परिसीमन विधेयकाच्या समर्थनार्थ शिवसेनेचा ठराव; एकनाथ शिंदेंची सर्व १५ खासदारांना दिल्लीला पोहोचण्याची सूचना

महिला आरक्षणासाठी ३३ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार; लोकसभेतील महाराष्ट्राच्या जागा ४८ वरून ७२ होण्याची शक्यता

    28-Nov-2026
 
 Shiv Sena Support Delimitation Bill
 
मुंबई (Shiv Sena Support Delimitation Bill) : महिला आरक्षणाशी संबंधित परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी विशेष अधिवेशनात विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करण्याचा निर्णय घेत शिवसेनेचे सर्व १५ खासदार रविवारीच दिल्लीत दाखल होतील, असे निर्देश शिंदे यांनी दिले.
 
या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, संदिपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि डॉ. ज्योती वाघमारे उपस्थित होते. तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार मिलिंद देवरा आणि संजय दिना पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला.
लोकसभेचे ३० नोव्हेंबर आणि राज्यसभेचे २ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात घटनादुरुस्ती आणि परिसीमन विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकामुळे महिलांना लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होण्यासोबतच लोकसभेतील सदस्यसंख्या ५४३ वरून ८१५ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होऊ शकतात. यामुळे राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आणि आवाज अधिक बुलंद होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. (Shiv Sena Support Delimitation Bill)
 
१९७६ पासून लोकसभा मतदारसंघांची संख्या गोठवण्यात आली असून, सध्या एका खासदाराला सुमारे २० ते २५ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करावे लागते. त्यामुळे 'एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य' या लोकशाही तत्त्वाला अनुसरून मतदारसंघांची पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. यामुळे खासदारांना मतदारांशी अधिक प्रभावीपणे संपर्क साधता येईल, तसेच ग्रामीण आणि शहरी भागांच्या समतोल विकासालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. (Shiv Sena Support Delimitation Bill)
 
शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना शिंदे म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. त्याच विचारांनुसार 'नेशन फर्स्ट' हीच शिवसेनेची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था प्रगती करत असून, केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण विधेयकाला पाठिंबा देऊन मोदींचे हात बळकट करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. लोकसभेतील १३ आणि राज्यसभेतील दोन असे शिवसेनेचे सर्व १५ खासदार दोन्ही सभागृहांत विधेयकाच्या बाजूने मतदान करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, या ठरावाची प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच एनडीएच्या प्रमुख नेत्यांना पाठविण्यात येणार आहे. महिला आरक्षण आणि लोकप्रतिनिधित्वाच्या विस्तारासाठी शिवसेना ठामपणे सरकारच्या पाठीशी उभी असल्याचा संदेश या ठरावातून देण्यात आला आहे. (Shiv Sena Support Delimitation Bill)





संबंधित मजकूर