नांदेड(Uday Samant Diwali with Farmers) : सणासुदीच्या आनंदातही शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव ठेवत उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी नांदेड जिल्ह्यातील सायाळ गावात शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि एका विधवा महिलेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळही केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नांदेड तालुक्यातील सायाळ येथे आयोजित दिवाळी कार्यक्रमात डॉ. सामंत म्हणाले की, शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत खचून जाऊ नये किंवा कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. पुढील दहा महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, टँकर आणि आनंदाचा शिधा यांसह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. केवळ दिवाळी साजरी करण्यापुरता हा उपक्रम मर्यादित नसून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.(Uday Samant Diwali with Farmers)
आतापर्यंत ५० दिवाळी साजऱ्या केल्या; मात्र ५१ वी दिवाळी सायाळमधील शेतकरी आणि ग्रामस्थांसोबत साजरी करताना विशेष समाधान मिळत असल्याची भावना सामंत यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधल्याने नवी ऊर्जा मिळते. यंदा शासनातील सर्व मंत्री शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करीत असून पुढील वर्षापासूनही गावागावांत जाऊन नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असून मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांच्या शिक्षणाचे शुल्क माफ करण्याचा निर्णयही शासनाने घेतल्याचे सामंत यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या जीवनात कायमस्वरूपी आनंद निर्माण व्हावा आणि निसर्गाचीही त्यांना साथ मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.(Uday Samant Diwali with Farmers)
विधवा महिलेच्या कुटुंबासोबत दिवाळीचा फराळ
या दौऱ्यात डॉ. सामंत यांनी सायाळ येथील पाच मुलींसह राहणाऱ्या विधवा महिला मुक्ताबाई केशव धुमाळे यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या कुटुंबीयांसोबत फराळ करून संवाद साधला. कुटुंबाचा आधार नसलेल्या या महिलेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच गावातील पिण्याचे पाणी, वीज, लाडकी बहीण योजना आणि निराधार योजनेसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या हस्ते गावातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा शुभारंभही करण्यात आला.(Uday Samant Diwali with Farmers)
यावेळी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी धरणातील पाण्याचे शेतकऱ्यांना समान वाटप, नाल्यांवर छोटे बंधारे, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांकडे लक्ष वेधले. आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांना धीर दिला, तर आमदार आनंद तिडके-बोंढारकर यांनी दिवाळी अग्रीम म्हणून जाहीर झालेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीचा उल्लेख करत उर्वरित मदत तातडीने खात्यावर जमा करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली.(Uday Samant Diwali with Farmers)