‘सरकार बदलायचे नसून देशाची व्यवस्थाच बदलायची आहे’; बेळगावातील ‘संविधान वाचवा’ कार्यक्रमातून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

 
Devendra Fadnavis Congress criticism
 
मुंबई : (Devendra Fadnavis Congress criticism)देशात मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसला केवळ सरकार बदलायचे नसून देशाची संपूर्ण व्यवस्थाच बदलायची आहे. भारतीय संविधान आणि लोकशाही व्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. बेळगाव येथे आयोजित ‘संविधान वाचवा’ कार्यक्रमात ते बोलत होते.
 
फडणवीस म्हणाले की, सध्या देशात केवळ राजकीय संघर्ष सुरू नसून नरेटिव्हची लढाई सुरू आहे. काही शक्तींनी भारताचे संविधान नाकारून लोकशाही व्यवस्था संपवण्याचा आणि देशात अराजकता निर्माण करून नवी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. या प्रक्रियेला ‘रेजिम चेंज’ असे नाव दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.(Devendra Fadnavis Congress criticism)
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केली. मात्र, याच संविधानाला बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांमधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी तेथील अस्थिरतेमागे संविधानिक व्यवस्थेला बसलेले धक्के असल्याचे सांगितले. भारतातही अशाच प्रकारची नवी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.
 
राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवरही फडणवीस यांनी निशाणा साधला. राहुल गांधी सातत्याने वेगवेगळी विधाने करतात. ते वारंवार खोटे बोलत असल्याचे लोकांना वाटते; मात्र रोज एकच खोटे सांगितले तर एक दिवस ते खरे वाटू लागते, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. सोशल मीडिया आणि त्याच्या अल्गोरिदमचा वापर करून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न काही देशांमध्ये झाल्याचा दावाही त्यांनी केला.(Devendra Fadnavis Congress criticism)
 
१२ वर्षांत ५० कोटी लोक गरिबीतून बाहेर
 
यावेळी केंद्र सरकारच्या आर्थिक कामगिरीचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत भारताने मोठी प्रगती केली आहे. जागतिक बँकेच्या अहवालाचा संदर्भ देत त्यांनी भारताने सुमारे ५० कोटी लोकांना तीव्र गरिबीतून बाहेर काढल्याचे सांगितले. काँग्रेसने अनेक दशके गरिबी हटविण्याच्या घोषणा केल्या; मात्र त्यावेळी मोठ्या संख्येने लोकांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण होते, अशी टीका त्यांनी केली. भारताच्या वाढत्या प्रगतीमुळे जगातील काही देशांना आनंद होत नसल्याचे सांगत फडणवीस यांनी चीनवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.(Devendra Fadnavis Congress criticism)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर