बस्तर (PM Narendra Modi Diwali Bastar 2026) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी छत्तीसगडमधील बस्तर येथे सुरक्षादलांच्या जवानांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर भाष्य करताना, "आज नक्षलवादी दहशतवाद संपला असून विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी आज मी तुमच्यामध्ये, बस्तरच्या जंगलात आलो आहे," असे सांगितले. तसेच, मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधत आधीच्या सरकारला सुरक्षा दलांच्या जवानांची चिंता नव्हती, असा आरोपही केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आज संपूर्ण देशात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात लाखो भारतीय दिव्यांचा पवित्र सण साजरा करत आहेत. लोक दूरदूरवरून आपल्या घरी परतत आहेत. कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत एकत्र येण्यासाठी हा एक उत्तम सण आहे. आणि मीसुद्धा तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे." (PM Narendra Modi Diwali Bastar 2026)
सैनिकांसोबतची प्रत्येक दिवाळी अविस्मरणीय!
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जे सीमेवर आणि देशाच्या अंतर्गत भागात राष्ट्राचे रक्षण करतात, भारतमातेचे वीर, तुम्ही सर्व पुत्र आणि कन्या माझ्या कुटुंबाचा भाग आहात. हिमालयाच्या कुशीत असलेल्या कारगिलपासून ते लेपछापर्यंत, समुद्रकिनाऱ्यावरील सर क्रीकपासून ते सागराच्या कुशीत असलेल्या आयएनएस विक्रांतपर्यंत, या शूर सैनिकांसोबतची प्रत्येक दिवाळी माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे." (PM Narendra Modi Diwali Bastar 2026)
पुढे ते म्हणाले, "ही एक असाधारण कामगिरी आहे. याचे मोठे श्रेय तुम्हाला, तुमच्यासारख्या लाखो शूर सैनिकांना आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना जाते. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आणि १.४ अब्ज देशवासीयांच्या वतीने तुमच्या त्यागाबद्दल, समर्पणाबद्दल आणि सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो आहे." (PM Narendra Modi Diwali Bastar 2026)
नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकलेली पहिली दिवाळी!
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नक्षलवादाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, "२०२६ ची ही दिवाळी खरोखरच खास आहे! ही पहिली दिवाळी आहे, जेव्हा देशाने नक्षलवाद आणि माओवादी दहशतवादाविरुद्धची दशकांहून अधिक काळ चाललेली लढाई जिंकली आहे. ही पहिली दिवाळी आहे, जेव्हा देशातील प्रत्येक जिल्हा नक्षलवादापासून मुक्त झाला आहे. ही पहिली दिवाळी आहे, जेव्हा लाखो देशवासीयांनी नक्षलवादाच्या भीतीवर विजय मिळवला आहे."
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या १३ वर्षांपासून देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवत आहेत. यंदाही त्यांनी बस्तर येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करत त्यांच्या त्याग, समर्पण आणि देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. (PM Narendra Modi Diwali Bastar 2026)