मुंबई (Gokul Dairy Election) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ५०० कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर शासननियुक्त पाच सदस्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला बुधवार, दि.४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे गोकुळच्या संचालक मंडळावर शासननियुक्त सदस्यांना स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यातील चार सदस्यांना मतदानाचा अधिकारही मिळणार आहे. परिणामी, संचालक मंडळात १३ जागा जिंकून बहुमत मिळविलेल्या आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ अअअ (२) च्या परंतुकामध्ये सुधारणा करून नवीन परंतुक समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. त्यानुसार, ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांच्या समित्यांवर शासनाकडून पाच सदस्य नामनिर्देशित केले जाणार आहेत. यामध्ये सहाय्यक निबंधक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला एक शासकीय अधिकारी आणि संबंधित संस्थेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या चार व्यक्तींचा समावेश असेल. शासकीय अधिकाऱ्याला मतदानाचा अधिकार नसेल; मात्र उर्वरित चार सदस्यांना संचालक मंडळाच्या कामकाजात मतदानाचा अधिकार असेल. तथापि, या चार सदस्यांना संस्थेच्या पदाधिकारीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी करता येणार नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना ही सुधारणा लागू असणार नाही. (Gokul Dairy Election)
गोकुळच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला १२ जागा मिळाल्या. त्यामुळे संचालक मंडळात सतेज पाटील यांच्या गटाचे बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच निर्माण झाला आहे. अध्यक्ष निवडीसाठी होणाऱ्या सभेचा १४ संचालकांच्या उपस्थितीचा कोरम महत्त्वाचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुतीसाठी निर्णायक ठरू शकतो. नव्या तरतुदीनुसार चार सदस्यांची नियुक्ती झाल्यास संचालक मंडळातील सत्तेचे गणित बदलण्याची शक्यता आहे. (Gokul Dairy Election)
या निर्णयाला सतेज पाटील यांनी यापूर्वीच विरोध दर्शविला होता. साडेपाच लाख दूध उत्पादकांनी दिलेला कौल नाकारण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली होती. या निर्णयाविरोधात सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार असून, जनतेचा जनाधार नाकारल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता. महायुतीला विरोधी पक्षात राहण्याचा कौल मिळाला असेल, तर तो स्वीकारला पाहिजे, असे सांगतानाच सत्तेची सूत्रे कायमस्वरूपी एकाच पक्षाकडे राहणार नाहीत, २०२९ मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर या निर्णयाची आठवण ठेवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या ताज्या निर्णयामुळे गोकुळमधील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Gokul Dairy Election)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.