मुंबई, (Girgaon Chowpatty Volleyball Ground) : ऑरेंज गेट- मरीन ड्राईव्ह भूमिगत रस्ते बोगदा प्रकल्पाच्या विद्युत उपकेंद्रासाठी गिरगाव चौपाटी येथील मफतलाल जिमखान्याचे व्हॉलीबॉल मैदान घेण्याचा प्रस्ताव आहे. या मैदानावर दररोज सकाळी सहा वाजल्यापासून ३०० ते ५०० सर्वसामान्य नागरिक खेळतात. त्यामुळे हे मैदान सर्वसामान्यांसाठी कायम ठेवावे यासाठी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवारी, मुंबई शहर अप्पर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात आणि निवासी अधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांची भेट घेतली.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "उपकेंद्रासाठी अन्यत्र पर्यायी जागा उपलब्ध असल्याने लोकांचे मैदान कायम ठेवता येईल. मैदान आहे तसेच राहू द्यावे. उच्चाधिकार समितीने या व्हॉलीबॉल मैदानावर उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्याऐवजी किमान दोन-तीन पर्यायी जागा उपलब्ध आहे. रस्त्याच्या पलीकडे रेल्वेची जागा उपलब्ध आहे. तसेच चौपाटी परिसरात यापूर्वी काम सुरू झालेल्या ठिकाणीही भूमिगत उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध आहे. सबस्टेशनसाठी पर्यायी जागेचा विचार करावा. व्हॉलीबॉल हा सर्वसामान्य लोकांचा खेळ आहे. रोज सकाळी सहा वाजल्यापासून ३०० ते ५०० लोक तिथे खेळतात. पर्याय उपलब्ध आहेत, म्हणून हे मैदान लोकांसाठी राहू द्या, अशी आमची विनंती आहे." उच्चाधिकार समितीतही या पर्यायी जागांना जवळपास सर्वांनी मान्यता दिली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.(Girgaon Chowpatty Volleyball Ground)
एमएमआरडीए व उच्चाधिकार समितीशी चर्चा
दरम्यान, मंत्री लोढा यांनी या विषयावर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी तसेच उच्चाधिकार समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. दिवाळीनंतर याबाबत संयुक्त बैठक घेऊन अंतिम तोडगा काढला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
विकासही हवा, खेळाचे मैदानही
दक्षिण मुंबईची वाहतूक कोंडी कमी करणारा ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. तो वेळेत पूर्ण व्हावा, ही भूमिका कायम आहे. त्यासोबतच मुंबईतील मोकळी मैदाने नागरिकांसाठी जपली जावीत, असे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.(Girgaon Chowpatty Volleyball Ground)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....