ठाणे,: (Kasara Local Train Knife Attack)मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकलच्या डब्यात बिनधास्तपणे बिडी ओढणाऱ्या तरुणांना विरोध केल्याने कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे शहाड येथील प्रतिनिधी भरत टोपले यांच्यावर धावत्या कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी घडली. ठाकुर्ली स्थानकादरम्यान झालेल्या या हल्ल्यात टोपले यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. विशेष म्हणजे, जखमी अवस्थेत रेल्वे पोलिसांकडे मदत मागूनही तातडीने उपचार मिळाले नाहीत. पोलिसांनी सुमारे अर्ध्या तासानंतर कुर्ला स्थानकात प्राथमिक उपचारासाठी नेल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. या घटनेमुळे लोकलमधील सुरक्षा व्यवस्था नेमकी कोणासाठी आणि किती प्रभावी आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ४.५७ वाजताच्या कसारा-सीएसएमटी लोकलमधून भरत टोपले कामावर जाण्यासाठी लगेज डब्यात चढले होते. त्यावेळी डब्यात काही तरुण बिडी ओढत होते. धुरामुळे अन्य प्रवाशांना त्रास होत असतानाही त्यांना विरोध करण्यास कोणी पुढे येत नव्हते. अखेर टोपले यांनी धूम्रपानामुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, तसेच इतर प्रवाशांनाही त्रास होत असल्याचे सांगत बिडी ओढण्यास मज्जाव केला. डब्यात धूम्रपान करायचे असेल तर खाली उतरा, असे त्यांनी संबंधितांना सुनावले. मात्र, याच गोष्टीचा राग आल्याने संबंधित तरुणांनी त्यांच्याशी वाद घालत धारदार शस्त्राने चेहऱ्यावर वार केले. टोपले यांनी वार चुकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डोळ्याला गंभीर इजा होण्याचा धोका टळला. मात्र, त्यांना दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. हल्ल्यानंतर आरोपी पुढील स्थानकात उतरून पसार झाले.(Kasara Local Train Knife Attack)
मदतीसाठी संपर्क, तरी अर्धा तास प्रतीक्षा?
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या टोपले यांनी रेल्वे पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली. मात्र, पोलिसांची मदत मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सुमारे अर्ध्या तासानंतर त्यांना कुर्ला स्थानकात रेल्वे पोलिसांनी प्राथमिक उपचारासाठी नेल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. धावत्या लोकलमध्ये चाकूहल्ला झाल्यानंतर जखमी प्रवाशाला तातडीने वैद्यकीय मदत देण्यासाठी नेमकी कोणती यंत्रणा कार्यरत होती? संबंधित लोकलमध्ये सुरक्षा कर्मचारी का नव्हते? आपत्कालीन संदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने प्रतिसाद का दिला नाही? या प्रश्नांची उत्तरे रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांनी देणे आवश्यक आहे.(Kasara Local Train Knife Attack)
कसारा लोकलमध्ये रात्रीच्या वेळी टोळक्यांचा वावर
या घटनेनंतर कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने कसारा मार्गावरील लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. रात्रीच्या लोकलमध्ये काही ठिकाणी जुगार खेळणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे आणि टोळक्यांनी डब्यांमध्ये ठाण मांडून बसणे असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी संघटनेने केल्या आहेत. विशेषतः लगेज डब्यांमध्ये अनधिकृत व्यक्तींचा वावर आणि प्रवाशांना होणारा त्रास याकडे रेल्वे सुरक्षा यंत्रणेचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारांना वेळीच आळा घातला नाही, तर सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
जीआरपी-आरपीएफच्या कामकाजावर गंभीर आक्षेप
रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही संघटनेने गंभीर आक्षेप घेतले आहेत. रेल्वे स्थानकांवर आणि लोकलमध्ये सुरक्षा कर्मचारी नेमके कोणत्या कामासाठी तैनात असतात? प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियमित कारवाई का होत नाही? अशा घटनांनंतरच सुरक्षा यंत्रणा सक्रिय होणार का? असे सवाल संघटनेने उपस्थित केले आहेत. रेल्वे पोलीस यंत्रणेत भ्रष्टाचार आणि हप्तेखोरी बोकाळल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका आणि या प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती महत्त्वाची ठरणार आहे.(Kasara Local Train Knife Attack)
आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी
दरम्यान, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव आणि सरचिटणीस श्याम उबाळे यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या संघटनेच्या प्रतिनिधीवरच लोकलमध्ये हल्ला होत असेल, तर सर्वसामान्य प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाची अपेक्षा तरी कोणाकडून करायची, असा सवाल त्यांनी केला आहे. भरत टोपले यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कसारा मार्गावरील रात्रीच्या लोकलमध्ये नियमित गस्त आणि विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.(Kasara Local Train Knife Attack)