काळाच्या कसोटीवर उतरलेली भारतीय राज्यघटना ही देशाच्या लोकशाही स्थैर्याची, सामाजिक समतेची आणि राष्ट्रीय एकात्मतेची आधारशिला आहे. बदलत्या परिस्थितीतही राष्ट्राला एकसंध ठेवण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. आजच्या संविधान दिनानिमित्ताने तिच्या सप्तसामर्थ्यांचा घेतलेला हा मागोवा...
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दि. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा केला जातो, असाच दुसरा दिवस म्हणजे दि. २६ जानेवारी. या दिवशी प्रजासत्ताक राज्य झाले. प्रजासत्ताक म्हणजे प्रजा हीच राजा असेल आणि सर्व सत्तेचा उगम प्रजेतून होईल. हे प्रजासत्ताक भारतीय संविधानातून निर्माण झाले. या संविधानाची स्वीकृती दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी झाली, म्हणून दि. २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. संविधान स्वीकृत होऊन आता ७७ वर्षे झाली. या संविधानात कालानुरूप अनेक सुधारणा होत गेल्या. त्याला ‘संविधानाची लवचीकता’ म्हणतात. कालानुरूप सुधारणा होत गेल्याने, हे संविधान ‘जैविक संविधान’ समजले जाते.
केंद्रातून काँग्रेसची सत्ता २०१४ साली गेली. तेव्हापासून ‘संविधान बदलले जाणार’ असा खोटा प्रचार जोरजोराने सुरू झाला. भाजप सत्तेवर येऊन आता १२ वर्षे होत आहेत. संविधान आहे तिथेच आहे, लाल संविधान हातात घेऊन फिरणारे रस्त्यावर आहेत आणि भाजप सत्तेत आहे. संविधान बदलले जाणार आहे, हा राग आळवण्याचे काम असेच चालू राहणार आहे. त्याचा शहाण्या माणसाने गंभीरपणे विचार करू नये.
आपल्या संविधानाची काही शक्तिस्थाने आहेत. त्याचा मात्र सर्वांनी सतत विचार केला पाहिजे. आपल्या संविधानाने आपल्या देशात ‘कायद्याचे राज्य’ ही संकल्पना रुजवली. ‘कायद्याचे राज्य’ याचा अर्थ असा की, राज्य एखाद्या व्यक्तीच्या लहरीवर किंवा एखाद्या पक्षाच्या बहुमतावर चालणार नाही. संविधान हा राज्य कसे चालवायचे, हे सांगणारा कायदा असतो. ‘राज्य संविधानाच्या कायद्याने चालेल,’ असा कायद्याचे राज्य याचा अर्थ. आपल्या देशाने राजेशाही पाहिली, बादशाही पाहिली, सुलतानशाही पाहिली, तसेच इंग्रजशाही देखील पाहिली. आता आपल्या देशात लोकशाही आहे आणि कायद्याचे राज्य आहे.
आपल्या संविधानाचे दुसरे शक्तिस्थान राज्यकारभारात सर्वांना सहभागी होण्याची समान संधी देणारे आहे. एकेकाळी काही घराणीच राज्ये करीत. ही ‘घराणेशाही’ संविधानाला अमान्य आहे. आता काही नवीन घराणी उदयाला आली आहेत. परंतु, त्यांनाही जनतेचे समर्थन मिळवावेच लागते. केवळ घराणेशाहीमुळे कुणी सत्तेवर येत नाही. लाल बहादूर शास्त्री सामान्य परिवारातील होते. ते देशाचे पंतप्रधान झाले. चौधरी चरणसिंग शेतकरी होते, तेही देशाचे पंतप्रधान झाले. मायावती दलित आहेत. त्या उत्तर प्रदेशच्या चारवेळा मुख्यमंत्री होत्या. नरेंद्र मोदी सामान्य परिवारातून आले. ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. हे आपल्या राज्यघटनेचे सामर्थ्य आहे.
आपल्या राज्यघटनेचे तिसरे सामर्थ्य सर्वसमावेशकतेचे आहे. भारता एवढी विविधता जगातील कोणत्याही देशात नाही. भारत हा अनेक भाषा बोलणार्यांचा देश आहे. प्रत्येक प्रांताची स्वतंत्र ओळख आहे. पोशाख वेगळे आहेत. आहाराच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. लोकसंगीत वेगळे आहे. नृत्याचे प्रकार वेगळे आहेत. उपासना-पंथाची विविधता आहे. अशा विविधतेने नटलेल्या देशाला, राजकीयदृष्ट्या एकत्रित ठेवण्याचे काम संविधानाने केले. जगातील कोणत्याही देशाच्या संविधानात अशी शक्ती नाही.
