ठाणे: ठाणे जिल्हा आणि आसपासच्या परिसरात मानवी संवेदनांना काळिमा फासणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. गरीब, बेघर आणि हतबल मातांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन नवजात बालकांची उघड मांडीवर खरेदी-विक्री करणार्या एका आंतरराज्य रॅकेटचा मुंब्रा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे .एका अवघ्या २० दिवसांच्या चिमुकल्याची लाखो रुपयांना विक्री केल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी पोलिसांनी एका होमगार्डसह ११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तस्करीचे जाळे मुंब्रा, कल्याण, दिवा, जालना ते थेट रत्नागिरीपर्यंत पसरलेले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे रॅकेट बालकांच्या त्वचेच्या रंगावरून त्यांचे दर ठरवत होते. गोरी मुले ५ लाख ते साडेसहा लाख रुपयांपर्यंत, तर सावळी मुले ३ लाख रुपयांना विकली जात होती.
मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणार्या एका तरुणीच्या २० दिवसांच्या बाळाचा या टोळीने जबरदस्तीने सौदा केला होता. मात्र जबरदस्तीने केलेल्या सौद्याची रक्कमही त्यांनी स्वतःकडेच ठेवून घेतली. या गुन्ह्याचा सुगावा लागू नये म्हणून आरोपींनी पीडित मातेला मारहाण केले. पीडितेच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी तत्परतेने ५ विशेष पथके तयार केली आणि २४ तासांच्या आत रत्नागिरी येथून बाळाची सुखरूप सुटका करत आरोपींना गजाआड केले.
या कारवाईमुळे ठाणे परिसरातील यापूर्वीच्या जुन्या घटनांचे धागेदोरे पुन्हा समोर आले आहेत. यापूर्वी डोंबिवली आणि बदलापूर परिसरात मूल दत्तक देण्याच्या बहाण्याने थेट इन्स्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेल्सचा वापर करून नवजात बाळांची विक्री करणारी टोळी पकडण्यात आली होती. नवजात बालकांच्या तस्करीचे हे सत्र थांबवण्यासाठी पोलीस आता या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.