
पानिपत (Panipat Railway Station Vandalism) : रेल्वे स्थानकावर प्रवाशी ट्रेनच्या डब्याची तोडफोड करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक गट दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या रेल्वेच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. हरियाणातील पानिपत रेल्वे स्थानकावरील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित प्रवाशांच्या वर्तनावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
दिव्यांग डब्यात प्रवेश नाकारल्याने दगडफेक?सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही जण रेल्वेच्या दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्याच्या दरवाजाबाहेर जमलेले दिसत आहेत. हे लोक दरवाजा जोरजोरात ठोठावत असल्याचे व्हिडिओत दिसते. याचदरम्यान, त्यांच्यापैकी एकाने दगड उचलून दरवाजाच्या काचेवर फेकल्याचा आरोप आहे. या दगडफेकीमुळे दरवाजाची काच फुटल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.(Panipat Railway Station Vandalism)
वंश अरोरा नावाच्या 'एक्स' वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात प्रवेश नाकारण्यात आल्याने संबंधित लोकांनी हा प्रकार केल्याचा दावा त्याने केला आहे. या डब्यात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना त्यांनी खिडकीची काचही फोडल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियावर कारवाईची मागणी
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी संबंधित प्रवाशांच्या कृत्याचा निषेध केला आहे. रेल्वेच्या मालमत्तेची तोडफोड करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी अनेक वापरकर्त्यांनी केली आहे. तर, दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यांचा आदर राखणे आणि त्यांच्या प्रवासाच्या सुविधांमध्ये अडथळा निर्माण न करणे आवश्यक असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. (Panipat Railway Station Vandalism)
व्हिडिओ शेअर करणाऱ्या एक्स वापरकर्त्याच्या दाव्यानुसार, ही पोस्ट करताना या घटनेप्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. तसेच, रेल्वे प्रशासनाकडूनही यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
या घटनेमुळे सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, रेल्वेच्या राखीव डब्यांचे नियम आणि दिव्यांग प्रवाशांच्या सुविधांचा आदर राखण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Panipat Railway Station Vandalism)