आपल्या संविधानाचे वेगळेपण

    28-Nov-2026   

Uniqueness of the Indian Constitution
 
भारताची राज्यघटना समजून घेण्यासाठी, तिच्या वैचारिक अधिष्ठानाचा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीचा मागोवा घ्यावा लागतो. भारतीय समाजजीवनाची वैशिष्ट्ये, सांस्कृतिक परंपरा आणि राष्ट्राच्या एकात्मतेची आकांक्षा यांचा साधलेला समन्वय हे भारतीय संविधानाचे खरे सामर्थ्य. ‘विवेक प्रकाशन’तर्फे आज ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’त प्रकाशित होणार्‍या ‘संविधान संकल्पनांचा विकास : पाश्चात्त्य आणि भारतीय’ या पद्मश्री रमेश पतंगे लिखित पुस्तकातील हा अंश...
 
जगात १९२ देश आहेत. प्रत्येक देशात त्यांचे त्यांचे शासन आहे. या १९२ देशांपैकी पाच देश असे आहेत की, ज्यांचे लिखित संविधान नाही. ते देश असे- १) ब्रिटन २) इस्रायल ३) न्यूझीलंड ४) सौदी अरब ५) कॅनडा. या देशांत लिखित संविधान नसले, तरी देश चालवणारे कायदे आहेत, रूढी-परंपरा आहेत, त्यावर त्यांचा देश चालतो.
 
जगातील पहिले लिखित संविधान तयार करण्याचा मान अमेरिकेला जातो. हे लिखित संविधान १७८७ साली लिहून पूर्ण झाले. त्याचाही एक इतिहास आहे. १६२१ साली ब्रिटनमधून ‘प्युरिटन’ या ख्रिश्चन पंथाचे १०० लोक, अमेरिकेत वसाहत करण्यासाठी आपला देश सोडून निघाले. दुसर्‍या देशात वसाहत करण्यासाठी जाणार्‍या समूहाला राजा किंवा राणी एक सनद देत असे. ही सनद म्हणजे, नवीन प्रदेशात कोणत्या कायद्याने ते बांधलेले राहतील, याचा दस्तऐवज असे. ‘मे प्लॉव्हर’ जहाजावरील समूहाला राजाने सनद दिली नाही. हे ‘प्युरिटन’ लोक आपल्या देशात नको, अशी त्याची भावना होती. अमेरिकेच्या किनार्‍याला लागण्यापूर्वी ‘मे प्लॉव्हर’ जहाजावरील लोक एकत्र बसले आणि त्यांनी आपापसातील संबंध कसे राहतील, याचे नियम तयार केले. त्याला ‘मे फ्लॉव्हर करार’ असे म्हणतात. लोकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन केलेला जगातील पहिला कायदा असावा. म्हणून त्याचे संविधानाच्या इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे.
 
भारत कसा शासित केला जावा, याचा सर्वोच्च कायदा करण्यासाठी १९४६ साली घटना समितीची निर्मिती झाली. या घटना समितीने १९४९ साली जो कायदा केला, त्याचे नाव ‘भारताची राज्यघटना’ असे आहे. ही आपली राज्यघटना दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकृत झाली आणि दि. २६ जानेवारी १९५० पासून तिचा अंमल सुरू झाला.
 
संविधानाची मूलभूत तत्त्वे असतात. या मूलभूत तत्त्वांच्या विकासाचा युरोपचा स्वतंत्र इतिहास आहे, तसाच भारताचा स्वतंत्र इतिहास आहे. दोन्ही ठिकाणची भिन्नभिन्न शब्दावली असली, तरी मूलभूत आशय सारखे आहेत. तेही आपण बघितले आहेत. यांचे ज्ञान आपल्या संविधानकर्त्यांना, संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांना उत्तम प्रकारे होते. आपल्या संविधानावर काहीजण आक्षेप घेतात की, त्यात नवीन काही नाही. ब्रिटन, अमेरिका, आयलॅण्ड इत्यादी संविधानातील उधार-उसनवारी आपण केली आहे. या आक्षेपाला डॉ. आंबेडकरांनी घटना समितीच्या चर्चेत उत्तर दिले आहे. त्याचा सारांश असा की, "घटनेच्या मूलभूत संकल्पनेचा नवीन शोध लावण्याचा विषय संपलेला आहे आणि जे ज्ञान आज उपलब्ध आहे, ते मानवजातीचे ज्ञान आहे. या ज्ञानाचा वापर करणे म्हणजे, उधार-उसनवारी केले, असे म्हणणे अप्रस्तुत आहे.”
 
