“अजितदादा असते तर, नक्कीच विलीनीकरण झाले असते!” तटकरेंच्या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादीत खळबळ

    06-Nov-2026   
 
 
NCP Merger
 
मुंबई (NCP Merger): अजितदादा असते तर, १२ फेब्रवारीला नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण झाले असते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
 
जेष्ठ नेते शरद पवार हे सध्या रुग्णालयात दाखल असल्याने अनेक नेत्यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी खा. प्रफुल्ल पटेल यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात "आपण १० तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू," असे शरद पवार प्रफुल्ल पटेल यांना सांगताना दिसतात. त्यामुळे १० तारखेनंतर नेमकी कशासंदर्भात भेट होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
सुनील तटकरे काय म्हणाले?
 
त्यानंतर खा. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठे भाष्य केले. ते म्हणाले की, "अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा नक्कीच झाली होती. अजितदादांनी मला त्याची कल्पनाही दिली होती. दादा असते तर, १२ फेब्रुवारीला नक्कीच विलीनीकरण झाले असते. परंतू, दुर्दैवाने दादांच्या अपघाती निधनामुळे हा विषय तिथेच थांबला. मी त्यांच्या जवळचा सहकारी असल्याने दादांनी मला याबाबत सांगितले होते," असे विधान त्यांनी केले. (NCP Merger)
 
तटकरेंनी सत्य परिस्थिती मांडली - शशिकांत शिंदे
 
दरम्यान, याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "सुनील तटकरे यांनी सत्य परिस्थिती सांगितली. अजित पवार असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती. आज तटकरे म्हणत असले तरी आम्ही याबाबत यापूर्वीच बोलत होतो, पण ते मानले जात नव्हते. आता तटकरे बोलल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. आज दोन्ही पक्ष एकत्र असते तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे चित्र वेगळे दिसले असते. दादांनाही तेच अपेक्षित होते. पक्ष मजबुतीने ताकदीने उभा राहण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात हीच शरद पवार आणि अजित पवार यांची ईच्छा होती. हेच सत्य सुनील तटकरे यांनी मान्य केले आहे." (NCP Merger)
 
 
 
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर