रखडलेल्या एसआरए प्रकल्पांची जबाबदारी शिवशाहीने घ्यावी!

 
SRA Pending Projects
 
मुंबई (SRA Pending Projects) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने पुढाकार घ्यावा. रखडलेल्या प्रकल्पांची जबाबदारी स्वीकारून ते प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिले.
 
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या संचालक मंडळाची ४५ वी बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी एसआरएच्या विविध प्रकल्पांचा, संक्रमण सदनिकांच्या थकीत भाड्याचा तसेच समूह पुनर्विकास योजनांचा आढावा घेण्यात आला. सप्टेंबर २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार, खासगी विकासकांकडे वितरित करण्यात आलेल्या ६६७ संक्रमण सदनिकांच्या भाड्यापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी जमा झाली आहे. ही थकीत रक्कम प्राधान्याने वसूल करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. सवलतींचा विचार करून निश्चित केलेली थकबाकी वसूल करण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा. तसेच वसुली प्रक्रियेला गती देऊन निर्धारित कालमर्यादेत संपूर्ण रक्कम वसूल करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. (SRA Pending Projects)
 
कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर परिसरातील समूह पुनर्विकास योजनांनाही गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सहा समूहांचा पुनर्विकास प्रस्तावित असून, उल्हासनगरमध्ये २९ पेक्षा अधिक समूहांच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. या योजनांसाठी आवश्यक सर्वेक्षण, नियोजन आणि सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. (SRA Pending Projects)
 
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बदलापूर येथील जोवेली येथे ४ हजार ५९०, तर कल्याण तालुक्यातील माणिवली येथे ५ हजार ३३० घरे उभारण्याच्या प्रस्तावाचाही आढावा घेण्यात आला. या दोन्ही ठिकाणी एकूण ९ हजार ९२० परवडणारी घरे उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पांची उभारणी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तुविशारद आणि विकासक यांना सहभागी करून घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी केल्या.
 
दरम्यान, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता आणि गती आणण्यासाठी सुधारित आकृतिबंध तसेच सेवाशर्ती नियमावलीबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक लहू माळी आणि संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. (SRA Pending Projects)





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर