मुंबई (Mumbai Sanitation Workers): संपुर्ण शहर गाढ झोपेत असताना स्वच्छता कर्मचारी रस्त्यांची स्वच्छता करून मुंबईकरांचे आरोग्य जपतात. कोविड काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी सेवा बजावली. सखोल स्वच्छता अभियान तसेच पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतरही हे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करतात. त्यामुळे मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महत्व अधोरेखित केले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने देण्याच्या उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. मुंबईतील १४६ कर्मचारी वसाहतींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करून सर्व कर्मचाऱ्यांना दर्जेदार निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रकल्पात १५० चौरस फुटांच्या घराऐवजी ३०० चौरस फुटांचे घर देण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने पूर्वनिर्मित अर्थात ‘प्री-फॅब्रिकेटेड’ तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करून ही घरे जलदगतीने उभारली आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (Mumbai Sanitation Workers)
अनेक स्वच्छता कर्मचारी मुंबईबाहेर राहतात. रेल्वेने दररोज करावा लागणारा प्रवास त्यांच्या आरोग्यावर आणि कामावर परिणाम करतो. त्यांना मुंबईत सेवा निवासस्थाने मिळाल्यास त्यांच्या आरोग्यासह कामाची कार्यक्षमता सुधारेल आणि मुंबई अधिक स्वच्छ व निरोगी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. (Mumbai Sanitation Workers)
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, अभियंता, वकील आणि वास्तुविशारद व्हावे तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र योजना तयार करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. (Mumbai Sanitation Workers)