असे जरी असले, तरी डॉ. बाबासाहेबांनी अंतिमत: जे संविधान देशाला सादर केले, त्याचे वेगळेपण जगातील अल्प संविधानापेक्षा उठून दिसणारे आहे. आपल्या संविधानावर ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांची दोन पुस्तके आहेत. पहिल्याचे नाव आहे, ‘दी इंडियन कॉन्स्टिट्यूशन’, ‘कॉर्नर स्टोन ऑफ अ नेशन अ‍ॅण्ड वर्किंग ए डेमोक्रेटिक कॉन्स्टिट्यूशन’ या दोन्ही पुस्तकांची बरोबरी करील, असे अन्य पुस्तक नाही. भारतीय संविधानाच्या वेगळेपणाबद्दल त्याचे भाष्य अप्रतिम आहे.
 
ते म्हणतात, "फिलाडेल्फिया येथे १७८७ साली अमेरिकेचे संविधान बनविण्यासाठी जी समिती बसली, तिचे जेवढे महत्त्व आहे; तेवढे महत्त्व भारतीय संविधान समितीला आहे.” त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
फिलाडेल्फिया येथील अमेरिकेची संविधान सभा एका विशिष्ट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आहे. तेव्हाच्या १३ राज्यांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. त्यांना अस्तित्वात नसलेले अमेरिका नावाचे राज्य निर्माण करायचे आहे, त्याची शासनपद्धती ठरवायची आहे. प्रजातंत्राच्या मूलभूत संकल्पनांचे कायदे करायचे आहेत. त्यांच्यापुढे ज्याची नक्कल करावी, असे कुठलेही प्रारूप नव्हते. ते जे काही करणार होते, ते पूर्णपणे नवीन होते. ते त्यांनी करून दाखवले.
 
भारतीय संविधान सभेपुढे नवीन देश घडविण्याचा विषय नव्हता. भारत अतिप्राचीन देश आहे. तो विविध राज्यांत विभागला गेला आहे. त्याला एका राजकीय रूपात उभे करायचे होते. सांस्कृतिकदृष्ट्या भारत एक असला, तरी ऐतिहासिक काळापासून तो छोट्या-छोट्या राज्यांत विभागला गेलेला देश आहे. त्याला एका राजकीय रूपात उभे करणे सोपे काम नव्हते.
 
एका राजकीय रूपात उभे करणे म्हणजे, एका प्रबळ सत्तेच्या अमलाखाली सर्व भारत आणणे होय. हे करीत असताना विविध राज्यांच्या राजकीय आशा-आकांक्षा यांना धक्का लावून चालणार नव्हते. म्हणून, आपल्या घटनाकारांनी प्रबळ केंद्रसत्ता असलेले आणि मर्यादित स्वायत्त असणारी राज्ये निर्माण करणारी एक रचना उभी केली. इंग्रजीत तिला ‘युनिटरी इन स्पिरीट’ आणि ‘फेडरल इन स्ट्रचर’ असे म्हणतात. म्हणजे, भारतीय राज्याचा आत्मा केंद्रीभूत सत्तेचा आहे, रचना मात्र संघराज्यांची आहे. जगातील अन्य कुठल्याही संविधानाचे हे वैशिष्ट्य नाही.
 
भारतात जी घटकराज्ये आहेत, ती स्वायत्त आहेत. त्याच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. आर्थिक विकासाची धोरणे ही राज्ये ठरवू शकतात. राज्यात शांतता-सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. रस्ते, कृषी, पाणी, वीज इत्यादी सर्व विषय राज्यांना हाताळावे लागतात. राज्याचे अर्थसंकल्पदेखील हजारो कोटींचे असतात. परंतु, ही सर्व राज्ये केंद्राधीन राज्ये आहेत. केंद्राच्या कायद्यांना प्राधान्य देणे, त्यांच्यावर बंधनकारक आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वसत्ता केंद्राच्या ताब्यात येते. राज्यशासन जर कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यास असमर्थ झाले, तर ते शासन केंद्र सरकार बरखास्त करू शकते. अशा कोणत्याही व्यवस्था जगातील अन्य कोणत्याही संविधानात नाहीत.
 
ग्रॅनव्हिले ऑस्टिन यांनी संविधानाची विवेकशक्ती 'Conscience of the Constitution' या शब्दाचा वापर केला आहे. या दोन्ही शब्दांचा अर्थ प्रथम समजून घेऊया. ‘संविधान’ हा कायद्याचा संग्रह आहे. ‘कायदा’ हा अंमलबजावणीसाठी असतो. ‘विवेकशक्ती’ हा शब्दप्रयोग अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात आहे. विवेकशक्ती म्हणजे, चांगल्या-वाईटाची निवड करणे, न्यायाची प्रस्थापना करणे. सर्वांच्या कल्याणाचा विचार करणे म्हणजे, कायद्याची अंमलबजावणी करताना विवेकशक्तीचा वापर अनिवार्य आहे. कायद्याचे शब्दश: अर्थ काढून चालत नाहीत. त्यात दडलेला भाव कोणता आहे, हे समजून घेणे अत्यावश्यक असते.
 
ऑस्टिन यांनी फार सुंदर शब्दप्रयोग केला आहे. ‘सिमलेस वेब’ म्हणजे, बिनधाग्याचे जाळे. लोकशाही, राष्ट्रीय ऐय, सामाजिक न्याय, मूलभूत अधिकार असे आपल्या राज्यघटनेच्या संदर्भातील मौल्यवान विषय आहेत. यातील एका विषयाला हात लावला असता, दुसरे कंप पावू लागतात. मग त्यामध्ये संतुलन साधावे लागते. उदा. राज्यघटनेच्या ‘कलम १४’प्रमाणे कायद्यापुढे सर्व समान असतील. ‘कलम १५’प्रमाणे राज्य स्त्री-पुरुष, जात-धर्म वगैरे भेदभाव करणार नाही आणि राज्य धोरणाच्या निदेशक तत्त्वात स्त्री, मुले, मागासवर्गीय याचे संरक्षण करून त्यांच्या विकासाची तरतूद करावी, असे निर्देश दिले आहेत. त्याची धोरणे आणि कायदे झाले की, आमच्या मूलभूत अधिकारांवर गदा आली, असे म्हणत काही लोक न्यायालयाकडे धाव घेतात. मग न्यायालये त्याचा निवाडा करतात. सामाजिक न्याय, मूलभूत अधिकारांच्या मर्यादा, या सर्वांची सांगड घालून, आपली न्यायालये निर्णय करतात.
 
जगातील कोणत्याही देशाच्या संविधानात, या प्रकारची संविधानिक विवेकशक्ती हा प्रकार नाही. बहुतेक देशांची संविधाने राजकीय असतात. ही संविधाने महत्त्वाचे राजकीय निर्णय देतात. राज्याचे स्वरूप कसे असेल, शासनाचा कोणता प्रकार असेल, मूलभूत अधिकार कोणते असतील, सत्तेचे त्रिभाजन कसे केले जाईल, न्यायालयाचे स्वातंत्र्य कोणत्या मर्यादेपर्यंत असेल, सत्तेचा उगम प्रजा असेल इत्यादी मूलभूत गोष्टी या संविधानात असतात. त्या आपल्याही संविधानात आहेत म्हणून, एवढ्याच कसोट्यांवर आपल्या संविधानाचे वेगळेपण अधोरेखित करता येत नाही. वरवरचा अभ्यास करून वरील गोष्टी आपले वेगळेपण आहे असे सांगतात; पण ते बरोबर नाही.
 
आपले संविधान राजकीय रचना निश्चित करते. ते तेथे थांबत नाही, आपल्या संविधानाने कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली आहे. राज्य या संस्थेची कामे अंतर्गत सुरक्षा आणि शांतता राखणे, सीमांचे रक्षण करणे, परराष्ट्रीय धोरण निश्चित करणे, अर्थ विकासाचे अनुकूल कायदे करणे, अशी सांगितली जातात. आपल्या राज्यघटनेने या सर्व जबाबदार्‍या शासनकर्त्यांवर टाकल्या आहेत. त्यापुढे जाऊन आणखी दोन विषयांना राज्यघटनेने प्राधान्य दिले आहे.
 
त्यातील पहिला विषय आहे, सामाजिक पुनर्रचनेचा. आपला समाज जातिपातींत विभागला गेला आहे. उच्च-नीच ही भावना आहे. अस्पृश्यतेच्या रूढी आहेत. स्त्रिला दुय्यम दर्जा देण्याची परंपरा आहे आणि अत्यंत चुकीने या सर्वांमागे धर्माचे अधिष्ठान उभे केले आहे. भारताच्या दीर्घ पारंतत्र्याची जी कारणे आहेत, त्यातील एक कारण सामाजिक विघटनेचे आहे. समाज एकजिनसी, एकमय, समरस झाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य टिकून राहणे कठीण आहे. म्हणून, आपल्या घटनाकारांनी जातिभेद नाकारले आहेत. अस्पृश्यता कायद्याने समाप्त करून टाकली आहे आणि महिलांना समान दर्जा दिलेला आहे.
 
