‘रस्त्यावर याल तर आम्हीही लढाईला तयार’ ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना थेट इशारा!

नागपुरात ५० हजारांहून अधिक नागरिकांची पदयात्रा;‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’चा नारा

 
 
Nagpur Democracy Rally
 
मुंबई (Nagpur Democracy Rally): "लढाई संसदेत नाही, रस्त्यावर होईल," असे राहुल गांधी म्हणतात; पण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान अस्तित्वात असेपर्यंत लोकशाहीची लढाई संसदेतच लढली जाईल. मात्र, रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर त्यासाठीही आम्ही मागे हटणार नाही, अशा आक्रमक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना थेट इशारा दिला. नागपुरात आयोजित ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रेच्या सभेत ते बोलत होते. या पदयात्रेत विदर्भातील ५० हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
 
नागपुरात भाजप आणि महायुतीच्या वतीने ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. विदर्भातील विविध जिल्ह्यांतून ५० हजारांहून अधिक नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका करत लोकशाही संस्थांवरील विश्वास कायम राखण्याचे आवाहन केले.  (Nagpur Democracy Rally)
 
“तुम्ही शंभर लोक घेऊन याल तर आम्ही हजार येऊ, तुम्ही हजार आणाल तर आम्ही लाख येऊ आणि तुम्ही लाख आणाल तर एक कोटी लोक रस्त्यावर उतरतील. हा भारताचा हुंकार आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.  (Nagpur Democracy Rally)
 
काँग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेवरील आक्षेपांचा समाचार घेताना फडणवीस यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यांतील निवडणूक निकालांचा दाखला दिला. काँग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेवरील आक्षेपांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, काँग्रेस जिंकते तेव्हा निवडणूक आयोग आणि ईव्हीएम योग्य असतात; मात्र पराभव झाला की मशीन खराब असल्याचे आरोप केले जातात. महाराष्ट्रातील निवडणुकांचा दाखला देत त्यांनी काँग्रेसच्या या भूमिकेतील विसंगती अधोरेखित केली.  (Nagpur Democracy Rally)
 
१९७५ मधील आणीबाणीचा संदर्भ देत फडणवीस यांनी काँग्रेसवर संविधान आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. “बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला समान मूलभूत अधिकार दिले. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला जे अधिकार आहेत, तेच अधिकार सर्वसामान्य गरीब माणसालाही दिले आहेत. हे अधिकार आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्था यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे फडणवीस म्हणाले.
 
“ही लढाई केवळ भारतीय जनता पक्षाची नाही, एनडीएची नाही किंवा मोदीजींचीही नाही. ही लढाई देशाच्या संविधानासाठी आहे. लोकशाही व्यवस्था आणि घटनात्मक संस्थांचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी केले.  (Nagpur Democracy Rally)
 
लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सजग प्रहरी बनावे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
 
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून लोकशाही ही देशाची आस्था, श्रद्धा आणि आत्मा आहे. मात्र, जेव्हा विरोधकांना आपली भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येत नाही, तेव्हा निवडणूक आयोगाची बदनामी करणे, न्यायव्यवस्थेवर टीका करणे आणि लोकशाही संस्थांबाबत अविश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.  (Nagpur Democracy Rally)
 
१९७५ मध्ये काँग्रेस सरकारने लागू केलेल्या आणीबाणीची आठवण करून देताना गडकरी म्हणाले की, त्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले होते. मिसा कायद्यांतर्गत अनेकांना तुरुंगात डांबण्यात आले, तर लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांवर निर्बंध लादण्यात आले. १९७७ च्या निवडणुकीत लोकांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन जनता पक्षाला पाठिंबा दिला. हा इतिहास विसरता कामा नये.  (Nagpur Democracy Rally)
 
आज काँग्रेसच लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची भाषा करत असल्याचा विरोधाभासही त्यांनी अधोरेखित केला. आणीबाणीच्या काळात नागरिकांना न्याय मागण्याच्या अधिकारापासूनही वंचित ठेवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधावा, योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावून सांगावा आणि लोकशाहीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन गडकरी यांनी केले. लोकशाही ही आपली आस्था, श्रद्धा आणि आत्मा असून तिचे रक्षण करणे हेच आपल्या जीवनाचे मिशन आहे, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना लोकशाहीचे सजग प्रहरी बनण्याचे आवाहन केले.  (Nagpur Democracy Rally)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर