
कल्याण : (Constitution Day Celebration in Kalyan)कल्याण पूर्व येथील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाच्या प्रतीची ढोल-ताशांच्या गजरात पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
संविधानातील विविध कलमांची नागरिकांना माहिती व्हावी आणि संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावर संविधानातील कलमांचे क्रमांक व शीर्षक असलेले लेखी पट्टे टाकण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी संविधानातील कलमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम राबविला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले, “नागरिकांना भारतीय संविधानाची माहिती आहे; मात्र संविधानातील विविध कलमांची माहिती अनेकांना अद्याप नाही. नागरिकांनी संविधान वाचावे आणि त्यातील कलमांची माहिती करून घ्यावी, यासाठी आम्ही कलमांचे शीर्षक असलेले लेखी पट्टे विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकून संविधानाची पालखीतून मिरवणूक काढली.”(Constitution Day Celebration in Kalyan)
संविधानातील कलमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत कायमस्वरूपी पोहोचावी, यासाठी शाळेच्या बाहेरील दर्शनी फलकावर संपूर्ण कलमांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना संविधानातील कलमांची कायमस्वरूपी ओळख व्हावी, हा त्यामागील उद्देश असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक विभागाच्या शिक्षिका माधुरी काळे व प्राथमिक विभागाचे सहशिक्षक संतोष जाधव यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमाला उद्योगपती रमेश गायकवाड, संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष कदम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(Constitution Day Celebration in Kalyan)