तीन जिल्हा बँकांच्या निकालात भाजपची सरशी; साताऱ्यात सर्वाधिक नऊ जागा, सांगलीत पडळकरांचा विजय

६३ पैकी २३ जागी भाजपचा विजय, सुमनताई पाटील यांचा पराभव

    03-Nov-2026


District Bank Election Results 2026

सांगली : (District Bank Election Results 2026)महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सांगली, सातारा आणि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक निकालात भाजपने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. विशेषतः सातारा जिल्हा बँकेत भाजपने सर्वाधिक नऊ जागा जिंकत अन्य पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली. सांगलीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवून जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय नेतृत्वाला आव्हान दिले. तर अहिल्यानगरमध्ये विखे-थोरात सहकार विकास पॅनलमधील भाजपच्या उमेदवारांनीही महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला. मात्र, तिन्ही जिल्ह्यांतील निकालांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील स्थानिक राजकीय समीकरणांचे वेगवेगळे चित्र समोर आणले आहे.
 
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांपैकी नऊ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १२ जागांच्या निकालात भाजपने नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसने आठ आणि शिवसेनेने चार जागा मिळवल्या. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी माण मतदारसंघातून ५३ मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे ज्ञानेश्वर रांजणे आणि चंद्रकांत जाधव यांनीही विजय नोंदवला. मात्र, पाटणमध्ये शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा १२ मतांनी पराभव केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांपैकी १५ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत सोसायटी गटातून ५४ मते मिळवत विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तासगावमध्ये सुमनताई पाटील यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. कवठे महांकाळमधून अजितराव घोरपडे, तर मिरजमधून अण्णासाहेब कोरे विजयी झाले. या निकालामुळे सांगलीच्या सहकार क्षेत्रातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे.अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित दहा जागांच्या निकालात भाजपच्या वैभव पिचड, कारभारी जावळे, संगीता वाघ आणि ज्योती शिंदे यांनी विजय मिळवला.(District Bank Election Results 2026)
 
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नीलेश लंके यांनी पारनेरमध्ये भाजप समर्थक राहुल शिंदे यांचा पराभव केला. राहुरीत प्राजक्त तनपुरे, तर अकोल्यात संजीवनी शिंदे यांनीही विजय मिळवला. त्यामुळे अहिल्यानगरमध्येही संमिश्र निकाल पाहायला मिळाला. तीन जिल्ह्यांच्या निकालांचा विचार करता साताऱ्यात भाजपने सर्वाधिक जागा मिळवत आपले संघटनात्मक बळ दाखवले आहे. सांगलीत पडळकरांच्या विजयाने भाजपला राजकीय बळ मिळाले, तर अहिल्यानगरमध्ये पक्षाच्या उमेदवारांनी महत्त्वाच्या जागा जिंकल्या. मात्र, काही ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांमध्येच लढती झाल्याने जिल्हा बँकांच्या अध्यक्षपदाच्या निवडीत स्थानिक राजकीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत.(District Bank Election Results 2026)
 
 




संबंधित मजकूर