ठाणे, : (Firecracker Ban in Thane)दिवाळीच्या काळात ठाणे जिल्ह्यात आगीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर दोन महिन्यांसाठी पूर्ण बंदी घातली आहे. जिल्ह्याच्या संपूर्ण महसुली हद्दीत ९ नोव्हेंबर २०२६ पासून ८ जानेवारी २०२७ पर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत.
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी आगीच्या दुर्घटना घडल्या असून, त्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नागरिकांकडून हवेत उडणारे रॉकेट आणि तत्सम फटाके उडवले जात असल्याचे, तर काही जण थेट हातात धरून रॉकेट उडवण्यासारखे धोकादायक प्रकार करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेषतः रहिवासी इमारती, दाट लोकवस्ती, इमारतींचे रिफ्युज एरिया, पार्किंग, गच्च्या आणि बाल्कनीतून अशा प्रकारचे फटाके उडवले जात असल्याने आगीच्या दुर्घटनांचा धोका वाढला आहे.(Firecracker Ban in Thane)
रहेजा गार्डन येथील रहेजा कार्लाइल इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवरही अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे. नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, तसेच सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या आदेशानुसार संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या महसुली हद्दीत सार्वजनिक आणि खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवार तसेच सर्व रहिवासी भागांमध्ये रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या तत्सम फटाक्यांच्या वापरावर पूर्ण प्रतिबंध राहणार आहे. हे आदेश ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ८ जानेवारी २०२७ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू असतील.(Firecracker Ban in Thane)
आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन विभागावर सोपवण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्थांनीही आपल्या सभासदांना या आदेशाची माहिती देऊन त्याचे पालन करण्याबाबत जागरूक करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ आणि ६० अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, इतर प्रकारच्या फटाक्यांच्या वापरावर या आदेशाने सरसकट बंदी घातलेली नसून, त्यांचा वापर प्रचलित कायदे, सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश आणि न्यायालयीन निर्देशांच्या अधीन राहूनच करता येणार आहे.(Firecracker Ban in Thane)