मुंबई (Chipi Navi Mumbai Flight Service): नवी मुंबई ते तळकोकण हा प्रवास आता अधिक जलद आणि सुखकर होणार आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी १६ नोव्हेंबर २०२६ पासून नियमित विमानसेवा सुरू होत असून, आठवड्यातील सातही दिवस प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. या मार्गावरील Fly91 विमानसेवेचे तिकीट बुकिंग सुरू झाले असून, पहिल्या विमानाचे उड्डाण सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून ही माहिती दिली. 'येवा, कोकण आपलोच आसा!' असे कोकणी साद घालत त्यांनी प्रवासी आणि पर्यटकांना या विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. (Chipi Navi Mumbai Flight Service)
या विमानसेवेमुळे मुंबई महानगर प्रदेश आणि तळकोकण यांच्यातील अंतर हवाई मार्गाने कमी होणार आहे. विशेषतः कोकणवासीय, चाकरमानी, व्यावसायिक आणि पर्यटकांसाठी ही सेवा सोयीची ठरणार आहे. सण-उत्सव, सुट्ट्या तसेच पर्यटनाच्या हंगामात कोकणात येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि आर्थिक घडामोडींनाही चालना मिळू शकते. (Chipi Navi Mumbai Flight Service)
दरम्यान, चिपी विमानतळावरील प्रवासी वाहतुकीला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. चिपी-नवी मुंबई आणि नवी मुंबई-चिपी या दोन्ही मार्गांवरील विमानसेवेसाठी १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी एका वर्षात १६ कोटी ७४ लाख ६२ हजार रुपये खर्च करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. (Chipi Navi Mumbai Flight Service)
पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढविण्यासह सिंधुदुर्गची मुंबई महानगर प्रदेशाशी हवाई जोडणी अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर सुरू होणारी नियमित विमानसेवा सिंधुदुर्गच्या दळणवळण आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (Chipi Navi Mumbai Flight Service)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.