अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी ‘महाखनिज २.०’चा वापर अनिवार्य; अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार

गौण खनिज व्यवस्थापनात पारदर्शकतेसाठी महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ५ हजार कोटींचे महसूल उद्दिष्ट, एम-सँड वापर वाढविण्यावर भर

    29-Nov-2026
 
Mahakhanij 2.0 Maharashtra
 
नवी मुंबई : (Mahakhanij 2.0 Maharashtra)राज्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, वाळूची अनधिकृत वाहतूक आणि महसूल गळतीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. ‘महाखनिज २.०’ प्रणालीच्या माध्यमातून उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर डिजिटल नियंत्रण आणण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, अवैध उत्खनन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासह त्यांच्या गोपनीय अहवालातही त्याची नोंद करण्याबाबत विचार सुरू आहे. गौण खनिजातून राज्याने पाच हजार कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट निश्चित केले असून, त्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
नवी मुंबईतील विभागीय आयुक्त कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांसाठी आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत बावनकुळे बोलत होते. गौण खनिज व्यवस्थापनातील पारंपरिक कार्यपद्धती बदलून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी ‘महाखनिज २.०’ प्रणाली प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.(Mahakhanij 2.0 Maharashtra)
 
राज्यातील मागील १५ वर्षांतील अवैध उत्खनन, अनधिकृत वाहतूक आणि दंडवसुलीचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा आणि तालुकानिहाय अधिकृत-अवैध उत्खनन, जमा झालेली रॉयल्टी आणि थकीत महसूल यांची अद्ययावत माहिती प्रणालीवर असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड विकसित करून कोणत्या स्तरावर किती अर्ज प्रलंबित आहेत, याची माहिती उपलब्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले.
 
बांधकाम प्रकल्पांसाठी लागणाऱ्या गौण खनिजाची मागणी संबंधित विभागांनी थेट प्रणालीवर नोंदवावी, अशी सूचना करण्यात आली आहे. इमारतींच्या बांधकाम परवानगी प्रक्रियेतही आवश्यक गौण खनिजाची माहिती नोंदविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अंतिम वापरकर्त्यालाच थेट ऑनलाइन रॉयल्टी भरण्याची सुविधा देण्याचाही शासनाचा विचार आहे. यामुळे खनिजाचा प्रत्यक्ष वापर, रॉयल्टी आणि महसूल यावर एकत्रित नियंत्रण ठेवता येणार आहे.(Mahakhanij 2.0 Maharashtra)
 
दरम्यान, गुजरात, छत्तीसगड आणि तेलंगणा या सीमावर्ती राज्यांतून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समन्वय बैठक घेण्यात येणार आहे. नैसर्गिक वाळूवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एम-सँड क्रशर उभारण्यावर भर देण्यात येणार असून, पुढील तीन वर्षांत कृत्रिम वाळूचा वापर वाढविण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले.
 
विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सादरीकरणातून प्रणालीची माहिती दिली. जीपीएस ट्रॅकिंग, ई-पंचनामा, विविध विभागांशी एकात्मिक जोडणी आणि अर्जांच्या मंजुरीची स्थिती तपासण्याची सुविधा या प्रणालीत उपलब्ध आहे. गेल्या तीन महिन्यांत १० लाखांहून अधिक डिजिटल वाहतूक परवाने तयार झाले असून, सुमारे ५० लाख ब्रास उत्खननाला परवानगी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
 
कार्यशाळेनंतर बावनकुळे यांनी ‘महाखनिज’ वॉर रूमला भेट देऊन अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Mahakhanij 2.0 Maharashtra)
 




संबंधित मजकूर