धार्मिक कायदे प्रथम मानणार्‍या समाजात, राज्यसंस्थेच्या कायद्याने केलेला हा हस्तक्षेप आहे. राज्याचा कायदा मोडला असता, तो दंडनीय अपराध होतो. याचा अर्थ असा झाला की, सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात राज्याची भूमिका बघ्यांची राहणार नसून, ती सक्रिय राहील. इंग्रजांच्या शासनकाळात शासनकर्त्यांची भूमिका बघ्याची होती. त्यांनी मर्यादित हस्तक्षेप केला आहे परंतु, हे आपले राज्य आहे आणि आपल्या राज्यात सामाजिक न्याय प्रस्थापित होणे अत्यावश्यक आहे.
 
आपली राज्यघटना राष्ट्रीय ऐयाचा गंभीरपणे विचार करते. घटनेच्या उद्देशिकेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’ अशा शब्दाने होते आणि शेवट ‘राष्ट्राची एकता आणि एकात्मता’ येथे होतो. भूमीवर राहणार्‍या लोकांचे राज्य असते आणि हे लोक भावनिकदृष्ट्या जेव्हा एकात्म होतात, तेव्हा त्याचे राष्ट्र होते, ही भावनिक एकात्मता बंधुभावनेने निर्माण होते. डॉ. बाबासाहेबांनी बंधुभावनेचा उल्लेख आपल्या उद्देशिकेत केलेला आहे. उद्देशिकेचे आत्मतत्त्व अथवा विवेकशक्ती बंधुभावयुक्त समाजजीवन उभे करून राष्ट्राची एकता आणि एकात्मता जपायची आहे, हे आहे. जगाच्या कुठल्याही संविधानात हा विषय नाही.
 
प्राचीन काळापासून आपला देश अनेक उपासना पंथाची जननी राहिला आहे. निर्गुणाची उपासना ते सगुणाची उपासना, तसेच नास्तिकवाद ते इहवाद अशा सर्व विचारधारा येथे गुण्यागोविंदाने नांदतात. प्रत्येकाला त्याच्या आवडीप्रमाणे उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. हे भारतीय संस्कृतीचे प्राणतत्त्व आहे. संविधानाने ते स्वीकारले आहे. आपली राज्यघटना ही विविध पद्धती आणि विचारांची मेळ घालणारी राज्यघटना आहे. कोणताही टोकाचा विचार तिने अधिकृत मानलेला नाही. अनिर्बंध स्वातंत्र्य, अनिर्बंध समता हा तिचा पाया नाही. अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला खाऊन टाकते आणि अनिर्बंध समता स्वातंत्र्य खाऊन टाकते. अमेरिका हे अनिर्बंध स्वातंत्र्याचे उदाहरण आहे आणि कम्युनिस्ट रशिया, चीन ही अनिर्बंध समतेची उदाहरणे आहेत.
 
कालानुरूप बदलत जाणारी लवचीक राज्यघटना, हे आपल्या राज्यघटनेचे वेगळेपण आहे. अमेरिकेची राज्यघटना बंदिस्त आहे. तिच्यात बदल करणे अवघड जाते. ‘काळे काळे म्हणून समान आणि गोरे गोरे म्हणून समान आहेत,’ हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलण्यास, तेथे ५०-६० वर्षे लागली. आपल्याकडे पाच-दहा वर्षेे खूप होतात. त्यामुळे घटनेच्या मूलभूत चौकटीचा सिद्धान्त आज प्रमाण मानला जातो. आपल्याकडे ‘सनातन’ हा शब्दप्रयोग आहे. त्याचा अर्थ होतो, जे नित्यनूतन ते सनातन. शाश्वताला कायम ठेवून काळानुरूप रचना बदलत जायचे, हा आपला सांस्कृतिक स्वभाव आहे. राज्यघटनेवर भाष्य करणारे सर्वोच्च न्यायालय या स्वभावाचे अनुसरण करते, असे अनुसरण करून राज्यघटनेचा कायदा सतत विकसनशील ठेवला जातो. आपल्या राज्यघटनेचे हे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
पुस्तकाचे मूल्य : ३५०/- रु.
नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८/ ८३६९३१९०९१
 




संबंधित मजकूर