महाराष्ट्र हे जागतिक ऑटोमोबाईल आणि भविष्यातील मोबिलिटी क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र

 
Maharashtra Automotive Industry
 
मुंबई(Maharashtra Automotive Industry) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवार दि.17 रोजी पुणे येथे मर्सिडीज-बेंझच्या इलेक्ट्रिक GLC वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्राला केवळ देशाचे वाहन उत्पादन केंद्र न ठेवता भविष्यातील मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’पासून ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’पर्यंतची वाटचाल करताना उत्पादनासोबतच संशोधन, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान विकास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहन उद्योगाचे मोठे जाळे विकसित झाले असून, देशातील एकूण मोटार वाहन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 20% हून अधिक आहे. राज्याचे उद्दिष्ट केवळ वाहन उत्पादनापुरते मर्यादित नसून, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी तंत्रज्ञान, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमोबाईल सॉफ्टवेअर, डिझाइन आणि संशोधन-विकास या क्षेत्रांतही जागतिक नेतृत्व मिळविण्याचे आहे. मर्सिडीज-बेंझने चाकणमधून भारतीय बाजारपेठेबरोबरच आशियाई आणि जागतिक बाजारपेठांसाठी उत्पादन करावे, तसेच भविष्यातील बॅटरी तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि मोबिलिटी संशोधनासाठी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.(Maharashtra Automotive Industry)
 
राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला प्रोत्साहन
 
राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत 2030 पर्यंत नवीन वाहन नोंदणीमध्ये 30% इलेक्ट्रिक वाहनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महामार्गांवरील जलद चार्जिंग सुविधा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावरील शाश्वत मोबिलिटी कॉरिडॉर तसेच बॅटरी पुनर्वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. भविष्यातील वाहन हे केवळ चार चाकांवर धावणारे वाहन नसून, संगणक, ऊर्जा प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह मोबिलिटी प्लॅटफॉर्मचे एकत्रित स्वरूप असेल. या परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र सज्ज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.(Maharashtra Automotive Industry)

जागतिक बाजारपेठांशी जोडणी अधिक सक्षम होणार
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित पुणे-पुरंदर विमानतळ आणि वाढवण बंदर यांमुळे महाराष्ट्राची जागतिक बाजारपेठांशी जोडणी अधिक सक्षम होणार आहे. मोठी बाजारपेठ, उत्पादन परिसंस्था, कुशल अभियंते आणि तंत्रज्ञानाच्या बळावर राज्य गुंतवणुकीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. महाराष्ट्रातून जगासाठी उत्पादन, संशोधन आणि नवकल्पना विकसित होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
 
मर्सिडीज-बेंझची ₹3200 कोटींची गुंतवणूक
 
मर्सिडीज-बेंझच्या चाकण प्रकल्पातून सुमारे 1200 जणांना थेट रोजगार मिळाला असून, पुरवठादार आणि सेवा क्षेत्रासह सुमारे 18,000 व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या प्रकल्पाच्या विस्तारीकरणानंतर अवघ्या 10 वर्षांत या प्रकल्पातून अत्याधुनिक इलेक्ट्रिक GLC वाहनाचे उत्पादन सुरू होणे, ही राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीची साक्ष असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.(Maharashtra Automotive Industry)
 
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मार्टिन ब्रुडरम्युलर, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ओला केलेनियस, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी योर्ग बर्जर, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर, मर्सिडीज-बेंझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साले व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर