ठाणे : (Kalwa FDA seizure)प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने वाहतूक करणाऱ्या आयशर कंटेनरवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कळव्यात मोठी कारवाई केली आहे. इलेक्ट्रॉनिक टेबल फॅन, सिलिंग फॅन आणि अन्य साहित्याच्या आडून प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या गोण्यांची वाहतूक केली जात असल्याचे तपासणीत उघड झाले. या कारवाईत ६६.७८ लाख रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि २८ लाख रुपये किमतीचे वाहन, असा एकूण ९४.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चालकासह उत्पादक, वाहतूकदार आणि वितरक अशा आठ जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. मुंब्रा येथून भिवंडीच्या दिशेने प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवून TG 12 U 1611 क्रमांकाचा आयशर कंटेनर अमित गार्डन सर्कल, कळवा येथे पोलिसांच्या मदतीने अडविण्यात आला.(Kalwa FDA seizure)
कंटेनरची तपासणी केली असता प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या गोण्यांच्या पुढील आणि मागील बाजूस इलेक्ट्रॉनिक टेबल फॅनचे २९ बॉक्स, सिलिंग फॅनचे आठ बॉक्स, जेवणाच्या डब्यांचे पाच बॉक्स, लाइफ सेव्हिंग मेडिसिनचा एक बॉक्स आणि अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. या साहित्याच्या आडून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. दिशाभूल करून तपासणी टाळण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आल्याचा संशय आहे.
या प्रकरणी वाहनचालक मेहराज करीम शेख, उत्पादक बाबू मिया मुजावर आणि सावन भाटेवार, वाहतूकदार राजू, साकीनाका येथील वितरक विकास गुप्ता, गोवंडी येथील जावेद आणि भिवंडी येथील गुल्लू यांच्यासह माल स्वीकारणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ७४३/२०२६ नुसार पुढील तपास सुरू आहे.(Kalwa FDA seizure)
ही कारवाई सहाय्यक आयुक्त पी. ए. विशे, अन्न सुरक्षा अधिकारी ए. जे. वीरकायदे, एस. एल. जाधवर आणि दक्षता विभागाचे यू. एस. बडे यांनी कळवा पोलिसांच्या सहकार्याने केली. प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि अन्नभेसळीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी FDA च्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण विभागाचे सहआयुक्त डॉ. सचिन जाधव यांनी केले आहे.(Kalwa FDA seizure)