मुंबई (Sanitation Workers Housing Maharashtra): आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता कर्मचारी हा खऱ्या अर्थाने उत्तम आरोग्य देणारा आहे. महाराष्ट्रातील सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थानासोबतच मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची सुरुवातही झाली आहे. त्यामुळे प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला भविष्यात त्याच्या मालकी हक्काच्या घराची चिंता राहणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पंचशील नगर, कुलाबा येथे आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थान चावी वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, महापौर रितु तावडे , उपमहापौर संजय घाडी, नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आणि वाल्मिकी गृहनिर्माण या दोन योजना स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता सुरू केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेले सेवा निवासस्थान संबंधित कर्मचाऱ्याचा मुलगा त्यांच्या जागी लागल्यानंतर हे निवासस्थान त्याला हस्तांतरित होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांना २०२८ पर्यंत सेवा निवास स्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता मुंबईकरांच्या आरोग्य जपणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगले प्रशस्त घर देण्याची जबाबदारी शासनाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (Sanitation Workers Housing Maharashtra)
स्वच्छता कर्मचारीच मुंबईचे खरे हिरो- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई गाढ झोपेत असताना स्वच्छता कर्मचारी रस्त्यांची स्वच्छता करून मुंबईकरांचे आरोग्य जपतात. कोविड काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी सेवा बजावली. सखोल स्वच्छता अभियान तसेच पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतरही हे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करतात. त्यामुळे मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महत्व अधोरेखित केले. (Sanitation Workers Housing Maharashtra)
मुंबईतील २९ हजार सफाई कामगारांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबईतील २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरे मिळवून देण्याच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात पंचशील नगरातील १४० सदनिकांच्या चावीवाटपाने झाली आहे. मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवणाऱ्या सफाई कामगारांना सन्मानपूर्वक निवास देण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले. पंचशील नगरातील दोन इमारतींमध्ये १४० सदनिका उभारण्यात आल्या असून, त्यामध्ये दहा लिफ्टसह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वच्छ परिसर, मुलांसाठी अभ्यासाच्या सुविधा आणि विविध उपक्रमांसाठी अनुकूल वातावरण यामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांच्या उज्ज्वल भवितव्याला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. (Sanitation Workers Housing Maharashtra)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.