आपल्या संविधानाचे चौथे सामर्थ्य देशाच्या राजकीय ऐक्यात आहे. प्राचीन काळापासून भारतीय लोक सांस्कृतिकदृष्ट्या एकच आहेत. हे सांस्कृतिक ऐय ऋषिमुनी, साधुसंत, ‘रामायण’, ‘महाभारत’, भगवान बुद्ध, भगवान महावीर, गुरू नानक आणि संतपरंपरांनी निर्माण केले. कोणत्याही राजवंशाला किंवा राजसत्तेला त्याचे श्रेय देता येणार नाही. सांस्कृतिकदृष्ट्या आपण एक असलो, तरी इतिहासात छोट्या-छोट्या राज्यांत आपला देश विभक्त होता. असे विभक्त झाल्याने परिकीय आक्रमकांपुढे आपण दुर्बळ ठरलो. त्यामुळे आपले राजकीय स्वातंत्र गेले. ही अवस्था भविष्यात पुन्हा होऊ नये, म्हणून राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबळ केंद्रसत्ता असलेली राजसत्ता देशाला दिली. भारत आज राजकीयदृष्ट्या जगातील एक शक्तिशाली देश आहे. याचे श्रेय आपल्या राज्यघटनेलाच द्यावे लागेल.
राज्यघटनेचे पाचवे शक्तिस्थान आपल्या समाजात सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे आहे. आपल्या देशात सर्व समाजात जाती आहेत आणि तशीच जातीची उतरंडही आहे. समाजातील मोठा वर्ग अस्पृश्य समजला जातो, तसेच भटकंती करणारा समाजही मोठा आहे. वनात राहणारे वनवासी आहेत, वेगवेगळ्या जातींमध्ये आपापसात सामाजिक संबंध कमी असतात. काही जातींना असे वाटते की, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत. अन्य जातींबरोबर आपली बरोबरी होऊ शकत नाही. याला जातीय अहंकार म्हणतात. सामाजिक ऐयाला असले अहंकार बाधकच असतात.
आपली राज्यघटना जातिभेद मानीत नाही. अस्पृश्यता मानीत नाही. कायद्यापुढे सर्व समान, हा राज्यघटनेचा समतामंत्र आहे. तसेच स्त्री-पुरुष समानताही राज्यघटनेचे एक सामर्थ्यस्थळ आहे. थोडयात, कोणत्याही प्रकारचे भेदाभेद न स्वीकारणारी आपली राज्यघटना आहे. ‘काळे काळे म्हणून समान आहेत, गोरे गोरे म्हणून समान आहेत, काळे आणि गोरे समान होऊ शकत नाहीत,’ हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता. आपली राज्यघटना आणि आपली न्यायालये असले निर्णय करीत नाहीत.
आपल्या राज्यघटनेचे सहावे सामर्थ्य तिच्या स्वतंत्र न्यायपालिकेत आहे. आपल्या देशातील न्यायालये स्वतंत्र आहेत, म्हणजे न्यायालयांच्या कामकाजात राज्यसत्तेला वाटेल तसा हस्तक्षेप करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय स्वतंत्र असतात. हे निर्णय राज्यघटनेच्या कलमांचा अर्थ सांगणारे आणि अर्थ विस्तारणारे असतात. केशवानंद भारती खटला, मिनर्वा मिल खटला, मनेका गांधी खटला ही त्याची उदाहरणे. स्वतंत्र न्यायपालिका राज्यघटनेचे संरक्षक कवच असते.
राज्यघटनेचे सातवे सामर्थ्य आपल्या राज्यघटनेने, देशात एक राष्ट्रीयत्वाची भावना बळकट करण्यात खूप मोठे यश गाठले आहे. एक राष्ट्रीयत्व म्हणजे; आम्ही भारतीय आहोत, भारत आमचा देश आहे, भारत आमची जननी-जन्मभूमी आहे, भारताचा गौरवात माझा गौरव आहे, भारतीय सीमांचे रक्षण हे माझे आद्यकर्तव्य आहे, भारतीय जीवनमूल्यांचे रक्षण हेही माझे परमकर्तव्य आहे, अशी एकसारखी भावना सर्वांच्या मनात असणे, यालाच ‘एक राष्ट्रीयत्व’ म्हणतात. आपल्या राज्यघटनेने ही एक भावना अतिशय बळकट करीत आणली. इंग्रजांच्या काळात मराठ्यांचा पराभव झाला, याचे दु:ख शिखांना नसे किंवा शीख पराभूत झाले, तरी बंगाली माणसाला त्याचे काही वाटत नसे. आज अशी भावना नाही. म्हणूनच, कॅप्टन स्मित मच्छारसारखा एक वैमानिक सर्व भारतीयांचा हिरो होतो किंवा क्रिकेटमधील विजय हा सर्व देशाचा असतो. हे आपल्या राज्यघटनेचे सामर्थ्य आहे. ‘संविधानदिनी’ या सप्तसामर्थ्याचे स्मरण आपण करावे, हाच संविधानाचा गौरव आहे.