म्यानमारविरुद्धच्या निकालामुळे रोहिंग्यांचे प्रश्न सुटणार का?

    27-Nov-2026   

Myanmar Rohingya Verdict 
 
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका ऐतिहासिक निकालामध्ये म्यानमारला रोहिंग्या हत्याकांडासाठी जबाबदार धरले आहे. दि. १९ नोव्हेंबर रोजी ‘नऊ विरुद्ध सहा’ न्यायाधीशांनी हा निकाल दिला. पण, म्यानमारविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे रोहिंग्यांचे प्रश्न सुटतील का? याचा आढावा घेणारा हा लेख...
 
२०१७ साली म्यानमारमधील राखीन प्रांतात वसलेल्या रोहिंग्यांची मोठ्या संख्येने हत्या करण्यात आली, महिलांवर बलात्कार करण्यात आले आणि लाखो रोहिंग्यांना म्यानमार सोडून शेजारच्या बांगलादेश, भारत आणि आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये आसरा घ्यावा लागला, यासाठी म्यानमारच्या लष्करी राजवटीला थेट जबाबदार धरण्यात आले. यापूर्वी, २००७ मध्ये सर्बिया विरुद्ध बोस्निया यादवी युद्धामध्ये बोस्नियन लोकांचे हत्याकांड झाल्याचा निर्णय या न्यायालयाने दिला होता. पण, त्यातही सरकारला थेट जबाबदार धरण्यात आले नव्हते. म्यानमारमध्ये गेली अनेक दशके लष्करी राजवट आहे. २०१२ ते २०२१ या काळामध्ये म्यानमारमध्ये लष्कराच्या आशीर्वादाने लोकशाहीसदृश व्यवस्था अस्तित्वात होती.
 
म्यानमारच्या तेल आणि नैसर्गिक वायूने समृद्ध असलेल्या राखीन प्रांतामध्ये रोहिंग्यांची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. हे लोक म्यानमारचे नसून, बांगलादेशी असल्याचा म्यानमारचा दावा आहे. रोहिंग्यांची संख्या वेगाने वाढत असून, त्यांच्यामध्ये इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारसरणीने शिरकाव केल्याचा राग म्यानमारमध्ये सर्वत्र आहे.
 
भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये १ हजार ६४३ किमी लांबीची सीमा असली, तरी बहुतांश भारतीयांना म्यानमारबद्दल फारशी माहिती नसते. म्यानमारशी आपले हजारो वर्षांचे सांस्कृतिक संबंध आहेत. १९व्या शतकात इंग्रजांची ब्रह्मदेशातील राज्यसत्तांशी तीन युद्धे झाली. १८८६ साली तिसर्‍या युद्धात थिबा राजाचा पराभव करून ब्रिटिशांनी ब्रह्मदेश भारताला जोडला. त्यामुळे काम व व्यापारानिमित्त मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक ब्रह्मदेशात वसले. स्थानिक विरोध तीव्र झाल्याने ब्रिटिशांनी १९३७ साली ब्रह्मदेशाला भारतापासून वेगळे केले खरे; पण त्याने लोकांचे समाधान झाले नाही. दुसर्‍या महायुद्धात तेथील लोकांनी जपानच्या बाजूने भाग घेतला व ‘आझाद हिंद सेने’ला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यात मोलाची मदत केली. १९४८ साली ब्रह्मदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेथील क्रांतीचे नेते आंग सान (आंग सान सू की यांचे वडील) यांची हत्या करण्यात आली. ऊ नू यांच्या सरकारने भारताशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आणि अलिप्तता चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
 
१९६२ मध्ये लष्कराने बंड करून सत्ता हातात घेतली आणि साम्यवादी चीनशी जवळीक साधली. त्यानंतरची सुमारे ५० वर्षे म्यानमारमधील लष्करी राजवटीने बाह्य जगाशी शक्य तेवढे संबंध तोडण्याचे धोरण अवलंबल्यामुळे झोपलेल्या राजकन्येच्या गोष्टीप्रमाणे तिथे काळ जणू पुढे सरकायचाच थांबला. म्यानमारमध्ये ब्रिटिशांची राजवट असताना तेथे रस्ते आणि रेल्वे बांधण्यासाठी, तसेच प्रशासन चालवण्यासाठी शेजारच्या बंगाल आणि मद्रास प्रांतातून मोठ्या संख्येने लोकांना स्थायिक करण्यात आले होते. म्यानमारमध्ये लष्करी राजवट आल्यानंतर ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातून वसलेल्या लोकांनी म्यानमारमधील संपत्ती आणि रोजगारांवर वर्चस्व मिळवल्याचा ठपका ठेवून तेथील लष्करशाहीने अशा लोकांशी सापत्न वागणुकीला सुरुवात केली. १९८२ सालच्या नागरिकत्व कायद्याच्या अंतर्गत केवळ १८२३च्या पूर्वीपासून म्यानमारमध्ये राहणार्‍या लोकांना वेगळी ओळखपत्रे देण्यात आली. या निर्णयाचा फटका अनेक दशकांपासून तेथे वसलेल्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिस्ती धर्मीय लोकांना बसला. ब्रिटिश प्रशासनात काम करणारे, तसेच व्यापार आणि उद्योगांत असणारे भारतीय मोठ्या संख्येने परत आले असले; तरी काही पिढ्यांपासून स्थायिक झालेले गरीब लोक तिथेच राहिले. त्यात म्यानमारच्या राखीन प्रांतात वसलेल्या आणि ‘रोहिंग्या’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या बंगाली भाषिक मुसलमानांचाही समावेश होतो. अशा या रोहिंग्या समाजात गरिबी आणि गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय आहे.
 
