नागपूर : ( Nagpur UMED Mall)नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर शहरातील महाल येथील बडकस चौक परिसरात ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहे. या जिल्हा विक्री केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी १९ कोटी ७५ लाख ५६ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकीय खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. ग्रामविकास विभागाने २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिला स्वयं-सहायता समूहांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यात उमेद मॉल उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात २० हजारांहून अधिक महिला स्वयं-सहायता समूह, १,०६३ ग्रामसंघ, ५८ प्रभागसंघ, २८५ उत्पादक गट आणि १२ शेतकरी उत्पादक संस्था कार्यरत आहेत. याशिवाय १२ हजारांहून अधिक समूह बिगरशेती क्षेत्रातील उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. या समूहांच्या उत्पादनांना संघटित, व्यापक आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर येथे उमेद मॉल उभारण्यात येणार आहे.( Nagpur UMED Mall)
नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यापारी, प्रशासकीय, शैक्षणिक, औद्योगिक आणि वाहतूक केंद्र असल्याने ग्रामीण उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. नागपूर शहरातील ग्राहकवर्ग, व्यापारी क्षेत्र, औद्योगिक व संस्थात्मक खरेदीदार तसेच जिल्ह्यातील कृषी आणि अन्नप्रक्रिया उत्पादनांची विविधता लक्षात घेऊन उमेद मॉल विकसित करण्यात येणार आहे.
हा मॉल केवळ किरकोळ विक्री केंद्र न राहता ग्रामीण उत्पादनांचे संकलन, गुणवत्ता तपासणी, वर्गीकरण, प्रक्रिया, मूल्यवर्धन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, साठवणूक, घाऊक व किरकोळ विक्री आणि संस्थात्मक खरेदीदारांपर्यंत पुरवठा यांचा समन्वय साधणारे एकात्मिक केंद्रीय विपणन व व्यवसाय केंद्र म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासोबतच व्यवसाय विस्ताराच्या संधी निर्माण होणार आहेत.( Nagpur UMED Mall)
प्रस्तावित इमारतीमध्ये विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, सोलर रूफटॉप, अग्निशमन व्यवस्था, सीसीटीव्ही, लिफ्ट, पर्यावरणपूरक बांधकाम, नैसर्गिक प्रकाश व वायुवीजन, पाणी आणि ऊर्जा बचतीच्या उपाययोजनांचा समावेश असेल. महिला पदाधिकाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष तसेच दिव्यांगांसाठी रॅम्प आणि आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बांधकाम जास्तीत जास्त दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन शासन निर्णयात करण्यात आले आहे.
उमेद मॉल हा महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करणारा केंद्रबिंदू ठरण्यासोबतच ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आणि स्वावलंबनाचा महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल. उत्पादनांचे मूल्यवर्धन, ब्रँडिंग, बाजारपेठेचा विस्तार आणि व्यवसायाच्या नव्या संधी यामुळे ग्रामीण महिला उद्योजकांना अधिक बळ मिळेल. महिलांच्या आर्थिक प्रगतीतून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचे पाऊल ठरेल.( Nagpur UMED Mall)
ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी मेहनत, कौशल्य आणि कल्पकतेच्या जोरावर विविध उत्पादने तयार करून उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्यांच्या उत्पादनांना व्यापक आणि कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. महाल भागात उमेद मॉल उभारण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.