ठाणे (Thane Deep Clean Drive) : शहरातील कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ रस्ते, पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत होर्डिंग्ज आणि नागरी सुविधांचा बोजवारा यावर नियंत्रण आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपरिषदांना आता स्वच्छतेची विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. येत्या ३० नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक रस्त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई, बांधकामांचा मलबा हटविणे, नालेसफाई, पदपथांची दुरुस्ती आणि रस्त्यांचे सुशोभीकरण अशा विविध कामांचा या मोहिमेत समावेश आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील महापालिकांच्या स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेत प्रशासनाला कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रत्येक रस्त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर
स्वच्छता मोहीम केवळ उद्घाटनापुरती किंवा काही दिवसांपुरती मर्यादित न राहता ती दैनंदिन व्यवस्थेचा भाग झाली पाहिजे, अशी भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली. प्रत्येक रस्त्याच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमून त्याची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्याबरोबरच सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा, मेडिक्लेम आणि आर्थिक पाठबळ देण्यावरही त्यांनी भर दिला.(Thane Deep Clean Drive)
अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा
शहरांच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्जवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उदय सामंत यांनी दिले. परवानगीशिवाय उभारलेल्या होर्डिंग्जवर कारवाई करण्याबरोबरच अस्तित्वातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासही सांगण्यात आले. बांधकामांचा मलबा, रस्त्यांवरील कचरा आणि अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित करण्यात आली आहे.(Thane Deep Clean Drive)
कल्याण-शिळफाटा कोंडीवर AIचा उतारा
कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मेट्रो मार्गिका १२ चे काम, डबल डेकर उड्डाणपुलाची संकल्पना आणि आधुनिक रस्ते विकसित करण्याच्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. सायकलस्वारांसाठी स्वतंत्र सुविधा आणि रस्त्यांचे नियोजनबद्ध सुशोभीकरण करण्यावरही भर देण्यात आला.
उल्हासनगरच्या नागरी समस्यांवर लक्ष
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे, कचरा आणि बांधकामांचा मलबा, नालेसफाई तसेच यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. मेट्रो प्रकल्पांच्या ठिकाणी साचलेला कचरा हटविणे, पदपथ सुस्थितीत ठेवणे आणि अनधिकृत नळजोडण्यांची तपासणी करून एका आठवड्यात कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठ्यात वॉटर मीटरिंगची अंमलबजावणी आणि पाणीपट्टीच्या थकबाकीचाही प्रश्न बैठकीत उपस्थित झाला.(Thane Deep Clean Drive)
एमआयडीसीच्या पाण्यासाठी ११ कोटी
अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील स्वच्छता आणि विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. एमआयडीसी क्षेत्रातील पाणीपुरवठ्यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. स्वच्छतेच्या कामांमध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविणे आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी करून घेण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.(Thane Deep Clean Drive)
३० नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीचे आव्हान
या मोहिमेत रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे आणि नाल्यांची स्वच्छता, रोड मार्किंग, रंगरंगोटी, कचरापेट्यांची व्यवस्था आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. जेसीबी, टिपर, मेकॅनिकल स्वीपर आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करून स्वच्छता केली जाणार आहे..