मुंबई (Anil Mehta) : मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक आणि ज्येष्ठ प्रकाशक अनिल धोंडीलाल मेहता यांचे शनिवारी सकाळी कोल्हापूर येथे वयाच्या ८६व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. अनिल मेहता यांनी १९७६ मध्ये पुण्यात मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापना केली होती. आनंद यादव यांच्या 'माळावरची मैना' या कथासंग्रहापासून प्रकाशन संस्थेचा प्रवास सुरू झाला. मराठीतील नामवंत लेखकांसोबतच जागतिक साहित्याचे अनुवाद मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्थेने केले. पुस्तक विक्री क्षेत्रातही त्यांनी 'अजब पुस्तकालय' आणि मेहता बुक सेलर्सच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. मेहता यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि प्रकाशनविश्वाची मोठी हानी झाली आहे.
ज्येष्ठ प्रकाशक आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मराठी प्रकाशनविश्वात विश्वासार्हता, व्यावसायिकता आणि प्रयोगशीलतेचा आदर्श निर्माण करत त्यांनी सातत्याने नवोदित लेखक आणि कवींचा शोध घेतला. त्यांच्या साहित्यकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देत अनेक उदयोन्मुख साहित्यिकांना ओळख मिळवून दिली. विविध भाषांतील साहित्याचे अनुवाद आणि वाचनसंस्कृतीच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानातून त्यांनी साहित्यविश्व समृद्ध केले. त्यांच्या निधनाने साहित्यिक, वाचक आणि प्रकाशक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक