अमली पदार्थांची परिसंस्था समूळ नष्ट करणार;‘नशामुक्त महाराष्ट्र लक्ष्यवेध १.०’ अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

    29-Nov-2026
 
Nasha Mukt Maharashtra campaign
 
मुंबई: (Nasha Mukt Maharashtra campaign)राज्यातील तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. अमली पदार्थांची संपूर्ण परिसंस्था समूळ नष्ट करून महाराष्ट्र नशामुक्त करण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यासाठी जिल्हास्तरीय यंत्रणांच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन करण्यात येणार आहे.
 
राज्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने ‘नशामुक्त महाराष्ट्र – लक्ष्यवेध १.०’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय नार्को समन्वय समितीची बैठकही झाली.(Nasha Mukt Maharashtra campaign)
 
मुख्यमंत्री म्हणाले की, अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पैसा असल्याने विविध यंत्रणांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होतात. विशेषतः १४ ते २४ वयोगटातील तरुणांचा सेवनासह वितरणाच्या साखळीत वापर केला जात आहे. त्यामुळे या समस्येकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून पाहणे आवश्यक आहे. या लढ्यासाठी पोलिसांसह आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, जीएसटी, शालेय व उच्च शिक्षण विभागांनी एकत्रितपणे काम करावे. पुरवठा साखळीवर कारवाई करण्याबरोबरच जनजागृती, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनावरही भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
 
अभियानासाठी राज्यातील २० प्रशासकीय विभागांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, सहा प्रमुख स्तंभांवर आधारित २१ कृती मुद्दे ठरविण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय एनसीओआरडी समित्यांच्या कामगिरीसाठी ४० निकष आणि ६५० गुणांची मूल्यमापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. कामगिरीत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी ‘ड्रग फ्री स्कूल’ आणि ‘ड्रग फ्री व्हिलेज’ उपक्रमांद्वारे जनजागृती करण्याची माहिती दिली. तर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी अमली पदार्थ तस्करीतील आर्थिक व्यवहारांचा तपास, गुन्हेगारी नेटवर्कचा शोध आणि आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.(Nasha Mukt Maharashtra campaign)
 




संबंधित मजकूर