ठाणे ते नवी मुंबई विमानतळ जोडणीला गती; ६,०२८ कोटींची निविदा प्रसिद्ध!

 
 
Thane Navi Mumbai Airport Link
 
मुंबई (Thane Navi Mumbai Airport Link): ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवास अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी प्रस्तावित सहा मार्गिकांच्या उन्नत मार्गाच्या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. सिडकोने २५.२८७ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ६ हजार २७ कोटी ५८ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ठाण्यातील कोपरी परिसरातून सुरू होणारा हा उन्नत मार्ग थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाणार आहे.
 
सध्या ठाणे आणि आसपासच्या परिसरातून विमानतळाच्या दिशेने जाण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्गाचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच कल्याण-डोंबिवली परिसरातून शिळफाटा आणि तळोजामार्गे विमानतळाकडे जाता येते. मात्र, ठाणे, भिवंडी, वसई-विरार आणि मीरा-भाईंदर या शहरांमधील प्रवाशांना विमानतळापर्यंत थेट जोडणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उन्नत मार्गाची संकल्पना पुढे आली.
 
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते विमानतळ प्रवासासाठी सुमारे ४० मिनिटांची बचत होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा कालावधी ५० ते ६० मिनिटांपर्यंत कमी होईल, असा सिडकोचा अंदाज आहे. यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. (Thane Navi Mumbai Airport Link)
 
टोल आकारणी आणि ताशी १०० किमी वेगमर्यादा
 
या मार्गावरून प्रवास करण्यासाठी टोल आकारला जाणार आहे. मार्गाचा संकल्पित वेग ताशी १०० किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे. हलकी व्यावसायिक आणि प्रवासी वाहने या मार्गावरून धावू शकतील; मात्र अवजड बहुआसनी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत ५ जानेवारी २०२७ असून, ६ जानेवारी रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत. प्रकल्पाचा एकूण सवलत कालावधी ४० वर्षांचा असेल. त्यापैकी तीन वर्षे बांधकामासाठी निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात पुढील चार ते पाच वर्षांत हा मार्ग पूर्ण करण्याचे आव्हान सिडकोसमोर असेल. (Thane Navi Mumbai Airport Link)
 
सहा प्रमुख मार्गांशी जोडणी
 
हा उन्नत मार्ग कोपरी-पटणी खाडी पूल, ऐरोली-काटई मार्ग, घाटकोपर-कोपरखैरणे जोडरस्ता, शीव-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आणि उलवे किनारी मार्ग या सहा ठिकाणी जोडला जाणार आहे. त्यामुळे ठाणे आणि परिसरातील प्रवाशांना विमानतळासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. या प्रकल्पाच्या खर्चापैकी ३६ टक्क्यांपर्यंत, म्हणजेच २ हजार १७०.०८ कोटी रुपयांच्या व्यवहार्यता तफावत निधीला केंद्र आणि राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामध्ये केंद्राचा १ हजार २०५.६० कोटी, तर राज्याचा ९६४.४८ कोटी रुपयांचा वाटा असेल. (Thane Navi Mumbai Airport Link)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर