शेअर बाजारातील चढ-उतार आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांसमोर सुरक्षिततेसोबत नियमित उत्पन्न देणार्या पर्यायांचा शोध घेण्याचे आव्हान असते. अशा वेळी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जारी केलेले कर्जरोखे (बॉण्ड्स) हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी तुलनेने सुरक्षित आणि नियमित व्याज उत्पन्न देणारा पर्याय ठरू शकतो. त्याविषयी सविस्तर...
प्रत्येक गुंतवणूकदाराला गुंतवणूक करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, त्या म्हणजे मिळणारा परतावा व गुंतवणुकीची सुरक्षितता. सरकारी कर्जरोख्यांमधील (बॉण्ड्स) गुंतवणूक या दोन्हींची पूर्तता करते. मुदतपूर्तीपर्यंत कर्जरोखा ठेवल्यास, मूळ मुद्दल परत मिळतेच, तसेच निश्चित असलेल्या दराने व्याजही मिळते.
सरकारी कर्जरोखे म्हणजे काय? ते नक्की कोठून खरेदी करता येतात? किती वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते? आवश्यकता भासल्यास मुदतपूर्व पैसे मिळू शकतात का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदाराला पडतात. त्याची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
सरकारी कर्जरोखे हे बाजारात सहज खरेदी-विक्री करता येणारे साधन आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या निधी व्यवस्थापनासाठी रिझर्व्ह बँकेमार्फत ते बाजारात आणले जाते. हे साधन इलेट्रॉनिक म्हणजेच, ‘डिजिटल’ स्वरूपात दिले जाते. ही सरकारने घेतलेल्या कर्जापोटी दिलेली पावती. त्यामुळे हे अत्यंत सुरक्षित गुंतवणूक साधन मानले जाते.
‘ट्रेझरी बिल’ व ‘बॉण्ड’
अल्पमुदतीचे सरकारी कर्जरोखे ‘ट्रेझरी बिल’ म्हणून ओळखले जातात आणि त्यांची मुदत एक वर्षापेक्षा कमी असते. दीर्घमुदतीचे कर्जरोखे ‘बॉण्ड्स’ म्हणून ओळखले जातात आणि त्यांची मुदत एक वर्षापेक्षा अधिक असते. भारतामध्ये केंद्र सरकार ‘ट्रेझरी बिल’ व ‘बॉण्ड्स’ या दोन्ही प्रकारचे कर्जरोखे विक्रीस काढते, तर राज्य सरकारे केवळ ‘बॉण्ड्स’ म्हणजेच, दीर्घमुदतीचे कर्जरोखे विक्रीस काढतात. राज्य सरकारांना अल्पमुदतीसाठी ‘ट्रेझरी बिल’ विक्रीसाठी काढता येत नाहीत. राज्य सरकारी कर्जरोख्यांची विक्री केंद्र सरकारच्या हमीनुसार निश्चित केली जाते. त्यामुळे हे कर्जरोखेही सुरक्षित मानले जातात. सरकारी कर्जरोख्यांतील गुंतवणूक बुडण्याची भीती अत्यल्प असते. त्यामुळे अशा गुंतवणुकीला शून्य जोखीम किंवा जोखीमरहित समजले जाते.
‘ट्रेझरी बिल’ हे देशांतर्गत नाणे बाजारातील एक साधन असून, केंद्र सरकारसाठी अल्पमुदतीच्या म्हणजेच, एक वर्षाच्या आतील कालावधीसाठी विक्रीस काढले जाते. सध्या ते प्रामुख्याने ९१ दिवस, १८२ दिवस आणि ३६४ दिवस या कालावधींसाठी विक्रीस काढले जातात. काहीवेळा ७ दिवस, १४ दिवस आणि २८ दिवसांच्या कालावधीसाठीही ते विक्रीस काढले जाऊ शकतात. ‘ट्रेझरी बिल’ शून्य टक्के व्याजदराने म्हणजेच, बिनव्याजी जारी केले जातात. मात्र, ते सवलतीच्या दरात म्हणजेच, दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीत विकले जातात. मुदतपूर्तीच्या वेळी पूर्ण दर्शनी मूल्य परत मिळते. उदाहरणार्थ, एक लाख रुपये दर्शनी मूल्याचे ‘ट्रेझरी बिल’ सवलतीच्या दराने ९८ हजार रुपयांना विकले जाते आणि मुदतपूर्तीनंतर पूर्ण एक लाख रुपये परत मिळतात. अशा प्रकारे गुंतवणूकदाराला दोन्ही रकमेतील फरक म्हणजे, दोन हजार रुपये उत्पन्न मिळते. थोडक्यात, ९८ हजार रुपये ९१ दिवसांसाठी गुंतविल्यानंतर दोन हजार रुपये उत्पन्न मिळाल्यास, सुमारे ५.१० टक्के दराने परतावा मिळाला, असे होते. मधल्या कालावधीतही याची विक्री करता येते. मात्र, परतावा कमी मिळतो.
केंद्र सरकारी कर्जरोखे
ठरावीक मुदतीसाठी म्हणजेच, दोन वर्षे ते ५० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी बाजारात आणले जातात. त्यावर विशिष्ट दराने व्याज दिले जाते. ‘ठरावीक’ व ‘तरल’ व्याज, असे व्याजाचे दोन प्रकार आहेत. व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी मूळ मुद्दलावर दिली जाते. रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या वतीने सरकारी कर्जरोख्यांचे अद्ययावत अभिलेख ठेवणे, वेळेवर व्याजाची रक्कम देणे, तसेच मुदतपूर्तीनंतर मुद्दल गुंतवणूकदाराला परत करणे, ही सर्व कामे सार्वजनिक कर्ज विभागाच्या अंतर्गत पूर्ण करते. नक्की कोणते कर्जरोखे खरेदी करावेत, हे समजण्यासाठी त्याचे नाव कसे तयार होते ते पाहूया. विशिष्ट कालावधीत बाजारात सर्वाधिक व्यवहार होणारे कर्जरोखे म्हणजे, ६.५४ टक्के ‘जीएस २०३२’ हे होते. ‘जीएस’ म्हणजे, ‘गव्हर्नमेंट सियुरिटीज’ व २०३२ हे मुदतपूर्ती वर्ष. अशा प्रकारचे सुमारे २ हजार ५००पेक्षा अधिक रोखे बाजारात उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार गरजेनुसार निवड करू शकतो.
राज्य सरकारी कर्जरोखे
राज्य सरकारी कर्जरोखे साधारणपणे तीन ते २० वर्षांच्या ठरावीक मुदतीसाठी बाजारात आणले जातात. त्यावर विशिष्ट आणि ठरावीक दराने व्याज दिले जाते. व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी मूळ मुद्दलावर दिली जाते. रिझर्व्ह बँक राज्य सरकारांच्या वतीने कर्जरोख्यांचे अद्ययावत अभिलेख ठेवणे, वेळेवर व्याजाची रक्कम देणे, तसेच मुदतपूर्तीनंतर मुद्दल गुंतवणूकदाराला परत करणे, ही कामे सार्वजनिक कर्ज विभागाच्या अंतर्गत पूर्ण करते. विशिष्ट काळात बाजारात सर्वाधिक व्यवहार होणारे राज्य सरकारी कर्जरोखे म्हणजेच, ७.७२ टक्के ‘जीजेएसडीएल २०३२’ हे आहेत. हे गुजरात राज्य सरकारचे कर्जरोखे आहेत. अशाच प्रकारचे सर्व राज्य सरकारांचे कर्जरोखे बाजारात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, ‘एमएचएसडीएल २०३२’, ‘जीएएसडीएल २०३२’, ‘यूपी एसडीएल २०३२’, ‘केएलएसडीएल २०३२’ इत्यादी अनुक्रमे महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश आणि केरळम् या राज्यांचे हे कर्जरोखे आहेत.
‘रिटेल डायरेट योजना’
वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी रिझर्व्ह बँकेने २०२१ पासून ‘रिटेल डायरेट योजना’ नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला सहजपणे खाते उघडता येते. त्याची कार्यपद्धती रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तेथे ‘रिटेल डायरेट’ पर्याय निवडल्यानंतर संपूर्ण माहिती लेखी, तसेच ध्वनिचित्रफितीच्या स्वरूपातही सविस्तर देण्यात आली आहे. त्यानुसार, खाते उघडल्यानंतर त्यातून व्यवहार करणे अत्यंत सोपे आहे. गुंतवणूकदार सरकारी कर्जरोख्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या लिलावामध्ये सहभाग घेऊन शेअर बाजारातील ‘आयपीओ’प्रमाणे प्रत्यक्ष खरेदी करू शकतो. त्याचप्रमाणे, त्याच पोर्टलवर ‘एनडीएस-ओएम’ नावाचे व्यासपीठ उपलब्ध आहे. तेथे स्वतंत्र दुय्यम बाजारात खरेदी-विक्री करण्यासाठी खाते उघडून, लिलावातून खरेदी केलेले अथवा दुय्यम बाजारातून खरेदी केलेले कर्जरोखे विकता येतात. सरकारद्वारे रिझर्व्ह बँकेमार्फत प्रत्येक आठवड्यात सरकारी कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी ठरावीक रकमेचे लिलाव जाहीर केले जातात. त्याचप्रमाणे, गुंतवणूकदारांसाठी दुय्यम (सेकंडरी) बाजारातही सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत व्यवहार करता येतात. त्यामध्ये सहभागी होऊन कर्जरोख्यांची खरेदी-विक्री करता येते. सरकारी कर्जरोख्यांमधील गुंतवणुकीसाठी किमान दहा हजार रुपये आणि त्या पटीत कितीही गुंतविता येतात.
बँकांमधील ठेवींना केवळ पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण असते. सरकारी कर्जरोखे मात्र अत्यंत सुरक्षित मानले जातात. यात गुंतवणूक करण्यासाठी रकमेचे बंधन नाही. सर्वसामान्य गुंतवणूकदाराला केवळ व्याजापोटी उत्पन्न अपेक्षित असले, तर व्याजाच्या उत्पन्नावर अवलंबून असणार्या व्यक्तींना कर्जरोख्यांमधील गुंतवणूक उपयुक्त ठरू शकते. त्यांना व्याजाबरोबरच मुद्दलातील वाढीचीही संधी मिळू शकते. सध्या दहा वर्षांच्या सरकारी कर्जरोख्यांवर सुमारे सात टक्के इतके व्याज मिळते. म्हणजे, गुंतवणूकदाराने लिलावात कर्जरोखे खरेदी केल्यास, मुद्दल रकमेवर दर सहामाही पद्धतीने सात टक्के व्याज मुदतपूर्तींपर्यंत मिळत राहते. या दहा वर्षांच्या कालावधीत व्याजदरांमध्ये चढ-उतार निश्चितच होत असतात. व्याजदरांमध्ये एक टक्का घट झाल्यास, नव्या गुंतवणुकीसाठी सहा टक्के व्याजदर होईल. त्याच वेळी आपण आधी गुंतविलेल्या सात टक्के व्याजदराच्या कर्जरोख्यांचा बाजारातील भाव वाढण्याची शयता असते. म्हणजे, सात टक्के दराने मिळणारे निश्चित व्याज आणि मुद्दलातील बाजारमूल्याची वाढ, यामुळे आपला एकत्रित परतावा वाढू शकतो. मात्र, येथे व्याजदरात वाढ झाल्यास, आठ टक्के झाल्यास आपल्याला सात टक्के निश्चित व्याज मिळेल. परंतु, मूळ मुद्दलाच्या बाजारमूल्यात घट झालेली आढळू शकते. अशा वेळी गुंतवणूकदाराने विक्री न केल्यास प्रत्यक्ष तोटा होत नाही. तसेच मुदतपूर्तीच्या वेळी मूळ मुद्दल पूर्णपणे परत मिळते.
सरकारी कर्जरोख्यांच्या बाजारातील व्यवहारांसाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा दलालाची गरज नसते. तसेच व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क अथवा आकार लागत नाही. खरेदी करताना आपल्या बँक खात्यातून रक्कम ‘डेबिट’ होते व विक्रीनंतर आपल्या बँक खात्यात परस्पर ‘क्रेडिट’ होते. कर्जरोखे खात्यात जमा होणे व विक्रीनंतर कमी होणे, ही प्रक्रिया ‘इलेट्रॉनिक’ माध्यमातून सहज आणि सुरक्षितपणे होते. सर्वांत सुरक्षित, तसेच एक वेगळा उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून सरकारी कर्जरोख्यांचा विचार नक्की करावा व यात गुंतवणूक म्हणजे, राष्ट्रउभारणीत मदत, हे लक्षात ठेवावे.