वर्ध्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या नव्या प्रशिक्षण केंद्रासाठी २८.७५ हे. आर. जमीन मंजूर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वपूर्ण निर्णय

    28-Nov-2026


Wardha SRPF Training Centre
 
मुंबई : (Wardha SRPF Training Centre)वर्धा जिल्ह्यातील पांढरकवडा येथे राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) नवे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी महसूल विभागाने २८.७५ हेक्टर आर शासकीय जमीन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
 
मौजा पांढरकवडा (ता. व जि. वर्धा) येथील सर्व्हे क्रमांक ५५ मधील ही जमीन गृह विभागामार्फत समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ४ (हिंगणा रोड, नागपूर) यांना प्रदान करण्यात आली आहे. महसूल मुक्त, सारामाफीने तसेच भोगाधिकार मूल्यरहित किमतीने ‘भोगवटादार वर्ग-२’ या धारणाधिकाराने ही जमीन देण्यात आली आहे.(Wardha SRPF Training Centre)
 
या जमिनीच्या वापरासाठी शासनाने काही अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करावा लागणार असून, ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत बांधकामास सुरुवात करणे बंधनकारक राहील. तसेच शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय जमिनीची विक्री, हस्तांतरण किंवा पोटविभाजन करता येणार नाही आणि अटींचा भंग झाल्यास जमीन शासनजमा करण्याचा अधिकार शासनाकडे राहील.
 
याविषयी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दलाचे प्रशिक्षण अद्ययावत असणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या नव्या प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक ती जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रामुळे जवानांना दर्जेदार प्रशिक्षण मिळून राज्याच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल.” नव्या प्रशिक्षण केंद्रामुळे वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील पोलीस प्रशिक्षणाच्या सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून, आगामी काळात सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.(Wardha SRPF Training Centre)
 
 




संबंधित मजकूर