मुंबई : (Bhusawal Nagpur Express) महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भुसावळ ते नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यानुसार १११११/११११२ भुसावळ-नागपूर एक्स्प्रेसच्या संचालनास मंजुरी देण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली. प्रवाशांच्या वाढत्या मागणीला आणि परिचालनाच्या गरजांना अनुसरून भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी रेल्वे सेवांचा विस्तार करण्यात येत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.(Bhusawal Nagpur Express)
भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या रेल्वे सेवेमुळे भुसावळ आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे सेवांचा विस्तार आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर या नव्या रेल्वे सेवेला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, या एक्स्प्रेसचे वेळापत्रक, थांबे आणि प्रत्यक्ष संचालन सुरू होण्याची तारीख याबाबत पत्रात माहिती देण्यात आलेली नाही.(Bhusawal Nagpur Express)