सध्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय फंड देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतातील फंडदेखील याला अपवाद नाहीत. भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करून भारतातील संधींचा फायदा करून घेण्यास अनेक जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार उत्सुक आहेत. तसेच परदेशात गुंतवणूक करण्याचा विचार भारतातील गुंतवणूकदार करतात. भारतीय गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची व्याप्ती जागतिक स्तरावर वाढविणे फायदेशीर ठरू शकते. त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया...
भारतातील गुंतवणूकदारांना जागतिक स्तरावर गुंतवणूक करायची असेल, तर ते भारताबाहेर प्रत्यक्ष शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा परदेशात अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करणार्या भारतातील आंतरराष्ट्रीय फंडांत गुंतवणूक करू शकतात. अशा जागतिक फंडांत गुंतवणूक केल्यामुळे पोर्टफोलिओचे भौगोलिक विस्तृतीकरण साध्य करता येते. तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेशी निगडित असणारी जोखीम कमी करणे शक्य होते.
जागतिक फंडांची दीर्घ कालावधीसाठी जास्त परतावा देण्याची क्षमता असते. जागतिक फंडांत गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदाराला निरनिराळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेत आणि शेअर बाजारात, औद्योगिक क्षेत्रात, भिन्न जोखीम असलेल्या गुंतवणूक साधनातून गुंतवणूक करणे शक्य असते.
गुंतवणुकीसाठी जागतिक म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे. म्युच्युअल फंडबाबतचे भारतीयांचे आकर्षण सातत्याने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांच्या योजनांतून चांगला परतावा गुंतवणूकदारांना मिळाल्याने ते समाधानी आहेत. भारतात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच्या अनेक प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत. यांपैकी सर्वच योजना चांगला परतावा देत नसून, काही निवडक योजनाच चांगला परतावा देत आहेत. गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमार्फत इक्विटी शेअर, रोखे, कर्ज अशा डेट गुंतवणूक प्रकारांत, शिवाय सोने आणि चांदी यांतदेखील गुंतवणूक करता येते. म्युच्युअल फंडच्या जागतिक फंडांतून भारतीयांना अप्रत्यक्षपणे गुंतवणूक करता येते. जागतिक फंडांचे व्यवहार भारतातील इतर फंडांप्रमाणेच होतात. जागतिक फंडात गुंतवणूक रुपयात केली जाते आणि म्युच्युअल फंड त्यांच्या धोरणानुसार एकत्रित रक्कम इतर देशांतील गुंतवणूक साधनांतून परकीय चलनात करतात. जागतिक फंडांच्या युनिटची खरेदी-विक्री ही युनिटच्या ‘नेट अॅसेट व्हॅल्यू’ (एनएव्ही)नुसार केली जाते. अशा फंडात एकरकमी गुंतवणूक करणे किंवा ‘एसआयपी’ करणे शय असते. अशी योजना प्राप्तिकर कायद्यानुसार ‘डेट फंड’मध्ये केली जाते. त्यामुळे विक्रीनंतर मिळालेल्या परताव्यावर, ‘डेट’ योजनेप्रमाणे कर भरावा लागतो. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक फंड उद्दिष्टांनुसार निरनिराळ्या प्रकारांत विभागले जातात. यांची निरनिराळ्या भौगोलिक क्षेत्रांत गुंतवणुक केली जाते. उदा. अमेरिका, चीन, जपान, युरोप, आशिया खंड, विकसनशील देश आदि. काही योजना या निरनिराळ्या उद्योगक्षेत्रांसाठी निगडित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. उदा. नवे तंत्रज्ञान, ऊर्जा, खनिज संपत्ती, जागतिक शेती उद्योग इत्यादी भौगोलिक प्रांतांत गुंतवणूक करणारे योजनांचे प्रकार पुढीलप्रमाणे - अमेरिकेत गुंतवणूक करणारे फंड, युरोपमध्ये गुंतवणूक करणारे फंड, आशिया खंडामध्ये गुंतवणूक करणारे फंड, आशिया-प्रशांत क्षेत्रात गुंतवणूक करणारे फंड, विशिष्ट देशांत गुंतवणूक करणारे फंड, उदा. अमेरिका, चीन, जपान, तैवान एकाहून अधिक ठिकाणी गुंतवणूक करणारे फंड. थीम आधारित गुंतवणूक करणारे फंड, उदा. विकसनशील देश जागतिक शेती-उद्योग, सोने-चांदी उद्योग. जागतिक ऊर्जा भारतीय गुंतवणूकदारांना परदेशात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकेत गुंतवणूक करणारे आंतरराष्ट्रीय फंड आणि विकसनशील देशात गुंतवणूक करणारे फंड जास्त आकर्षक वाटतात. इतर फंड सध्या तरी आकर्षक वाटत नाहीत.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी निगडित योजना : अ) ‘मिरे अॅसेट एनवायएस FANG+ETF' ब) ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल यूएस ब्लूचिप इक्विटी फंड’ क) ‘डीएसपी यूएस फ्लेक्झिबल इक्विटी फंड’ व ड) ‘निप्पॉन इंडिया यूएस इक्विटी ऑपॉच्युनिटिज फंड.’ ‘कोविड’नंतरच्या काळात अमेरिकेतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळाला आहे. गुंतवणूकदारांना वार्षिक परतावा ‘मिर अॅसेट’ने ५६.४३ टक्के, ‘आयसीआयसीआय’ने २८.४८ टक्के, ‘डीएसपी यूएस’ने २०.४६ टक्के व ‘निप्पॉन इंडिया’ने २२.६९ टक्के दिला आहे.
