Konkan Ratnagiri Petroglyphs :कोकणातील कातळशिल्पांबद्दल ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर!

    08-Apr-2026

ashish shelar

मुंबई (Konkan Ratnagiri Petroglyphs): कोकणातील कातळशिल्पं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अनमोल ठेवा. रत्नागिरी जिल्ह्यातील २५ किमी परिसरात पसरलेल्या २००० हून अधिक कातळशिल्पांवर जागतिक दर्जाचा माहितीपट तयार करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १४.५० कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय आज जाहीर करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.

हा माहितीपट केवळ एक डॉक्युमेंटरी नसून, कोकणातील प्राचीन मानवजीवन, संस्कृती आणि समृद्ध परंपरांचा अमूल्य दस्तऐवज असणार आहे. यामध्ये अत्याधुनिक ड्रोन शूटिंग, सिनेमॅटिक शॉट्स, उच्च-गुणवत्तेचे छायाचित्रण आणि जागतिक दर्जाचे व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) वापरले जाणार आहेत. या माध्यमातून कोकणचा हा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास अत्यंत प्रभावीपणे जगासमोर मांडला जाईल. केवळ माहितीपटावर न थांबता, या प्रकल्पांतर्गत सोशल मीडियासाठी स्वतंत्र 'शॉर्ट कंटेंट' आणि एक भव्य 'एव्ही (Audio-Visual) कंटेंट बँक' तयार केली जाणार आहे. यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर कातळशिल्पांचे वैभव अधिक व्यापकपणे पोहोचण्यास मदत होईल. संशोधक आणि पर्यटकांसाठी हा एक मोठा संदर्भ साठा ठरेल.युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार होणारा हा माहितीपट कोकणाच्या सांस्कृतिक ठेव्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देणार आहे. तसेच या उपक्रमामुळे कोकणातील कातळशिल्पांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळून पर्यटनवाढीस मोठी चालना मिळेल.





संबंधित मजकूर