ठाणे, : (Aravali Hills Fire Thane)घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील सांघवी हिल्स परिसरातील आरावली हिल्स सोसायटीच्या ए विंगमध्ये रविवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या सातव्या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये लागलेल्या या आगीत चार जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाच कुटुंबातील तिघांना भाजल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आगीच्या धुरामुळे फ्लॅटमध्ये अडकलेल्या दोघांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.
रविवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी या आगीची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे दोन फायर वाहन, एक रेस्क्यू वाहन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे १ वाजून १० मिनिटांच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणली.(Aravali Hills Fire Thane)
या आगीत आरावली हिल्समधील रूम क्रमांक ७०४ मध्ये राहणारे महेश धस (४६), रीना धस (४६) आणि वेदांत धस (१८) यांच्या हाताला, चेहऱ्याला आणि डोक्याला किरकोळ भाजले आहे. तसेच पाचव्या मजल्यावरील रूम क्रमांक ५०४ मध्ये राहणारे राजेंद्र जोशी (६७) हे खाली उतरताना पायाला दुखापत झाल्याने जखमी झाले. या चौघांनाही उपचारासाठी ठाण्यातील नोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आग लागली त्यावेळी सातव्या मजल्यावरील रूम क्रमांक ७०१ मध्ये शाहिद आनंद (३२) आणि स्वामिनी पराडकर (३५) हे दोघे अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीमुळे सातव्या मजल्यावरील रूम क्रमांक ७०१ ते ७०४ या फ्लॅटचे मुख्य दरवाजे, इलेक्ट्रिक वायरिंग तसेच इमारतीच्या लिफ्टचे नुकसान झाले आहे.(Aravali Hills Fire Thane)
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि कासारवडवली पोलिसांनी धाव घेतली. सध्या आग पूर्णपणे विझविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Aravali Hills Fire Thane)