राखीन प्रांताचे सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. भारत या भागात ‘सितवे’ बंदर विकसित करत असून, ईशान्य भारतातून म्यानमारमध्ये जाणार्‍या कालादान नदीमार्गे ‘सितवे’ बंदरापर्यंत मालाची वाहतूक करणे शक्य आहे. याच भागात चीन ‘याउकप्यू’ बंदर आणि विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करत आहे. त्याद्वारे चीनला मलाक्काची सामुद्रधुनी चुकवून युनान प्रांतातून थेट पश्चिम आशिया, तसेच युरोपशी व्यापार करणे शक्य आहे. या भागात नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत.
 
राखीन प्रांतात इस्लामिक फुटीरतावादी संघटना म्यानमारसाठी डोकेदुखी ठरल्या होत्या. दि. २५ ऑगस्ट २०१७ रोजी ‘अराकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी’ या सशस्त्र रोहिंग्या बंडखोर गटाने म्यानमारमधील ३०हून अधिक पोलीस चौक्या आणि एका लष्करी तळावर एकाच वेळी हल्ले केले. यामध्ये १२ सुरक्षारक्षक मारले गेले. त्यापूर्वीही रोहिंग्यांनी बौद्ध तरुणींचे अपहरण करून बलात्कार केल्यामुळे किंवा बौद्ध धर्मियांची निंदानालस्ती केल्यामुळे किंवा तशा अफवेमुळे तिथे रोहिंग्यांविरुद्ध दंगे उसळल्याच्या घटना घडल्या होत्या. यापूर्वीही म्यानमारच्या लष्कराकडून फुटीरतावाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत वेळोवेळी रोहिंग्यांना शरणार्थी म्हणून देश सोडवा लागला होता. पण, या घटनेनंतर म्यानमारच्या लष्कराने केलेल्या कारवाईत सात लाखांहून अधिक रोहिंग्यांना शेजारच्या बांगलादेशमध्ये आसरा घ्यावा लागला. तेव्हा गांबिया या आफ्रिकेतील देशाने म्यानमारविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार केली होती. सुमारे आठ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. आज जगभरात रोहिंग्यांची संख्या १८ लाख असून, त्यातील सुमारे १२ लाख रोहिंग्या बांगलादेशामध्ये शरणार्थी म्हणून राहात आहेत. लाखो रोहिंग्या लोक बांगलादेशमार्गे भारतातही घुसले असून, काही ठिकाणी त्यांनी आपले भारतीय नागरिकत्व सिद्ध करणारी ओळखपत्रेही मिळवली आहेत.
 
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०२० सालीच अंतरिम निकाल दिला होता. आता त्याचा अंतिम निकाल आला आहे. या निकालाचे पालन करणे म्यानमार सरकारसाठी बंधनकारक असून, सरकारने रोहिंग्यांविरुद्ध झालेल्या गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगारांना शिक्षा करणे, तसेच आपल्या कायद्यांमध्ये सुधारणा करून भविष्यात असे हत्याकांड रोखणे अपेक्षित आहे. त्यासोबतच सरकारने सुमारे साडेसात लाख शरणार्थी लोकांना त्यांची मालमत्ता परत करून त्यांना सोसाव्या लागलेल्या त्रासासाठी नुकसानभरपाई देणे अपेक्षित आहे. याबाबत म्यानमारच्या सरकारला पुढील दोन वर्षांमध्ये कृती अहवाल सादर करायचा आहे.
 
म्यानमार सरकार आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालातील एकही गोष्ट करणार नाही. याचे कारण, म्यानमारमधील लष्करी राजवटीचे देशाच्या सुमारे अर्ध्या भूभागावर पूर्ण नियंत्रण नाही. म्यानमार अत्यंत गरीब देश असल्याने त्यांना शरणार्थींना परत आणणे, सुरक्षा देणे आणि नुकसानभरपाई देणे शक्य नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्वतःची सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे त्याच्या निर्णयाचा अवमान झाल्यास त्यांना हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे सोपवण्याशिवाय पर्याय नाही. सुरक्षा परिषदेचे कोणत्याही विषयावर एकमत झाल्याचे गेल्या अनेक वर्षांमध्ये ऐकीवात नाही. अशा प्रकारचा ठराव सादर झाल्यास रशिया आणि चीन त्यांचा नकाराधिकार वापरतील. जरी या दोन्ही देशांनी संमती दिली, तरी म्यानमारच्या लष्करी राजवटीविरोधात सशस्त्र कारवाई करण्यास कोणताही महत्त्वाचा देश स्वतःचे सैन्य पाठवणार नाही. यानिमित्ताने चीनसारख्या देशांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयांच्या कार्यक्षेत्राबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारताने या निकालाची दखल घेऊन शरणार्थींच्या पुनर्वसनाला पाठिंबा दिला असला, तरी या घटनेला ‘नरसंहार’ म्हणण्याचे टाळले आहे. या निकालामुळे रोहिंग्या शरणार्थींच्या आयुष्यात कोणताही बदल होण्याची फारशी शक्यता नाही. पण, या निकालामुळे सध्या रशिया आणि इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांमध्येही असेच निर्णय येण्याची शक्यता आहे.
 




अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.

संबंधित मजकूर