देशात गुंतवणूक करणारे आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड प्रामुख्याने भारत, ब्राझील, इंडोनेशिया, तैवान, मलेशिया आदी विकसनशील देशांतील उद्योगसमूहात गुंतवणूक करतात. विकसनशील देशांतील गुंतवणुकीत जोखमीची असते. विकसनशील देशांत गुंतवणूक करणारे काही फंड - ‘आदित्य बिर्ला सन लाईफ ग्लोबल इमर्जिंग ऑपॉर्च्युनिटीज फंड’ - वार्षिक परतावा ९.४९ टक्के, ‘कोटक ग्लोबल इमर्जिंग मार्केट फंड’ - वार्षिक परतावा १.९८ टक्के, ‘एचएसबीसी ग्लोबल इमर्जिंग मार्केट फंड’ - ७.६६ टक्के व ‘एडलवाईज इमर्जिंग मार्केट ऑपॉर्च्युनिटी इक्विटी ऑफ शेअर फंड’ - वार्षिक परतावा १०.४३ टक्के.
‘आदित्य बिर्ला सन लाईफ फंडा’ची गुंतवणूक संपूर्णपणे परदेशातील आंतरराष्ट्रीय फंडात - स्वित्झर्लंडमधील ‘ज्युलियस बेअर नेक्स्ट जनरेशन युएसडी फंड’, ‘कोटक ग्लोबल फंडा’ची संपूर्ण गुंतवणूक कॅनडातील सीआय इमर्जिंग मार्केट फंडात केली जाते. ‘एचएसबीसी ग्लोबल मार्केट फंडा’ची गुंतवणूक इंग्लंडच्या ‘एचएसबीसी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंड - ग्लोबल इमर्जिंग मार्केट फंडा’त केली जाते. एडलवाईज मार्केट फंडाची गुंतवणूक अमेरिकेतील ‘जे. पी. मॉर्गन फंड इमर्जिंग मार्केट ऑपॉर्च्युनिटीज फंडा’त केली जाते. ‘मॉर्गन स्टॅन्ले कॉम्पोझिट इंडेक्स फॉर इमर्जिंग मार्केट्स’ हा निर्देशांक जागतिक फंडासाठी तुलनात्मक निर्देशांक म्हणून वापरला जातो. ‘एमएससीआय इमर्जिंग मार्केट’ निर्देशांकात प्रामुख्याने चीन, भारत, तैवान, दक्षिण कोरिया, ब्राझील, इंडोनेशिया आणि इतर विकसनशील देशांचा समावेश आहे. २४ देशांतील सुमारे १ हजार, ४०० शेअर या निर्देशांकासाठी वापरले जातात. ‘एमएससीआय इमर्जिंग मार्केट इंडेक्स’ने एक वर्षात ११.७० टक्के, तीन वर्षांत १.७३ टक्के व पाच वर्षांत ०.५५ टक्के परतावा दिला आहे. युरोपमधील देशांत गुंतवणूक करण्यासाठी भारतातील आंतरराष्ट्रीय फंड म्हणजे ‘इन्व्हेस्को इंडिया पॅन युरोपियन इक्विटी फंड’ आणि ‘एडलवाईज युरोप डायनामिक इक्विटी ऑफ शेअर फंड.’ या दोन्ही फंडांचा गुंतवणूकनिधी कमी आहे. चीनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘अॅक्सिस ग्रेटर चायना इक्विटी फंड ऑफ फंड्स’ आणि ‘ग्रेटर चायना इक्विटी फंड ऑफ फंड्स’ हे दोन फंड्स आहेत. जपानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘निप्पॉन इंडिया जपान इक्विटी फंड’ उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय फंडातील गुंतवणुकीचे फायदे
गुंतवणूक रुपयात होत असल्यामुळे गुंतवणूकदारास परकीय चलन खरेदी करावे लागत नाही. त्यामुळे गुंतवणूकदाराला गुंतवणूक करताना अतिरिक्त खर्च करावा लागत नाही. आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडात काही प्रमाणात गुंतवणूक केली, तर भौगोलिक विविधीकरण होते. त्यामुळे जोखीम कमी होते. आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड हे भारतातील इतर म्युच्युअल फंडांप्रमाणे गुंतवणुकीसाठी अतिशय सुलभ असतात. सर्व व्यवहार भारतातील म्युच्युअल फंडाप्रमाणे होतात.
गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नसते. छोटी रक्कम गुंतविणेसुद्धा शक्य असते. ‘एसआयपी’, ‘एसटीपी’ किंवा एकरकमी गुंतवणूक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. या म्युच्यअल फंडासाठी ‘लॉक-इन-पिरियड’ नसतो. त्यामुळे ‘एक्झिट कोड’ भरून कधीही गुंतवणूक काढून घेता येते. जागतिक अनुभव असलेले फंड मॅनेजर सखोल संशोधन आणि माहितीनुसार निर्णय घेतात. त्याचा फायदा फंडाला होतो. गुंतवणुकीतून पूर्ण किंवा प्रमाणात बाहेर पडताना, रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर जर खरेदीच्या वेळी असलेल्या डॉलरच्या किमतीपेक्षा जास्त असेल, तर विकल्यानंतर गुंतवणूकदारांना परकीय चलन/डॉलर परिवर्तनामुळे चांगला फायदा होतो.
आंतरराष्ट्रीय फंडातील गुंतवणुकीचे तोटे
जागतिक फंडात गुंतवणूक परकीय चलनात होत असल्यामुळे, परकीय चलनातील दराच्या चढ-उतारामुळे नुकसान होऊ शकते. जागतिक स्तरावर असलेल्या आव्हानांमुळे अशा फंडांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे गुंतवणूकदाराला अपेक्षित परतावा न मिळण्याची जोखीम असते. गुंतवणूकदारांना परदेशात गुंतवणूक करण्याचा अनुभव किंवा ज्ञान सहसा नसते. त्यामुळे फंड मॅनेजरवर जास्त विसंबून राहावे लागते. गुंतवणूक काढताना रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर जर खरेदीच्या वेळी असलेल्या डॉलरच्या किमतीपेक्षा कमी असेल, तर विकल्यानंतर गुंतवणूकदारांना चलन परिवर्तनामुळे नुकसान होऊ शकते. (सध्या तरी ही शक्यता नाही) आंतरराष्ट्रीय फंड हे भारतात ‘डेट फंड’ या वर्गात गणले जातात. त्यामुळे डेट फंडांना लागू असणार्या करतरतुदी आंतरराष्ट्रीय फंडांनादेखील लागू असतात.
भारतातील अर्थव्यवस्था जगातील इतर मोठ्या देशांपेक्षा सर्वाधिक दराने वाढत आहे. त्यामुळे साहजिकच भारतात गुंतवणूक करणे, हे गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे.
जागतिकीकरणामुळे परदेशातील कंपन्यांनादेखील भारताच्या वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थेचा फायदा मिळत आहे. अशा कंपन्यांत गुंतवणूक केल्याने जागतिक गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. जागतिकीकरणाचे फायदे घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि जागतिक विविधीकरण (डायव्हर्सिफिकेशन) मिळविण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे दीर्घ कालावधीसाठी धोरणीपणाचे ठरेल. अमेरिका आणि इतर विकसनशील देशांत गुंतवणूक करण्यासाठी ‘एसआयपी’चा चांगला पर्याय उपलब्ध आहे. थोडी रक्कम दीर्घ कालावधीसाठी गुंतविली, तर जागतिक गुंतवणुकीचा मोठा निधी निर्माण होईल. जागतिक फंडात गुंतवणूक केल्यामुळे इतर देशातील अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीचे ज्ञान मिळेल.
(टीप - वरील लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आणि या विषयासंबंधी मार्गदर्शन करणारी असून, वाचकांनी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)