नवी दिल्ली (BJP Whip Parliament Special Session 2026) : संसदेच्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार,दि. २९ नोव्हेंबर रोजी भाजप संसदीय पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दरम्यान, भाजपने लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश देणारा तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे.
भाजप खासदारांना तीन ओळींचा व्हिप
संसदेच्या विशेष अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयके चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या लोकसभा खासदारांना तीन ओळींचा व्हिप बजावला आहे. त्यानुसार, सोमवार, ३० नोव्हेंबर ते गुरुवार, ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत सर्व खासदारांनी लोकसभेत अनिवार्यपणे उपस्थित राहावे आणि सरकारच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या कालावधीत काही महत्त्वाचे विधायी कामकाज मंजुरीसाठी सभागृहात मांडले जाणार असल्याचे व्हिपमध्ये नमूद करण्यात आले आहे. (BJP Whip Parliament Special Session 2026)
महिला आरक्षणाबाबत मोदींचा पुनरुच्चार
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ‘नारी शक्ती वंदन दुरुस्ती’ ही काळाची गरज असल्याचे सांगत महिलांच्या सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार कायम असल्याचे त्यांनी म्हटले. (BJP Whip Parliament Special Session 2026)
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ संदेशात मोदी म्हणाले की, देशाच्या राजकीय व्यवस्थेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी अनेक दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. आपणही हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला सक्षमीकरण आणि देशहिताच्या बाबतीत राजकीय स्वार्थाला प्राधान्य दिल्यास त्याचे नुकसान देशाला सहन करावे लागते, असेही मोदी यांनी म्हटले. भाजप-एनडीएची महिला सक्षमीकरणाबाबतची बांधिलकी कायम असून, देशातील निम्म्या लोकसंख्येच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि राष्ट्राच्या भविष्यासाठी हे आश्वासन पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. (BJP Whip Parliament Special Session 2026)
विशेष अधिवेशनात महत्त्वाची विधेयके मांडणार
३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात केंद्र सरकारकडून महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. (BJP Whip Parliament Special Session 2026)
या विधायी प्रस्तावांमध्ये संविधान (१३२वी दुरुस्ती) विधेयक, २०२६, परिसीमन (दुसरे) विधेयक, २०२६ आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित कायद्यांमधील दुरुस्तीचा समावेश आहे. या प्रस्तावांनुसार लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे. यामध्ये राज्यांमधून कमाल ८१५ आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ३५ सदस्य असू शकतील.
त्यामुळे विशेष अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रस्तावांवर काय चर्चा होते आणि त्यांना सभागृहाची मंजुरी मिळते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (BJP Whip Parliament Special Session 2026)