
ठाणे , : (Badlapur Stray Dog Menace)भटक्या श्वानांचा उपद्रव आता नागरिकांच्या जिवावर बेतू लागला आहे. बदलापूर पश्चिमेतील शनीनगर परिसरात भटक्या श्वानांच्या पाठलागामुळे घाबरून धावणाऱ्या हर्षल शिंदे (१८) या बारावीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. तीन वर्षांपूर्वी हर्षलवर हृदयाची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. श्वानांच्या भीतीने जीवाच्या आकांताने धावत तो एका दुकानात शिरला; मात्र काही क्षणांतच तेथे कोसळला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेने बदलापूरमधील भटक्या श्वानांच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हर्षल हा गुरुवारी शिकवणी संपल्यानंतर मित्रांसोबत शनीनगर परिसरातून जात होता. यावेळी एका महिलेने परिसरात भटक्या श्वानांना खाद्य दिले जात असल्याचे सांगण्यात येते. त्याचदरम्यान एका श्वानाने हर्षल आणि त्याच्या मित्रांचा पाठलाग सुरू केला. अचानक झालेल्या या प्रकाराने घाबरलेल्या हर्षलने धाव घेत जवळच्या दुकानात आश्रय घेतला. त्याने दुकानदार महिलेला श्वानांपासून बचाव करण्यासाठी दुकानात आल्याचे सांगितले. मात्र, काही क्षणांतच तो अचानक कोसळला. दुकानदार महिला आणि मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांना माहिती दिल्यानंतर शाळेच्या व्हॅनमधून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, धावताना आलेल्या ताणामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होणार आहे.(Badlapur Stray Dog Menace)
प्रोजेक्ट संवेदना’वर प्रश्नचिन्ह
या घटनेचे गांभीर्य यासाठीही वाढते की, बदलापूर नगरपरिषदेने भटक्या श्वानांच्या समस्येवर उपाय म्हणून ‘प्रोजेक्ट संवेदना’ हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, दोन महिन्यांत कात्रप परिसरात डॉग शेल्टर उभारण्याचे नियोजन आहे. शहरात ३२ डॉग फीडिंग पॉइंट उभारण्यात येणार आहेत. रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी खाद्य टाकण्याऐवजी निश्चित ठिकाणी श्वानांना खाद्य देता यावे, हा त्यामागील उद्देश आहे. या उपक्रमात २५० हून अधिक श्वानप्रेमी सहभागी होणार असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे.(Badlapur Stray Dog Menace)
नगरपरिषदेच्या आकडेवारीनुसार, शहरात सुमारे १० हजार ४०९ भटके श्वान आणि १ हजार ७५९ पाळीव श्वान आहेत. म्हणजेच एकूण १२ हजार १६८ श्वानांची नोंद आहे. कात्रप येथील निर्बीजीकरण केंद्रामार्फत २०२३-२४ मध्ये ३९४, २०२४-२५ मध्ये १ हजार ५२०, तर २०२५-२६ मध्ये जानेवारी २०२६ पर्यंत ३ हजार २४२ श्वानांचे निर्बीजीकरण आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे. असे असतानाही शहरातील रस्ते, चौक, निवासी परिसर आणि रेल्वे स्थानक परिसरात श्वानांच्या टोळ्या दिसत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
विशेष म्हणजे, श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याबरोबरच त्यांच्यासाठी स्वतंत्र खाद्यव्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. मात्र, या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी पूर्ण होण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याचा जीव गेल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांचा वेग आणि परिणामकारकता यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. श्वानप्रेमींकडून खाद्य देण्याची व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नियम यांचा समन्वय साधण्याची गरजही या घटनेतून अधोरेखित झाली आहे.(Badlapur Stray Dog Menace)