुशास्त्रावर आधारित विविध उत्पादनेदेखील, त्यांनी त्यांच्या गॅलरीमध्येच ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळेच दुकानात आलेला ग्राहक खरेदी केल्याशिवाय, रिकाम्या हाताने कधीही जात नाही. उलटपक्षी, एकाच ठिकाणी दुर्मीळ, दर्जेदार आणि सर्व प्रकारच्या वस्तू मिळत असल्याने, ग्राहकांची पहिली पसंती रोहिणी यांच्या ‘श्री स्वामिनी गिफ्ट ॲण्ड इनोव्हेटिव्हज’लाच मिळते आहे. लग्न, मुंज, वास्तुशांती, उद्घाटन, वाढदिवस, साखरपुडा, निरोपसमारंभ, कॉर्पोरेट गिफ्ट या व अशा सर्वप्रकारच्या प्रसंगांसाठी, रिटेल, होलसेल आणि कस्टमाईज भेटवस्तूंचे असंख्य पर्याय रोहिणी उपलब्ध करुन देतात. ग्राहकाने भेटवस्तू निवडल्यानंतर ते पॅकिंग करून कुरिअर अथवा पोस्टामार्फत, देश-विदेशात पाठवण्याची व्यवस्थादेखील रोहिणी उपलब्ध करुन देत असून, विविध राज्यांतील सर्व शहरे, तसेच विदेशातही येथून भेटवस्तू सुरक्षित पाठवल्या जात असल्याचे रोहिणी अभिमानाने सांगतात.
आपली प्रतिमा जनमानसात चांगली असेल, तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर सकारात्मकरीत्या नक्कीच होतो. ‘इमेज मॅनेजमेंट’ म्हणजे प्रतिमा व्यवस्थापन! रोहिणी यांचे पती डॉ. अभिजित चांदे, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ‘इमेज मॅनेजमेंट’ म्हणजेच जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत आहेत. काळजीपूर्वक निवडलेली भेटवस्तू ही देखील आपल्या सकारात्मक प्रतिमेचाच एक भाग आहे. या संकल्पनेतूनच भेटवस्तू व्यवसायाची सुरुवात झाल्याचे रोहिणी सांगतात. भेट निवडताना काळजीपूर्वक निवडावी, तसेच त्या निवडीसाठी पुरेसा वेळ द्यावा, असे रोहिणी आवर्जून नमूद करतात. भेट देण्यासाठीचे बरेच प्रसंग, आपल्याला आधीपासूनच माहीत असतात. त्यामुळे त्या प्रसंगांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तूच्या निवडीबाबत थोडे आधी नियोजन केल्यास, योग्य निवडही करता येते आणि अखेरच्या क्षणी होणारी धावपळही टाळता येते.
सुरुवातीला फक्त ट्रेडिंग म्हणून सुरू झालेला रोहिणी यांचा भेटवस्तूंचा व्यवसाय, आता मॅन्युफॅक्चरिंग, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग व ट्रेडिंग अशा तीन विभागांत विभागला गेला आहे. रोहिणी यांना त्यांचे सर्व कुटुंबीय, या कामात हातभार लावतात. ‘कुटुंब रंगले व्यवसायात’ या उक्तीप्रमाणे, रोहिणी यांचे पती डॉ. अभिजित, तसेच दोन्हीही मुले आदित्य व अंशुलदेखील या व्यवसायामध्ये आपले योगदान देत असून, सोबतच अनेकांना रोजगाराची नवीन संधीदेखील यानिमित्ताने निर्माण करून देत आहेत. अशा या समाजाला प्रेरणादायी ठरणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला, पुढील आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.